Monday, 9 September 2013

डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे. सर्व मानवी समस्यांची उत्तरे आहेत. जग बदलण्याची वेळ आलेली आहे. जग संक्रमणावस्थेत आहे. आता क्रांती होणारच आहे या आणि असल्या भ्रामक कल्पनांनी पछाडलेल्यांना पुढे प्रमाणिक राहताच येत नाही. बाबासाहेबांच्या काही वाक्यांना ओढुन ताणुन वेगळा रंग देण्याचा काही मार्क्सवाद्यांचा प्रयत्न हा त्याचेच फलित आहे. मात्र या काळात, जेव्हा मार्क्सवाद हा जागतिक पटलावरुन जवळपास नाहीसा होण्याचा मार्गावर असताना, त्यातील फोलपणा रशियाच्या विघटनानंतर लक्षात आला असताना आपल्याकडे बाबासाहेबांच्या निबंधातील मार्क्सवादाबद्दलची मते कितपत महत्वाची आहेत? असा जर विचार केला तर हे दिसुन येते कि आजच्या काळात त्या निबंधाचे महत्व आणखि वाढले आहे. अलिकडेच डॉ. आनंद तेलतुंबडेंच्या वक्तव्याबाबत जो गदारोळ उठला त्यावरुन हे दिसुन येते कि मार्क्सवाद आणि दलित समस्या यांच्यातील संबंध दुर्लक्षिण्याजोगे नाहीत. निदान भारतात तरी, जेथे जातीयता अजुनही संपलेली नाही, संपण्याची शक्यता नजिकच्या काळात दिसत नाही तेथे या संबंधातील गुंतागुंत अधुनमधुन डोके वर काढणारच.
पुढे जाण्याअगोदर एका हळव्या गोष्टीला स्पर्श करणं भाग आहे कारण त्यावरुन दलितसमाजात मार्क्सवादाचा संबंध हा बाबासाहेबांनंतर कुठे आला हे स्पष्ट होईल. दलित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर १९७२ साली दलितपँथरची स्थापना झाली. अल्पावधीत या संघटनेचं नाव जागतिक स्तरावर पोहोचलं. जगातील मोठमोठ्या नेत्यांनी या संघटनेची दखल घेतली. आणि १९७५ साली फुट पडुन दलितपॅंथरचा प्रभाव संपला. त्यानंतर काही वर्षांनी लता मुरुगकरांनी दलित पँथरवर प्रबंध लिहिला. त्यात फुटीच्या कारणांचा सविस्तर उहापोह केला आहे. तत्कालिन नेत्यांच्या मुलाखतींवर हा प्रबंध आधारलेला असल्याने त्याला वेगळे महत्व आहे. तूर्तास या लेखासाठी त्यातील इतर कारणांकडे जाण्याची मला आवश्यकता वाटत नाही. मात्र अनेक कारणामध्ये महत्वाचे कारण हे वैचारिक मतभेदांचे होते हे दिसुन येते. राजा ढाले हे आंबेडकरवादी आणि नामदेव ढसाळ यांचा कल मार्क्सवादाकडे यातुन हे मतभेद झाल्याचे मुरुगकरांचे निरिक्षण आहे. आजदेखिल सभेत हा विषय निघाला कि त्यावेळच्या दलित नेत्यांच्या चेहर्‍यावर खंत दाटुन येते. खुद्द बाबासाहेबांचा याबाबत अनुभव काय होता हे जाणुन घेणं देखिल महत्वाचं आहेच. भारताच्या संदर्भात खुद्द मार्क्सचे निरिक्षण चुकले. भारतातील जातीव्यवस्था आधुनिकतेच्या रेट्याखाली संपेल असे मार्क्सला वाटले होते. तसे झाले नाही. ५ ऑगस्ट १८५३ च्या “न्युयॉर्क डेली ट्रीब्युन मध्ये मार्क्स लिहितो…Modern industry, resulting from the railway system, will dissolve the hereditary divisions of labor, upon which rest the Indian castes, those decisive impediments to Indian progress and Indian power. हे अर्थातच प्रत्यक्षात आले नाही. भारतातल्या कारखानदारी, शहरीकरण, आधुनिकता येऊनही जातीसंस्था हि वेगळ्या स्वरुपात चालुच राहिली.
