Thursday 12 September 2013

डॉ. बाबासाहेबांची इतर रूपेही महत्त्वाची

 प्रकांडपंडित, कायदेतज्ज्ञ, प्रखर समाजसुधारक, जाज्वल्य देशभक्त, प्रगल्भ समाज अभ्यासक आणि व्यासंगी अर्थतज्ज्ञ हे बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे इतर आया’ ‘घटनाकार’ या त्यांच्या सर्वोच्च उपाधीपायी झाकोळून गेलेले आहेत.
मुळात डॉ. बाबासाहेब हे खंदे अर्थतज्ज्ञ होते. ते बहुविद्याशाखीय पंडित होते. इतिहास, कायदा, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, नीतीशास्त्र, भाषाविज्ञान यासारख्या अनेक विद्याशाखांचे त्यांना सखोल ज्ञान होते, गती होती.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अव्वल दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. ही बाब अर्थशास्त्राचा अभ्यास करणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना तरी माहीत आहे का? उच्च शिक्षणाच्या प्रांतात बाबासाहेबांनी संपादन केलेल्या तिन्ही पदव्या अर्थशास्त्रातील होत्या. या पदव्या आणि त्या संपादन करण्यासाठी बाबासाहेबांनी अफाट अभ्यास, अठरा - अठरा तास अभ्यास, तोही अर्धपोटी राहून केला, त्याला तोड नाही.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाची एम. ए. ची पदवी प्राप्त करून घेण्यासाठी ‘ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ न्यू ईस्ट इंडिया कंपनी’ या शीर्षकाचा छापील ४२ पानांचा शोधनिबंध बाबासाहेबांनी १९१५ साली सादर केला. त्यावेळी ते २४ वर्षांचे होते. भारतात बस्तान बसल्यानंतर इ. स. १७९२ ते १८५८ या काळादरम्यान ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापन आणि वित्त व्यवहार यात घडून आलेले बदल व त्या बदलांचा हिंदुस्थानातील जनतेवर झालेला परिणाम यांचा ताळेबंद बाबासाहेबांनी या संशोधनपर निबंधात मांडला होता. त्यानंतर दोनच वर्षांनी १९१७ साली बाबासाहेबांनी त्यांचा पीएच. डी चा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. ‘इव्हॉल्युशन ऑफ प्रॉव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ हे त्या प्रबंधाचे शीर्षक. हाच प्रबंध पुढे पुस्तकरूपाने प्रकाशित झाला.
त्यानंतर चारच वर्षांनी म्हणजे १९२१ साली डॉक्टर ऑफ सायन्स ही तिसरी पदवी संपादन केली ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्वविख्यात संस्थेतून. ‘प्रॉब्लेम ऑफ द रूपी ः इट्‌स ओरिजिन अँड इट्‌स सोल्यूशन’ हा भारतीय चलनाच्या उत्क्रांतीचा आलेख रेखाटणारा शोधप्रबंध सादर केला. तो पुढे १९२३ साली पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.
डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी) ही पदवी प्राप्त करणार्‍या डॉ. बाबासाहेबांचा सन्मान लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स संस्थेने डॉ. बाबासाहेबांचा पुतळा संस्थेच्या प्रवेशद्वारावरच उभारलेला आहे व त्यांच्या नावे अभ्यासकेंद्रही सुरू केले आहे.
आणखी एक महत्त्वाची घटना ः ज्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब शिकले, त्या विद्यापीठाला २५० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ या विद्यापीठात अध्ययन करून गेलेल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात पहिला क्रमांक डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा! नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठ, न्यूयॉर्क येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
बाबासाहेब केवळ अर्थशास्त्राचे अभ्यासक नव्हते, तर शास्त्रीय निकषांवर अधिक कल्याणकारी समाजरचना कशी करता येईल, याची मांडणी करणारे थिअरिस्ट होते. आपले सामाजिक तत्त्वज्ञान सांगताना डॉ. आंबेडकर यांनी ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता’ यांचा उल्लेख केला, तथापि माझ्या तत्त्वांची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. मी माझे गुरू बुद्ध यांच्या शिकवणीतून ती घेतली आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बुद्ध, कबीर यांना गुरू मानणारे बाबासाहेब गांधींना एकदा म्हणाले होते, ‘‘गांधीजी, मला मातृभूमी नाही. ज्या देशातील माणसे आम्हा वंचितांना जनावरासारखे हीन समजतात, त्या देशाला मी आपला कसा म्हणू? तरीही मी या देशाच्या अखंडतेसाठी व कल्याणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत माझे प्राण अर्पण करीन, कारण मी प्रथमतः भारतीय व अंतिमतःही भारतीयच आहे.’’
बुद्धाच्या न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुभाव या मूल्यांच्या पायावर त्यांनी भारताचे संविधान निर्माण केले. राष्ट्रध्वजावर बुद्धाचे धम्मचक्र आणले. चार सिंह असणार्‍या अशोक स्तंभाला त्यांनी राष्ट्रप्रतीक म्हणून मान्य करवून घेतले.
