Thursday, 12 September 2013

डॉ. आंबेडकर यांचा विकास विचार

बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचा केवळ सामाजिक अथवा राजकीय दृष्टिकोनातून विचार केला नाही तर पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनियोग, संरक्षण व परराष्ट्र धोरण, कामगार कल्याण, बांधकाम आदींच्या संदर्भातही सखोलपणे विज्ञानवादी विचार केला होता. त्यांचे या विषयासंदर्भातली विचार लोकांसमोर आणण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील जलस्त्रोत व्यवस्थापनाबाबत तसेच वीज निर्मिती संदर्भात केलेल्या विज्ञानवादी कार्यावर डॉ. सुखदेवराव थोरात यांनी ग्रंथ लिहून भारतीयांना परिचय करून दिला आहे. डॉ. विजय खरे यांनी आणि विजय गायकवाड यांनी अनुक्रमे त्यांच्या संरक्षण विषयक व परराष्ट्रीय धोरणांचा व्यवहारवादी दृष्टीकोन जगासमोर आणला.
डॉ. आंबेडकर व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात असताना त्यांनी व्यवहारी दृष्टिकोन स्वीकारून अनेक योजना आकाराला आणल्या. त्यात दामोदर नदीच्या खोर्‍यात धरण उभारण्याची योजना लक्षणीय ठरते. हिमालयात उगम पावलेली दामोदर नदी, उडिशा (पूर्वीचा ओरिसा) आणि बिहारच्या भागात पावसाळय़ात अभिशाप ठरली होती. हे दोन्ही प्रदेश त्या काळात बंगाल प्रांतात मोडत असत. सर्वसाधारणपणे दर दोन वर्षांंंंच्या अंतराने दामोदर नदीच्या पुराने उडिशा आणि बिहार मधील अनेक गावे वाहून जात असत. सन १८५९ पासून १९४३ पर्यंंंंत बिहारच्या जनतेने दामोदर नदीचे १४ महापूर पाहिले होते. १७ जुलै १९४३ ला दामोदर नदीच्या महापुराने अक्षरक्ष: हाहा:कार उडवून दिला. आक्राळ विक्राळ महापुराने ७0 गावांना शब्दश: जलमय करून टाकले होते. १८ हजार पक्की घरे पुरामुळे जमीनदोस्त झाली, गुरे ढोरे वाहून गेली, लाखो लोक बेघर झाले, याशिवाय बंगाल प्रांताचा भारताशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला. भरीस भर म्हणून या काळात दुसरे महायुद्ध सुरू झाले होते आणि याच वेळी जपानने कलकत्ता शहरावर बॉम्ब वर्षाव केल्याने पूरग्रस्त तसेच बॉम्ब वर्षावाने उद्ध्वस्त झालेल्या भागात अन्नधान्य तसेच जीवनोपयोगी वस्तुंचा पुरवठा करणे केंद्र सरकारला अशक्य झाले होते.
डॉ. बाबासाहेबांचा धडाडीने कार्य करण्याचा आवाका पाहून त्यावेळचे उडिशाचे प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते डॉ. हरेकृष्ण मेहताब यांनी डॉ. आंबेडकरांना तातडीचे पत्र लिहून या महानदीच्या थैमानाकडे तातडीने लक्ष देण्याची विनवणी केली. डॉ. आंबेडकरांनी लागलीच नोव्हेंबर १९४३ मध्ये उडिशातील कटक शहरात केंद्र तसेच राज्यातील सर्व संबंधित इंजिनियर्स आणि अधिकारी वगौची बैठक बोलावून आलेल्या पुराचा सकारात्मक विनियोग अथवा उपयोग कसा करता येईल याबाबत विचार करण्याची सूचना केली. बैठकीचा समारोप करताना आपल्या विज्ञानवादी दृष्टीचा प्रत्यय देत आंबेडकर म्हणाले की, या पुराला शाप न मानता वरदान मानायला हवे! पावसाचे पाणी साठवून त्याचा मानवी जीवनासाठी जलव्यवस्थापन करण्याची तसेच वाहतुकीसाठी जलप्रवाह वहात ठेवणे यासारखे उपक्रम राबवता येतील का हे पाहण्याची सूचना केली.
कटक येथील ही बैठक बोलवण्यापूर्वी डॉ. आंबेडकरांनी म्हैसूर संस्थानात डॉ. विश्‍वेश्‍वरैय्या यांनी उभारलेल्या तुंगभद्रा नदीवरील धरणाचा तसेच जलसिंचन प्रकल्पासाठी त्या काळात अग्रेसर असलेल्या पंजाब प्रांतातील लहान मोठय़ा धरणांच्या उभारणीसंबंधात लिहिल्या गेलेल्या आणि अमेरिकेतील टेनीसी नदीच्या खोर्‍यात त्या नदीवर बांधण्यात आलेल्या धरणावरील ग्रंथाचाही सखोल अभ्यास केला होता. त्यावरून त्यांच्या असे लक्षात आले की, अमेरिकेतील टेनेसी धरण प्रकल्प, दामोदर नदी खोरे प्रकल्पाशी तंतोतंत मिळता जुळता आहे. धरण बांधकाम शास्त्रावरील तांत्रिक ग्रंथ अभ्यासल्यावर दामोदर धरण प्रकल्पाचे बांधकाम त्याच धर्तीवर व्हावे असा त्यांनी मनोमन निश्‍चिय केला.
