विषमता हा आपल्या देशातील समाजव्यवस्थेचा आधार होता हे सार्यांनाच माहित आहे. या समाजव्यवस्थेला सत्तेचे अधिष्ठानही मिळाले होते. या परिस्थितीत अस्पृश्य समाज वर्षानुवर्षे आहे तिथेच होता. या समाजाला सत्ता, संपत्ती तसेच प्रतिष्ठा यापासूनच नव्हे तर माणूस म्हणूनही दूर ठेवण्यात आले. अस्पृश्य समाजातील जनतेच्या पायाखाली जमीन नव्हती तर डोक्यावर छप्पर नव्हते. त्यांच्या वाटय़ाला केवळ लाचारी, दुःख, दैन्य आले होते. या परिस्थितीत सामाजिक सुधारणा घडवून आणू इच्छिणार्या अनेकांनी मानवतावादी भूमिकेतून या विषमतेच्या विरोधात लढा दिला. या संदर्भात महाराष्ट्राचा विचार करायचा तर क्रांतीवीर महात्मा फुले यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांनी सामाजिक विषमतेच्या विरोधात प्रखरपणे आवाज उठवला आणि हाच प्रखर स्वर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तीव्र केला. उच्चविद्याविभूषित असताना बाबासाहेबांना अस्पृश्य समाजव्यवस्थेचे जे अनुभव आले, जे चटके बसले त्यातून त्यांनी ही संपूर्ण समाजव्यवस्था बदलण्याचा निर्धार केला. अस्पृश्यांना `माणूस’ म्हणून उभे करणे हे ध्येय समोर ठेवले.
डॉ. आंबेडकरांचा पहिला निबंध 1917 मध्ये प्रकाशित झाला. `कास्ट इन इंडिया’ या शीर्षकाच्या त्या निबंधात बाबासाहेबांनी सामाजिक पुनर्रचनेची भूमिका मांडली. त्यावेळी साधारणपणे असे म्हटले जात होते की, हे तत्त्वज्ञान मनूने निर्माण केले. त्यामुळे ही चातुर्वर्ण्यावर आधारित आणि विषमतावादी व्यवस्था अस्तित्त्वात आली. पण डॉ. आंबेडकर त्या निबंधात म्हणतात, `मनूने केवळ एखादे तत्त्वज्ञान निर्माण करून व्यवस्था अस्तित्त्वात आणली तर आपणही एखादे तत्त्वज्ञान निर्माण करून ती व्यवस्था नष्ट केली असती.’ म्हणून डॉ. आंबेडकरांनी, अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्पादनाची साधने तसेच सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळवायची असेल तर आपण भौतिकदृष्टय़ा स्वावलंबी झाले पाहिजे अशी भूमिका मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ अशी भूमिका मांडून थांबले नाहीत. कारण ते कृतीशील विचारवंत होते. त्यांनी 20 जुलै 1924 रोजी `बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना केली. `शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश दिला. त्यामुळे सार्या समाजात चैतन्य निर्माण झाले. विशेष म्हणजे या समितीत सामाजिक सुधारणा करू इच्छिणार्या सार्या जाती-धर्माच्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. यावरून समाजसुधारणांसंदर्भात डॉ. आंबेडकर यांची व्यापक भूमिका स्पष्ट होते. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवार यांचे पणजोबा सर चिमणलाल सेटलवार या समितीचे अध्यक्ष होते. या समितीच्या कार्यालयासाठी कामगार नेते ना. म. जोशी यांच्या परळच्या दामोदर हॉलमध्ये जागा घेण्यात आली होती. या समितीत भाई अनंत चित्रे, सुरबा नाना चिटणीस, गंगाधर सहस्त्रबुध्दे यांचाही समावेश होता. याच सुमारास मुंबई प्रांतिक असेंब्लीमध्ये रावबहाद्दूर टिकेबोले यांनी सार्वजनिक पाणवठे, विहिरी सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी खुली असावीत, असा ठराव मांडला. या ठरावाच्या आधारावर महाडमध्ये डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली 19 आणि 20 मार्च 1927 रोजी सत्याग्रह झाला.
