Saturday, 14 September 2013

रिपब्लिकन ऐक्य हे मृगजळ?

बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना दिली . त्याचबरोबर देशातील दलित , मागासवर्गीय , महिला यांना शोषणमुक्तीचा मार्ग दाखविला . समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचे विचार दिले . आपल्या माघारी ही परंपरा चालू राहावी यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली . पण दुर्देवाने आंबेडकरांनंतर त्यांची परंपरा चालविणारा समर्थ वारस मिळाला नाही . रिपब्लिकन पक्षाचे शतशः तुकडे झाले .


डॉ . आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष वाढला असता तर देशाचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते . महाराष्ट्राचे चित्र खूपच वेगळे राहिले असते .

   

  

महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची वाट लावण्यात त्यांचे अनुयायीच आघाडीवर राहिले . निवडणूक आयुक्ताकडे - आज 32 रिपब्लिकन पक्षाची नोंदणी आहे . प्रत्यक्षात शंभरपेक्षा अधिक रिपब्लिकन पक्ष असावेत असा अंदाज आहे . दर चार सहा महिन्याला रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नारा दिला जातो . परंतु , प्रत्यक्षात काम मार्गी लागत नाही . रिपब्लिकन पक्षाचे नेते ' मी सांगतो तेच अंतिम सत्य ' ही भावना सोडायला तयार नाहीत .


पक्षाचे एक्य होत नाही . काँग्रेस किंवा राष्ट्वादी काँग्रेसला बाबासाहेबांचे अनुयायी संघटीत होणे पडवणारे नाही . बहुजन समाज संघटित झाला तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला मोठा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतो , म्हणून या दोन्ही पक्षाला रिपब्लिकन पक्षाला संघटीत होऊ द्यायचे नाही . एखाद्या राजकीय पक्षात तात्विक राजकारणावरून फूट पडणे समजू शकते . परंतु , निव्वळ किरकोळ लोकांच्या स्वार्थासाठी फूट पडावी . पक्षाचे एक दोन नव्हे तर शंभर तुकडे व्हावेत यापेक्षा वाईट काही असू शकत नाही .

आता रिपब्लिकन पक्षाच्या एकीकरणाचा खेळ पुरे झाला . जनतेने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे . बहुजन समाजाला संघटीत व्हायचे असेल तर त्यांनी आता रिपब्लिकन पक्षाचे तुकडे पाडणार्या लोकांना पद्धतशिरपणे दूर ठेवले पाहिजे . जनतेने त्यासाठी नव्या नेत्यांचा शोध घ्यावा . रिपब्लिकन पक्षाच्या उभारणीसाठी नेतृत्व कोणत्या जातीचे असावे , हा मुद्दा तितका महत्त्वाचा नाही . तर पक्ष उभारणीचा आहे . उत्तर प्रदेशात मायावती यांनी क्रांती घडवली . भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यां दोन्ही पक्षांना आडवे पाडून सत्ता मिळविली . मायावती यांचा प्रयोग इतर राज्यातही यशस्वी होऊ शकतो . महाराष्ट्रात त्यांनी पाय रोवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत .

राज्यातील बहुजन समाजाने मायावतींचा वाढता प्रभाव लक्षात घेतला पाहिजे . मायावती प्रभावी होत आहे असे लक्षात आले तर किमान रिपब्लिकन पक्षाचे नेते स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ सोडतील , अशी अपेक्षा करायला हरकत नाही . आजच्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न हीच बाब महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल 

No comments:

Post a Comment