बाबासाहेब सांगतात - लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये. दडपलेला वर्ग असता कामा नये. ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत व एक केवळ ओझ्याचा बैल आहे, असे समाजामध्ये वर्ग असता कामा नयेत. समाजाच्या या व्यवस्थेत, पद्धतीत व विभाजनात रक्तरंजित क्रांतीची बीजे असतात आणि कदाचित हे दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होईल. वर्गावर्गांत खोलवर रुजलेली फाटाफूट हाच लोकशाहीच्या यशातील सर्वांत मोठा अडथळा आहे.
बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात सुमारे तीस ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिले. त्यापैकी काही महत्त्वाचे ग्रंथ ‘ऍनिहिलेशन ऑफ कास्ट’, ‘बुद्ध अँड हीज धम्म’, ‘दी अनटचेबल्स’, ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’, ‘थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेटस् अँड मायनॉरिटीज’, ‘फॉल्स ऑफ हिंदू वुमेन’, ‘कास्ट इन इंडिया’, ‘रीडल्स इन हिंदुझम’, ‘बुद्ध और कार्ल मार्क्स’ वगैरे.
अर्थात, विद्यार्थी दशेत असताना - वय वर्षे २४ ते ३० च्या दरम्यान त्यांनी जे संशोधन करून प्रबंध लिहिले, त्या प्रकारचे लिखाण निर्माण करणारे आणि ते सिद्धांत प्रत्यक्षात मानवासाठी कार्यरत करणारे या जगात विरळाच!
डॉ. बाबासाहेब व्हाईसरॉयच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून १९४२ ते १९४६ या काळात कार्यरत असताना कामगारांच्या विषयक विविध बाबी त्यांच्या अखत्यारित होत्या. आज आपल्या देशात कामगारांसाठी ज्या संस्थात्मक व्यवस्था कार्यरत आहेत, त्यांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब होत. कामगारांच्या हितासाठी कायदे तयार करणे, मुख्य कामगार आयुक्त ही संस्था निर्माण करणे, रोजगार विनिमय केंद्रांची आज देशभरात कार्यरत असणारी संस्थात्मक यंत्रणा ही बाबासाहेबांची निर्मिती आहे.
कामगार कल्याणाच्या जोडीनेच पाणी आणि वीज हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे ठरतात. एकापेक्षा अधिक राज्यांचा समावेश असणार्‍या नदी खोर्‍यांच्या विकासासाठी नदी खोरे प्राधिकरणासारख्या संस्थांची निर्मिती घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या कायदेपटुत्वाचा प्रगल्भ वापर केला. भाक्रा - नांगल, दामोदर व्हॅली, महानदी तसेच सोन या नद्यांच्या खोरे क्षेत्रातील बहुपयोगी नदी व धरणविकास प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणार्‍या संस्थात्मक यंत्रणांची निर्मिती ही सगळी बाबासाहेबांच्या दूरदृष्टीची आणि घटना व कायदा यांच्या सखोल व्यासंगाची परिणती होय.
भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशाचे ऐक्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार ताकदवान अनिवार्य असते असा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता. परंतु राज्य सरकारे सर्वस्वी परावलंबी असणे हेही ऐक्याच्या दृष्टीने हितकारक नाही याचे भान त्यांना पुरेपूर होते. त्यामुळे देशाच्या एकात्मतेचे संरक्षण करण्यासाठी प्रबळ असणारी केंद्र सत्ता आणि त्याचवेळी राज्यांची कार्यकारी, तसेच वित्तीय स्वायत्तता जपण्याचा तोल सांभाळत केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांचे परावलंबन परस्परपूरक ठरेल याची दक्षता बाळगणे संघराज्यव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे ठरते. कार्यकारी तसेच वित्तीय सत्तावाटपाचे संतुलन टिकवण्याच्या कामी अतिशय जोखमीची जबाबदारी पार पाडणार्‍या वित्त आयोगासारख्या व्यासपीठाची निर्मिती भारतासारख्या संघराज्यव्यवस्थेत अत्यावश्यक आहे ही भूमिका बाबासाहेबांनी तडीस नेली.
डॉ. बाबासाहेबांची एकूण जीवनगाथा म्हणजे एक महाकाव्य, महानाट्य आहे. राष्ट्रनिष्ठेचे एक जाज्वल्य, उत्तुंग उदाहरण आहे. अपरंपार अवहेलना, उपेक्षा पचवीत त्यांनी आपल्या ६५ वर्षांच्या जीवनात भारताच्या सर्वांगीण, समतोल विकासासाठी बहुमोल योगदान दिले त्याला तोड नाही. माझ्या राष्ट्रभक्त वडिलांच्या सावलीत मी वाढले. माझ्या वडिलांकडून मला बाबासाहेबांबद्दल माहिती मिळाली व माझ्या मनात बाबासाहेबांविषयी आदराचे स्थान निर्माण झाले. आजवरची माहिती ही वरवरची होती, पण आत्ता आत्ता बाबासाहेबांच्या बाबतीत अधिक माहिती मिळाली. काही लेखांमधून, काही संभाषणांतून.
मनात आले, जे मला माहीत झाले, ते गोव्यातील सुजाण वाचकांना, विशेषतः महाविद्यालयीन, विद्यापीठीय विद्यार्थ्यांना, राजकारण, समाजकारणात सक्रिय असलेल्या बंधुभगिनींना सांगावे. म्हणून मी वाचलेल्या, मला कळलेल्या माहितीचे एक प्रकारे थोडक्यात येथे संकलन केले. वाचकांना आवडेल असा विश्वास आहे.



(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

No comments:

Post a Comment