Tuesday, 10 September 2013

गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज

गणपती उत्सव हा बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलेला उत्सव. त्याआधी गणपतीची पूजा-अर्चा विशेषकरून पेशव्यांच्या दरबारी होत असे. परंतु स्वातंत्र्याचा लढा ऐन जोमात असताना टिळकांनी गणपती उत्सव सुरु केला. समाजात राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी, समाज उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यावा, त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूने गणेश उत्सव सुरु केला असे सांगण्यात येते. गणेशोत्सव सुरु करण्यामागे वरील करणे जरी सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र याउलट परिस्थिती आहे. सध्या तर गणेशोत्सवाला अत्यंत हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव जवळ आला कि पोलिसांनाही सुरक्षा वाढवावी लागते. या काळात काही ठिकाणी धार्मिक दंगली घडून येण्याची शक्यताही असते. युवा पिढी बेभान होवून (दारू
पिवून) नाचत असते. सर्व कामधंदे सोडून दहा दिवस गणपती उत्सवात स्वतःला झोकून दिलेले असते. मूळच्या पेशव्यांच्या गणेशोत्सवाला टिळकांनी राष्ट्रीय स्वरूप दिले. अल्पावधीतच हा उत्सव लोकप्रिय झाला. घराघरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जावू लागली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात अबालवृद्ध, तरुण आणि स्त्रिया मोठ्या संख्येने सामील होतात.

गावागावात गणपतीची अनेक मंडळे स्थापन केली गेली आहेत. गावातल्या प्रत्येक गल्लीचे वेगळे गणेश मंडळ असते. त्या माध्यमातून अनेकजण आपली राजकीय पोळीही भाजून घेत असतात. विविध गणेश मंडळांमध्ये सजावट, देखावे, डामडौल याबाबत स्पर्धा चालू असते. हे सर्व स्पर्धेपुरते चालू राहिले तर ठीक नाहीतर त्याचे पर्यावसान अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये होते. अनेक लोक दारू पिवून गणपतीसमोर नाचत असतात. आंबेडकर जयंतीला लोक दारू पिवून नाचतात अशी ओरड करणाऱ्या संस्कृतीरक्षकांना हे अनैतिक वर्तन दिसत नाही का ? असो.

गणपती उत्सवात युवक मोठ्या संख्येने सामील होतात. गणपतीची प्रतिष्ठापना करण्यापासून ते त्याला विसर्जित करेपर्यंत युवकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. बहुतांशी लोक कामधंदा सोडून या उत्सवात स्वतःला झोकून देतात. युवा शक्ती हि कोणत्याही समाजाची/राष्ट्राची महत्वाची संपत्ती असते. परंतु हीच युवा शक्ती दारू पिवून ‘मुन्नी बदनाम हुई, शीला कि जवानी’ अशा तालावर ठेका धरत असते. सध्या गणेशोत्सवामध्ये लाखो करोडो रुपये खर्च होत असतात. अनेक मंडळे गर्भश्रीमंत आहेत. त्यातील पैशांचा विनियोग योग्य पद्धतीनेच होतो असे छातीठोकपणे कोण सांगू शकेल ? गणपतीसाठी मागितल्या जाणाऱ्या वर्गणीतही काहीजण भ्रष्टाचार करतात. भाविक श्रद्धेने जे नारळ अर्पण करतात ते विकायला काढले जातात. श्रद्धेच्या नावाखाली पैशांचा बाजार चाललेला असतो.

ज्यांनी गणपती उत्सव सुरु केला ते मात्र दीड दिवसाचा गणपती बसवतात. अशा सण-उत्सवात ते अडकून पडत नाहीत. बहुजन तरुण मात्र आपली कामे, अभ्यास सोडून उत्सवात रमलेला असतो. आणि अभिजन वर्ग दीड दिवसात गणपती विसर्जित करून रिकामा होतो. त्यांची मुले सेट, नेट, पी.एच.डी, एमपीएससी, युपीएससी अशा परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्यांना मी दोष देत नाही. उलट त्यांचे कौतुकच केले पाहिजे. ते कसे काळाप्रमाणे बदलतात तसे आपणाला बदलता येत नाही हे आपले दुर्दैव आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात दहा दिवस गणेशोत्सव साजरा करणे म्हणजे अधिकाधिक वेळेचा आणि पैशाचा अपव्यय करणे होय. त्याचबरोबर अशा माध्यमातून अंधश्रद्धेचा पगडा अधिक घट्ट होतो. काही वेळा गणपती दुध पितो. इथे अन्न न मिळाल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी नैवेद्याच्या नावाखाली बरेच अन्न वाया जात असते. भुकेल्या लहान मुलाला एकवेळ दुध मिळणार नाही परंतु निर्जीव देवाला दुधाचे अभिषेक केले जातात.