व्हाईसराय वेव्हेल यांनी दामोदर व्हॅली प्रकल्पाला मान्यता देताना दामोदर नदीवरील धरणाचे बांधकाम एखाद्या ब्रिटिश इंजिनियरकडे सोपविण्याचे डॉ. आंबेडकरांना सुचविले होते. तर डॉ. आंबेडकरांना केवळ देखरेखीसाठी टेनीसी धरण प्रकल्प उभारणीशी संबंधित तज्ज्ञ इंजिनियरची नेमणूक करून प्रत्यक्ष धरण उभारणीचे काम एखाद्या तज्ज्ञ भारतीय इंजिनियरने करावे असे वाटत होते. त्या दृष्टीने त्यांच्या नजरेसमोर त्या काळातील पंजाब प्रांतातील चीफ इंजिनियर रायबहादूर ए. एन. खोसला यांचे नाव होते. तर रायबहादूर खोसला यांना एका अस्पृश्य मंत्रांच्या देखरेखीखाली काम करणे हे कमीपणाचे वाटत होते. डॉ. आंबेडकरांनी टेनेसी व्हॅली अँथोरिटी या संस्थेत काम केलेले धरण बांधकाम तज्ज्ञ ड्युअर ड्युईन यांची धरणाचा आराखडा तयार करण्यासाठी नेमणूक केली.
रायबहादूर खोसला यांचे पूर्वग्रहदूषीत मत समजल्यावर डॉ. आंबेडकरांनी स्वत:च पुढाकार घेवून खोसला यांना बोलावून घेतले व ह्यमी मनात आणले तर केवळ अमेरिकनच नव्हे तर अन्य प्रगत देशातील तज्ज्ञ इंजिनियरची नेमणूक करू शकतो. एवढेच नाही तर तुमची इच्छा नसतानाही त्याजागी तुमची नेमणूक करू शकतो. तुमच्या नेमणुकीमागील माझा एवढाच हेतू आहे की, दामोदर धरण एका तज्ज्ञ भारतीय इंजिनिअरद्वारा उभारले जावे. तुमच्या एवढा स्थापत्य शास्त्राचा अभ्यास असलेला इंजिनिअर माझ्या समोर दुसरा नाही म्हणून तुम्ही हे पद स्वीकारावे असे मला प्रामाणिकपणे वाटते अशा शब्दात त्यांची समजूत काढली.
डॉ. आंबेडकरांचे हे स्वराष्ट्राभिमानी विचार ऐकून रायबहादूर खोसला यांनी त्यांची क्षमा मागितली आणि दामोदर व्हॅली प्रोजेक्टच्या चीफ इंजिनियरची जागा लागलीच स्वीकारली. त्यांनीही आपले सहकारी निवडताना ते केवळ भारतीयच असतील याची काळजी घेतली. पुढे हे काम स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रायबहादूर खोसला यांच्या सर्मथ नेतृत्वाखाली परीपूर्ण झाले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब कायदा मंत्री होते आणि पाटबंधारे मंत्री होते न. वि. गाडगीळ. त्यामुळे दामोदर धरण उद्घाटन समारंभाच्या कोनशिलेवर बाबासाहेबांचे नाव नाही. थोडक्यात बाबासाहेब दामोदर व्हॅली प्रकल्पाचे अन संग हिरो ठरले आहेत.
पडित जमीनीचे भूमिहिनांना वाटप झाले तर ते ही जमीन कसून स्वाभिमानाने जगू शकतील आणि पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नात भर टाकू शकतील या भूमिकेतून डॉ. आंबेडकरांनी हैद्राबाद संस्थानात भूमिहिनांचा सत्याग्रह घडवून आणला होता. १९५३ च्या त्या सत्याग्रहात कर्मवीर भाऊराव तथा दादासाहेब गायकवाड सेनानी होते. नंतर त्या दिशेनेच १९५४ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसभेत एक अशासकीय प्रस्ताव सादर करून पडित अथवा नापिक जमिनी सरकारने ताब्यात घेवून त्या जमिनीचे अनुसूचित जाती जमातीत समान वाटप करण्याचे सुचविले होते.
भारत स्वतंत्र झाल्यावर मीठावरील कर परत सुरू करून त्या कराची रक्कम स्वतंत्र लेखा शीर्षाखाली जमा करून, अत्याचार झालेल्या खेड्यापाड्यातील तसेच शहरातील दलितांना आर्थिक मदत म्हणून त्या निधीचा उपयोग करावा व त्या निधीला महात्मा गांधीचेच नाव द्यावे असा विधायक विचार त्यांनी राज्यसभेत मांडला होता.
डॉ. बाबासाहेबांची दुसरी सूचना अद्याप स्वीकारली गेली नसली तरी सध्या महाराष्ट्रात कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार गावातील जमीन विकू पाहणार्‍या गावकर्‍यांकडून सुपीक जमीन घेवून तिचे गावातील भूमिहिनांना वाटप करू शकते.
डॉ. आंबेडकरांनी १९५३ मध्ये रुजवलेल्या या योजनेला १९६४ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भूिमहिनांचा मोठय़ा प्रमाणात सत्याग्रह करून खतपाणी घातले.

No comments:

Post a Comment