डाँ. बाबासाहेब आंबेडकर - राष्ट्र आणि राष्ट्रवाद विचार
राष्ट्र आणि राष्ट्रवाद यासंबंधीचे विचार हा आंबेडकरांच्या राजकिय चिँतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. 'थाँट्स आँन पाकिस्तान', 'स्टेट्स अँण्ड मायनाँरिटीज','अँनिहिलेशन आँफ द कास्ट अँण्ड रानडे, गांधी अँण्ड जिना' या त्यांच्या ग्रंथांतून त्यांचे राष्ट्रवादासंबंधीचे विचार व्यक्त झाले आहेत. राष्ट्रवाद हि एक व्यक्तिनिष्ठ भावना असुन तिचा संबंध मानवी मनाशी आहे अशी आंबेडकरांची भूमिका होती. त्यांच्यामते या भावनेचे सामर्थ्य अगाध असून तिची मुळे खुप चिवट असतात. मोठाली साम्राज्ये उलथून पाडणे तिला सहज शक्य होते. कोणी तिला कितीही विवेकशून्य प्रवृत्ती म्हणो वा शुद्ध भ्रामक कल्पना म्हणो ती एक अतिप्रवृत्त शक्ती असुन तिचे निराकरण हि अशक्यप्राय गोष्ट आहे. या भावनेने जगाच्या इतिहासात हिँसाचारी हाहाकार जसे घडवून आणले तसेच राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे संपादन संरक्षणही केले. ती विध्वंसक तितकीच विधायक शक्ती आहे. आर्थिक विषमता, सामाजिक उच्चनीचता आणि तत्सम सर्व विभाजनकारी भेदभावांवर मात करुन समाजाचे ऐक्य बळकट करण्याचे सुप्त सामर्थ्य राष्ट्रवादाच्या ठिकाणी असते, याची जाणीव आंबेडकरांना होते. परंतु काहिकाळ असे होत असले तरी भेदभाव दडपणारा हा राष्ट्रवाद टिकाऊ कधीच होऊ शकत नाही याची त्यांना खात्री होती.
आंबेडकरांच्या राष्ट्रवादाचा उगम दलित शोषितांविषयीच्या कळवळ्यात होता. समानसंधी व मानवी हक्क अनेक शतकांपासून ज्यांना नाकारण्यात आले हे वर्ग मानवी अस्तित्वालाही पारखे झाले आहेत. त्यांना जोपर्यँत दास्य दारिद्रयातुन मुक्त केले जात नाही तोपर्यँत हे राष्ट्रजीवनाशी समरस्य होण्याची मुळीच शक्यता नाही. केवळ स्वातंत्रप्राप्ती झाल्याने या वर्गाची स्थिती सुधारणार नाही अशी खात्री असल्यामुळे राजकिय स्वातंत्र्याची मागणी पुढे रेटणाय्रा स्वातंत्र्यचळवळीशी सहकार्य करणे आंबेडकरांना शक्य झाले नाही. ब्रिटिश राजवटिवर सडेतोड टिका आंबेडकरांनी केली आहे आणि राजकिय स्वातंत्र्याचेही ते पुरस्कर्ते होते. फरक फक्त एवढाच होता कि देशाचे स्वातंत्र्य आणि जनतेचे स्वातंत्र्य असा फरक ते करत होते. अनेक स्वतंत्र देशाची जनता परतंत्र असते. परके राज्यकर्ते निघून गेल्यानंतरही त्या जनतेची गुलामगिरी कायम राहते. अमेरिकेतील नीग्रोंचे उदाहरण देऊन आंबेडकरांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे.
