एका रात्रीत अण्णांना देवत्व बहाल करण्यात आले. आण्णा म्हणजे या देशातील सर्व सामन्यांचे मसीहा, तारणहार अशा प्रकारची मांडणी केली गेली. काही उत्साही अण्णाप्रेमी तर घोषणाच देत होते, ‘अण्णा हजारे आंधी है, देश कें दुसरे गांधी है’. गांधींना पण बरे वाटले असेल...चला एकदाचा दुसरा गांधी तयार झाला (कि केला) तर...समाजात अण्णा हजारे म्हणजे दुसरे गांधी आहेत असे मानून त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची भरपूर चर्चा केली गेली.
अण्णा हजारे यांनी जे उपोषण केले ते तत्कालीन मसुद्यात थोडे बदल करून मंजूर करण्यासाठी. त्यासाठी विश्वचषक स्पर्धा आणि आय.पी.एल. यामधील आठ दिवसांचा कालावधी वापरण्यात आला. कारण क्रिकेटचे सामने सुरु असताना जर अण्णांनी उपोषण केले असते तर भ्रष्टाचाराची चीड (?) असणारी जनता क्रिकेट सोडून आण्णांच्या पाठीमागे उभी राहिली नसती. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आण्णांनी उपोषणाचे रणशिंग फुंकले. अण्णाच्या समर्थनासाठी देशभरातून किती पाठींबा मिळाला हे नक्की सांगता यायचे नाही. कारण १०० लोक समोर असताना दहा हजार लोक होते असे सांगून एखाद्या गोष्टीला मोठे समर्थन मिळवून देण्यात (किंवा तसे चित्र निर्माण करण्यात) मनुवादी प्रसारमाध्यमे वाकबगार आहेत. इलेक्ट्रोनिक मिडीयाने तर आण्णांना एकदम National Hero बनवून टाकले. संपूर्ण देश आण्णांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. त्यासाठी प्रिंट मेडीयापासून इंटरनेटपर्यंत सर्व प्रचारयंत्रणा पद्धतशीरपणे राबवली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘जेव्हा ही मनुवादी प्रसारमाध्यमे माझी स्तुती करतात तेव्हा मी कुठेतरी चुकतोय असे मला वाटते. परंतु जेव्हा ते माझ्यावर टीका करतात तेव्हा मी बरोबर आहे याची मला खात्री पटते.’याचा अर्थ असा कि ब्राम्हणी व्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीला सकारात्मक प्रसिद्धी ही मनुवादी माध्यमे देत नाहीत. त्यामुळे ज्याअर्थी ते आण्णांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठींबा देत आहेत त्याअर्थी नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. आपला समाज अतिशय भोळसट आहे. पेपर मध्ये छापलेले किंवा टीवीवर दाखवलेले सर्व खरे आहे असे समजण्याची घोडचूक ते नेहमी करतात. त्यामुळे मेडीयाने आण्णांना हिरो बनवताच सामान्य लोकांना अण्णा म्हणजे देवमाणूस वाटू लागतात. अण्णांच्या आंदोलनाची चिकित्सा न करता समाज त्यात भरकटत जातो. इतका भरकटत जातो कि अण्णांच्या आंदोलाची चिकित्सा करणे म्हणजे देशद्रोह मानला जातो.
आजवर अण्णांनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी (?) अनेक आंदोलने केली. पण आत्तापर्यंत त्यांनी ठराविक नेत्यांना टार्गेट केले आहे. इतर नेत्यांकडे अण्णांनी दुर्लक्ष केले. अण्णांनी कधीतरी बाळ ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, अडवाणी, मोदी यांच्याविरुद्ध बोलावे. का ही सर्व मंडळी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहेत का ? आण्णा त्यांना तसे सर्टिफिकेट देणार का ? नाहीतर शरद पवारांवर तोंडसुख घ्यायचे आणि मोदींची स्तुती करायची यामागचे राजकारण न कळण्याइतपत आम्ही दुधखुळे नाही. भ्रष्टाचार हा काही व्यक्ती किंवा काही क्षेत्रांपुरता मर्यादित नाही. समाजातील सर्व स्तरात, सर्व क्षेत्रात भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मोहरे या भ्रष्टाचाराच्या गंगेत आकंठ बुडालेले आहेत.
कालचीच बातमी....साई मंदिरात तीन दिवसात तीन कोटी रुपये जमा झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पैशाचा विनियोग कसा केला जातो ? भारतातील अनेक मंदिरे गर्भश्रीमंत आहेत. या मंदिरात देणगीच्या रुपाने अब्जावधी रुपये आणि सोने-चांदी जमा होते. गोरगरीब भाविकांचा पैसा हा निर्जीव दगडासमोर जमा होतो. हा सर्व पैसा कसा, कुठे आणि कुणासाठी वापरला जातो हे मंदिराच्या विश्वास्तांनाच माहित. मंदिरात चालणाऱ्या या भ्रष्टाचाराची बरोबरी कोणत्याही क्षेत्रातील भ्रष्टाचाराशी होणार नाही. त्यामुळे अण्णांनी एकदा आपला मोर्चा भारतातील मंदिराकडे वळवावा अशी अण्णांना विनंती आहे. त्याची सुरुवात शिर्डीच्या साई मंदिरापासून केली तरी चालेल.
अण्णांनी कधीतरी धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातील भ्रष्ट लोकांविरुद्ध बोलावे. अनेक बुवा-बाबा-मातांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या आश्रमांतून अनेक काळे धंदे चालतात. त्यांच्या ट्रस्टच्या नावे हजारो एकर जमिनी आहेत. त्याकडेही अण्णांनी लक्ष द्यावे. यातील बरेच जण जंतर-मंतरला आण्णांच्या मांडीला-मांडी लावून बसले होते. भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांना समर्थन देत होते. याचे गौडबंगालही आम्हाला समजून घ्यावे लागेल.
भ्रष्टाचार कोणत्याही क्षेत्रातील असुदे, कोणीही करूदे, त्याचे समर्थन होणार नाही. संपूर्ण भारताला भ्रष्टाचाराने पोखरून काढले आहे. आपल्याकडे भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे नाहीत असे नाही. परंतु जे कायदे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होते का हा संशोधनाचा विषय आहे. नुसते कायदे करून कोणताही गैरव्यवहार थांबलेला नाही. कायदे करणाऱ्यांना त्यातून पळवाटा कशा काढायच्या हे चांगलेच ठावूक असते. हे गैरव्यवहार रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टींची सांगड घातली पाहिजे.
(सदर लेख इथून संकलित केला आहे.)
No comments:
Post a Comment