अलिकडे काही मार्क्सवादी हे मान्य करतात कि जातीसंस्थेबद्दल त्यांचे आकलन चुकले. विशेषतः वर्ग नाहीसे झाले कि जाती आपोआपच नाहीशा होतील आणि वर्ग हा जातीपेक्षा महत्वाचा प्रश्न आहे हि दोन्ही गृहीतके चुकली. मुळात मार्क्सवाद्यांच्या दृष्टीने जात महत्वाची नव्हतीच. जातीचा प्रश्न धर्माशी निगडीत होता आणि धर्म ही अफुची गोळी होती. अर्थ हा base आणि धर्म किंवा तत्सम कुठलेही तत्वज्ञान हे superstructure अशी ती मांडणी होती. सर्वतर्‍हेची विषमता लहानपणापासुन ते अगदी उच्चविद्याविभुषित झाल्यावरसुद्धा अनुभवलेले बाबासाहेब मात्र अगदी वेगळ्या मार्गाने गेले. भारतीय जनमानसातील धर्माचं महत्व त्यांनी अचुक ओळखलं होतं. मनुस्मृतीचा प्रभाव त्यांना माहित होता. भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या जातीसंस्थेचं उच्चटन वर्ग नाहीसे झाल्याने होईल या भ्रमात ते नव्हते. शिवाय मार्क्सवाद्यांनी त्यांना एका बाबतीत निराश केलं होतं. मुंबईच्या गिरणी कामगारांमध्ये अस्पृश्यांना विणकाम खात्यात प्रवेश नव्हता. तेथे धागा चोखुन काम करावे लागत असे. अशा तर्‍हेच्या भेदभाव नाहीसा करण्यासाठी कम्युनिस्टांनी कुठलिही पावले उचलली नव्हती. त्यामुळे आयुष्याच्या अखेरीला बाबासाहेबांनी मार्क्सवादाबद्दल आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. हा निबंध प्रदीर्घ आहे. पण लेखाच्या दृष्टीने त्याचा गोषवारा देणे आवश्यक आहे.
बाबासाहेबांनी बुद्धाच्या आणि मार्क्सच्या तत्वप्रणालीची सर्वप्रथम मांडणी केली आहे. त्यात मार्क्सवादाबद्दल आपले भाष्य करताना ते म्हणतात कि” …समाजवाद अटळ आहे हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. …साम्यवादाने रशियात पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी पुष्कळ हिंसा व रक्तपात घडवुन जाणीवपुर्वक योजना आखावी लागली….इतिहासाचे एकमेव स्पष्टीकरण म्हणुन आता कोणीही इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण स्विकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले आहे हे कोणीही मान्य करत नाही.” मात्र बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत महत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याची चार तत्वे त्यांना महत्वाची वाटली मात्र त्यावरील बुद्धाचे उपाय त्यांना परिणामकारक वाटले. ती चार तत्वे म्हणजे १. तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्र्चना करणे आहे. २. वर्गावर्गामध्ये हितसंबंधांचा कलह आहे. ३. संपत्तेच्या खाजगी मालकिमुळे एका वर्गाला सत्त मिळते तर दुसर्‍या वर्गाला त्याची पिळवणुक क्झाल्यामुळे दु:ख मिळते. ४. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ते नष्ट करुन हे दु:ख दूर करणे आवश्यक आहे.