गणपती उत्सव साजरा करू नका असे मी म्हणणार नाही. मी स्वतः हा उत्सव साजरा करत नाही. मला काल्पनिक देव-देवता मान्य नाहीत हे मी आधीच स्पष्ट केले आहे. परंतु याचा अर्थ असा नाही कि दुसर्यानीही माझे म्हणणे मान्य करावे. ज्याला इच्छा असेल त्याने जरूर आपल्या इच्छेप्रमाणे वागावे. इतरांना जसा देव मानण्याचा अधिकार आहे तसा मला तो नाकारण्याचा अधिकार आहे. यात कोणत्याही धर्माची, देवाची बदनामी करण्याचा उद्देश नाही. मला जे वाटते ते मी लिहिले आहे. आता काहीजण म्हणतील, तुम्ही फक्त हिंदू धर्म आणि हिंदू देवांना लक्ष करता. इतर धर्माबाबत बोलत नाही. त्यांना माझे सांगणे आहे कि आम्ही कुणाविरुद्ध आणि काय बोलावे याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आम्हाला आहे. आम्ही ज्या वातावरणात राहतो, ज्या धर्मात आमचा जन्म झाला तिथे आम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर आम्ही त्याबद्दल बोलणारच. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा हि चिकित्सक आहे. परंपरेने चालत आले म्हणून आंधळेपणाने स्वीकारायचे नाही. स्वतः चिकित्सा करायची आणि त्यांनतर स्वतःच्या बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारायचे.

काहीजण म्हणतील कि गणपती हा शिव-पार्वतीचा पुत्र. शिव-पार्वती जर बहुजन समाजाला आदरणीय असेल तर गणपतीला का नाकारायचे ?
वरील सर्व विवेचनाचा अर्थ असा नाही कि गणपतीला नाकारा. गणपती हा बहुजन समाजाचा श्रेष्ठ पूर्वज आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती घेवू...

पुरातन काळापासून वैदिकांनी बहुजनांच्या महापुरुषांना संपवण्यासाठी दोन मार्ग अवलंबले.

पहिला मार्ग- जे बहुजन महापुरुष वैदिकांच्या सामाजिक/धार्मिक/सांस्कृतिक वर्चस्वाला धक्का लावत होते, ज्यांच्यापासून वैदिक/सनातन धर्माला धोका आहे त्यांना बदनाम करणे. बहुजन समाजाच्या मनात त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण होईल अशा प्रकारे त्यांची मांडणी धर्मग्रंथ आणि इतर लिखीत, मौखिक साहित्यातून करणे, त्यासाठी खोट्या कथा, काल्पनिक काव्य, पात्रे निर्माण करणे. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्व आघाड्यांवर बहुजन महापुरुषांना बदनाम करणे हा वैदिकांचा पहिला मार्ग होय.

दुसरा मार्ग- बदनामी करूनही काही महापुरुषांच्या बाबतीत बहुजन समाजाला असलेला आदर, पूज्यभाव कमी होत नाही हे दिसताच या महापुरुषांचे वैदिकीकरण करून टाकणे. बहुजन महापुरुष आणि महान स्त्रियांच्या चरित्रावर वैदिक, ब्राम्हणी पुटे चढवून, हे महापुरुष वैदिक धर्म, संस्कृतीचे कट्टर समर्थक आणि पुरस्कर्ते होते अशी मांडणी करणे. शेकडो वर्षे तेच तेच सांगून (गोबेल्स नीती) वैदिक पुटे अधिकाधिक गडद करणे हा वैदिकांचा दुसरा मार्ग होय. याचे सर्वात अलीकडचे उदाहरण गौतम बुद्ध. ज्या बुद्धांनी मला देव आणि अवतार हि संकल्पना मान्य नाही असे सांगितले त्यांनाच विष्णूचा अवतार बनवून टाकणे हि लबाडी नाही का ? जर बुद्धांच्या बाबतीत असे झाले तर त्याआधी इतर बहुजन महापुरुषांच्या बाबतीत किती कपटनीती वापरली असेल.