या सत्त्याग्रहाच्या प्रसंगी डॉ. आंबेडकरांनी अध्यक्षपदावरूनकेलेल्या भाषणातून परिवर्तनाच्या दिशेने कशी वाटचाल करायची हे स्पष्ट होते. या भाषणात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट म्हटले होते की, `अस्पृश्य समाजाने गावकीची कामे, हलकी कामे करू नयेत. तुम्हाला खर्या अर्थाने माणूस व्हायचे असेल तर स्वावलंबी झाले पाहिजे.’ या भाषणात त्यांनी महार समाजाला उद्देशून सांगितले की, `महार समाज म्हणजे लाचारांचा तांडा हे चित्र उभे राहिले आहे. ते बदलायला पाहिजे. आचार, विचार आणि उच्चार यात शुध्दी येत नाही तोपर्यंत हे परिवर्तन अशक्य आहे.’ यावेळी बाबासाहेबांनी एक शेती आणि दुसरा पांढरपेशा व्यवसाय करण्याचेही आवाहन केले. एवढेच नव्हे तर, शेती विकत घेता येत नसल्यास सरकारकडून पडीक जमिनी ताब्यात घेऊ, असेही सांगितले. यावरूनही त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
`शिकून शासनकर्ती जमात व्हावे’ असे डॉ. आंबेडकर नेहमी सांगत. ब्राम्हण वर्ग केवळ वेदशास्त्रात पारंगत आहे म्हणून पुढे आहे असे नाही. शिक्षण संपादन करून, उच्चशिक्षित होऊन तो समाज पुढे आला आहे. या समाजाचे महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील अन्य राज्यांमधील चित्र पाहिले तर पुरेशा शिक्षणाअभावी अनेकजण प्रगतीपासून दूर असल्याचे पहायला मिळते. आज राजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे महत्त्व पूर्वीच ओळखले होते. स्त्रिया शिकाव्यात, पुढे याव्यात ही त्यांची तळमळ होती. एवढेच नव्हे तर, त्यांनी महाड सत्त्याग्रहाच्या वेळी म्हणजे 1927 मध्ये महिलांसाठी वेगळी परिषदही भरवली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की, `ठराविक वेशभूषा आणि दागिन्यांमुळे तुम्ही विशिष्ट जातीचे आहात हे लक्षात येते. त्यामुळे अशी वेषभूषा किंवा दागिने वापरणे सोडून द्या.’ आणखी एक विशेष म्हणजे याच परिषदेदरम्यान डॉ. आंबेडकरांच्या ब्राम्हण आणि कायस्थ समाजातील सहकार्यांच्या पत्नींनी अन्य उपस्थित महिलांना वेगळ्या प्रकारे साडी कशी नेसावी याची माहितीही दिली होती.
डॉ. आंबेडकरांची सामाजिक परिवर्तनाची भूमिका सर्वसमावेशक होती. समाजातील परिवर्तनाचा पाया दडपणार्या समुहांना बरोबर घेण्यावर त्यांचा भर असे. स्वतंत्र मजूर पक्षातही ही सर्वसमावेशकता दिसून येत होती. या पक्षाचा झेंडा लाल होता हे अनेकांना आजही माहित नसेल. या पक्षाचा जाहीरनामा क्रांतीकारी होता. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे 14 आमदार निवडून आले होते. विशेष म्हणजे त्यात शामराव परूळेकर, भाऊसाहेब राऊत, गडकरी आदींचा समावेश होता.डॉ. आंबेडकर यांनी कोकणातील खोती पध्दतीविरोधात लढा दिला होता. 1938 मध्ये आलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या मुंबई बंदमध्येही डॉ. आंबेडकर सहभागी झाले होते. त्यावेळी आंदोलनादरम्यान भागोजी वाघमारे हा दलित कार्यकर्ता शहीद झाला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान सादर करताना बाबासाहेबांनी एक इशारा दिला होता. ते म्हणाले होते, `आज आपण एका विसंगत जगात प्रवेश करत आहोत. एका बाजूला राजकीय समता प्रस्थापित होत असताना दुसरीकडे सामाजिक विषमता तशीच कायम आहे. अशा वेळी हे संविधान नीट राबवले गेले नाही तर घटनेचा डोलारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.’
या पार्श्वभूमीवर फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणताना स्त्रियांवरील वाढते अत्याचार, वाढत्या स्त्री-भ्रूणहत्या, सोनईचे हत्याकांड, माण तालुक्यात दलित कुटुंबातील व्यक्तींना झालेली मारहाणया घटना व्यथित करणार्या आहेत. सत्ताधार्यांमध्ये मग्रूरपणा वाढू लागला आहे. आपला सामाजिक अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे सारे खपवून घेतले जाईल अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीचे आणि संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी मोठी असून तसा विचार व्यापक प्रमाणावर व्यक्त होणे गरजेचे आहे. आर्थिक मंदी तसेच जागतिकीकरणाच्या नावाखाली शेतकरी तसेच अन्य समाज उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. या परिस्थितीवर प्रगत म्हणवणारा महाराष्ट्र मात करू शकला नाही तर ती शोकांतिका ठरेल. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि मूल्यांची आठवण प्रकर्षाने होते. परंतु डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन अजूनही खर्या अर्थाने झालेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन परिवर्तनाद्वारे समतेचा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त व्हायला हवा.
डॉ. आंबेडकरांची सामाजिक परिवर्तनाची भूमिका सर्वसमावेशक होती. `बहिष्कृत हितकारणी सभा’ असो वा `स्वतंत्र मजूर पक्ष’ या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये वेळोवेळी सर्वसमावेशकता दिसून आली. एका बाजूला राजकीय समता प्रस्थापित होताना दुसरीकडे सामाजिक विषमता कायम आहे .
No comments:
Post a Comment