या चारही गोष्टींवर बुद्ध धर्मामध्ये परीणामकारक उपाय आहेत असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यानी या निबंधात जागोजाग निरनिराळे दाखले दिलेले आहेत. विशेषतः बुद्ध व त्याचा शिष्य आनंद यांच्या संवादातुन बाबासाहेबांनी हे स्पष्ट केले कि हाव असण्याचे कारण मालकी असे बुद्ध धर्म मानतो. भिक्षुंना खाजगी संपत्ती बाळगण्याची परवानगी नाही. त्यात मार्क्सच्या चौथ्या तत्वाचे निवारण होते. तथापी मार्क्सवाद्याची साधने त्यांना कधीही पटली नाहीत. विशेषतः हिंसेच्या ते विरुद्ध होते. बाबासाहेबांना धर्म महत्वाचा वाटत होता. मार्क्सवाद्यांच्या धर्मद्वेषाला त्यांची कधीही मान्यता नव्हती. एक कायमची हुकुमशाही म्हणुन राज्याविषयी असलेला मार्क्सवादी सिद्धांत त्यांना पटला नव्हता. “जर अखेरीला राज्य नष्ट होणार” तर ते केव्हा नष्ट होणार याचा कालावधी साम्यवादी सांगु शकत नाहीत. शिवाय हुकुमशाहीने तिचे कार्य केल्यावर, लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनवल्यावर स्वतः संपुष्टात का येऊ नये? हा बाबासाहेबांचा घाणाघाती आक्षेप होता. सरतेशेवटी ते म्हणतात “साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो, (समता,सहभाव व स्वातंत्र्य या)सर्व गोष्टी देऊ शकत नाही”. इतक्या स्पष्ट आक्षेपांनंतर बाबासाहेबांच्या विचारांशी मार्क्सवादाची सांगड घालण्याचा अप्रामाणिकपणा करण्यात अर्थ नाही हे कुणालाही पटेल. तरीही हे प्रयत्न का होतात? याचे उत्तर मार्क्सवाद्यांच्या ढोंगीपणात दडलेले आहे.
मार्क्सवाद हा जगभरातुन नाहीसा होत असला तरी विचारवंत विद्वानांमध्ये ते चलनी नाणं आहे. आणि हे विचारवंत आणि विद्वान घाऊक प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रात आणि विद्यापिठात सापडतात. फर्ड्या इंग्रजीत मार्क्सवरची गाडाभर पुस्तके वाचावीत, त्यावर क्रिटीकल थिंकर्सनी लिहिलेली आणखि खंडीभर पुस्तके वाचावीत. पेपर्स लिहावेत, सेमिनारमध्ये वाचावेत. गरीबांच्या शोषणावर वातानुकुलित गाड्यांमधुन प्रवास करुन व्याख्याने द्यावीत, पिचलेल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये भाषणे आयोजित करावीत. आणि हे सारं अतिक्लिष्ट भाषेत करावं म्हणजे विद्वत्तेला आणखि झळाळी प्राप्त होते. बाबासाहेबांनी कितीही स्पष्टपणे लिहिलं तरी बाबासाहेबांचा आणि मार्क्सचा सांधा जुळवण्याचं याचं काम सुरुच असतं. कारण बाबासाहेबांना खोडुन काढता येत नाही. तेवढी त्यांची कुवतही नसते. मग पुढे यांची मजल “मुळात बाबासाहेबांच्या काळापर्यंत मार्क्सचे महत्वाचे ग्रंथ उपलब्ध नव्हते” हे म्हणण्यापर्यंत जाते. त्यातुन त्यांना हे ध्वनित करायचे असते कि जणुकाही हे ग्रंथ बाबासाहेबांच्या हाती लागले असते तर त्यांच्या विचारात फरक पडला असता. खरंतर रशियाच्या विघटनापर्यंत बाबासाहेब हयात असते तर त्यांनी मार्क्सवादावर आणखि हल्ला चढवला असता. ज्या बाबासाहेबांना मार्क्स हा अत्यंत म्हत्वाचा विचारवंत वाटत होता. त्याच्या ग्रंथांचे अध्ययन बाबासाहेबांनी केले नसेल हे त्यांचे अजस्त्र वाचन ज्यांना माहित आहे त्यांना पटणारच नाही. या सार्‍या बाबी वैयक्तीक पातळीवर सुरु असतील तर एकवेळ समजता येईल मात्र विद्यार्थ्यांना शिकवताना आंबेडकरांचे सुप्रसिद्ध “अ‍ॅनहिलेशन ऑफ कास्ट” हे भाषण घ्यावे कारण त्यात जातीसंस्थेवर प्रखर हल्ला आहे मात्र “बुद्ध कि कार्ल मार्क्स” या निबंधाला हातदेखिल लाऊ नये याला संधिसाधु अप्रामाणिकपणाशिवाय दुसरे काहीही म्हणता येत नाही. मार्क्सने धर्माला अफूची गोळी म्ह्टले आहे मात्र खुद्द मार्क्सवाद हा आता बुद्धीमंतांसाठी अफूची गोळी ठरला आहे हे नक्की.

संदर्भ:
बुद्ध कि कार्ल मार्क्स – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – धनंजय कीर

No comments:

Post a Comment