गणपतीच्या बाबतीतही यातला दुसरा मार्ग वापरला गेला. मुळचा शिव-पार्वतीचा पुत्र मानला जाणारा, सिंधू संस्कृतीचा गणनायक, गणांचा अधिपती गणपती हा अनार्य/बहुजन होय. सिंधू संस्कृतीतील समाजात गणव्यवस्था अस्तित्वात होती. या गणांचा प्रमुख तो गणपती. म्हणजे गणपती हि व्यक्ती मानण्यापेक्षा पद मानणे जास्त संयुक्तिक होईल. कारण हजारो वर्षे या समाजात गणव्यवस्था अस्तित्वात होती. इतकी वर्षे एकच व्यक्ती गणांच्या प्रमुखपदी असणे कदापी शक्य नाही. याचा अर्थ वेळोवेळी विविध व्यक्ती गणपती पदावर विराजमान झाल्या होत्या. गण संस्कृतीचे महानायक, आद्य दांपत्य शिव आणि पार्वती असल्यामुळे साहजिकच गणांचा प्रमुख असणाऱ्या व्यक्तीला (गणपतीला) शिव-पार्वतीचा पुत्र मानण्याचा प्रघात पडला असावा. त्याचप्रमाणे शिव-पार्वतीचा एखादा पुत्र या पदावर विराजमान झालाही असेल. परंतु हजारो वर्षे एकच व्यक्ती गणपती पदावर होती हे मात्र संयुक्तिक वाटत नाही. याचा अर्थ गणपती अनेक होते आणि तत्कालीन समाजातूनच गणपतीची निवड होत असे. काही असुर व्यक्तींनाही शिवाने गणपती होण्याचा वर दिला होता असे संदर्भ धर्म ग्रंथातून दिसतात. असुर समाजातील कर्तुत्वशाली व्यक्ती या पदावर अनेकदा विराजमान झाल्या होत्या. असुरांच्या दृष्टीने शंकर हा पिता आणि पार्वती हि माता आहे.  हे असुर आर्यांच्या/वैदिकांच्या यज्ञ संस्कृतीचे कट्टर विरोधक होते. एकूणच वैदिक धर्माला असुरांनी तीव्र विरोध केला होता. मग गणपती पदावर असणारी व्यक्तीही वैदिकांची विरोधकच असणार. त्यामुळे गणपतीची बदनामी केली. परंतु त्यात यश येत नाही म्हटल्यावर गणपतीचे वैदिकीकरण केले. मुळचा गण-संस्कृतीचा महानायक गणपती अशी गणपतीची प्रतिमा नष्ट होवून वैदिक देवतेच्या स्वरुपात गणपती पुजला जावू लागला. पार्वतीने आपल्या अंगावरील मळापासून गणपती बनवला अशा कथांच्या माध्यमातून पार्वतीचीही बदनामी करण्यात आली आहे. मग शंकराकडून गणपतीचा शिरच्छेद झाल्याच्या आणि त्याला हत्तीचे शीर जोडल्याच्या खोट्या कथा निर्माण करण्यात आल्या. गणपतीने अनेक असुर-राक्षसांचा वध केल्याच्या रंजीत कथा निर्माण केल्या. थोडक्यात बहुजन समाज गणपतीच्या मूळ स्वरूपापासून कोसो दूर गेला.

आज गणपतीला स्वीकारायचे तर आहे. परंतु आज गणपतीचे खरे चरित्र वैदिक/ब्राम्हणी अपप्रचाराने डागाळले आहे. त्याच्या चरित्रावरील वैदिक पुटे दूर करूनच गणपतीला स्वीकारावे लागेल. त्यासाठी दहा दिवसांच्या उत्सवाची गरज नाही. गरज आहे ती अभ्यासाची आणि आपला प्राचीन इतिहास बहुजन नजरेतून समजून घेण्याची.



  (सदर लेख इथून संकलित केला आहे.) 

No comments:

Post a Comment