देशातल्या सर्व वर्गांना विशेषत: जे तळागाळात रुतलेले वर्ग आहेत त्यांना स्वातंत्र्याचे लाभ मिळाल्याखेरीज ते खरेखुरे स्वातंत्र्य असुच शकत नाही अशी आंबेडकरांची धारणा होती. सर्वसामान्य जनता जेव्हा गरज, भय, छळ आणि शोषण यापासून मुक्त असते तेव्हाच खरे स्वातंत्र्य उभे राहते. न्याय्य तत्त्वांच्या आधारे सामाजिक आणि आर्थिक फेररचना घडून आल्याखेरीज हे होणे अशक्यच असते आणि अशी फेररचना झाल्याखेरीज खरा एकनिवासी समाज निर्माण होऊ शकत नाही. एकजिनसी समाज जर नसेल तर राष्ट्रबांधणी यशस्वी होण्याची मुळीच शक्यता आंबेडकरांना दिसत नाही.राष्ट्रनिर्मितीच्या संदर्भात या देशाची सद्यस्थिती आंबेडकरांना अनेक दृष्टींनी असमाधानकारक दिसत होती. जातीयता हा त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या आड येणारा सर्वात मोठा अडथळा दिसत होता. जातियतेमुळे या समाजाच्या सहजीवनाला तडे पडत असुन त्याची प्रगती व स्थैर्य धोक्यात आले आहे. इथली जातिव्यवस्था केवळ श्रमविभागणी करुन थांबत नाही तो श्रमिकांचीच अनैसर्गिक विभागणी करुन ठेवते. श्रमिकांची उच्चनीचतेवर आधारित उतरंड रचते हि श्रमविभागणी स्वाभाविक गुण वा क्षमता पाहून होत नसून जन्माद्वारे होते. कर्मसिद्धांत हा तिचा पाया असतो. रोटिबेटी व्यवहारावर बंदी आणून या जातिव्यवस्थेने हिँदूंचा वंशच खुजा व खुरटा करून सोडला आहे. हिँदूचे विघटन करुन नीतिधैर्य तिने कोसळवले आहे. जातीपोटजातीत विभक्त विदीर्ण झालेल्या या समाजात एकजूट अशक्या झाली आहे. व्यक्तीचे औदार्य, दायीत्त्व, सत्कृत्य, निष्ठा, नीतिमत्ता या सगळ्याच गोष्टी जातीपुरत्याच सीमित झाल्यामुळे इथले सामाजिक जीवनच संपुष्टात आले आहे. भिन्न रुची व हितसंबंध असलेल्या व्यक्तीँना जातिव्यवस्थेचे उगाच कृत्रिम कोँदणात बसवले आहे. जातीय भावनेतून निर्माण झालेल्या संस्था व चालिरिती सुसभ्य, संघटित व समर्थ समाजाच्या उभारणीच्या दृष्टीने कुचकामी आहेत. तेव्हा आंबेडकरांच्या मते जातिनिर्मूलनाखेरीज या देशात राष्ट्रबांधणी हि गोष्ट अशक्यप्राय आहे.
आंबेडकरांना अभिप्रेत असलेले राष्ट्रैक्य केवळ राजकिय नव्हते तर आत्मिक सांस्कृतिक स्वरुपाचे होते. मानसिक एकात्मतेतून साध्य होणारे सामाजिक ऐक्य त्यांना हवे होते. भ्रातृभावाच्या प्रखर जाणिवेत परस्परबद्ध झालेला लोकसमुदाय अशीच ते राष्ट्राची व्याख्या करतात.
राष्ट्रवादाचे आक्रमक व जुलमी स्वरुप आंबेडकरांना मान्य नव्हते. त्यांच्या राष्ट्रवादाला आंतरराष्टवादाचा सतत स्पर्श झाला होता. दहशतवादाचा पुरस्कार करणारा, देशभक्तीच्या आंत्यंनिकतेपोटी अन्यदेशीयांचा द्वेष पिकवणारा, संकुचित राष्ट्रवाद आंबेडकरांनी कधीच समर्थनीय मानला नव्हता. आंबेडकरांचा राष्ट्रवाद धर्मनिरपेक्ष, बुद्धिप्रामाण्यावादी व पुरोगामी होता तसाच तो शांततावादी व अनाक्रमही होता. परकिय राजवटिइतकेच भारतीय कट्टर सनातनीपणालाही त्यांनी धारेवर धरले आहे. राष्ट्रवादाच्या नावाने प्राचीन भारतीय परंपरांचे आंधळे पुनरुज्जीवन करणे आंबेडकरांना साफ नामंजूर होते. हिँदू राष्ट्रवाद ही संज्ञा त्यांना निरर्थक वाटते. देशात बहूसंख्येने असणारे सर्वाँशी राष्ट्रवादाची सांगड घालणे त्यांना मान्य नव्हते. अल्पसंख्यांकांनी सत्तेत भागिदारी मागितली कि त्याला जमातवाद कि सांप्रदायिकता ठरवायचे आणि बहूसंख्याकिती धार्मिक आधारावर सत्ताकारण केले कि त्याला मात्र राष्ट्रवाद म्हणायचे यावर आंबेडकरांनी टिकास्त्रे सोडले होते. भारताचा राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षच असावा असा त्यांचा आग्रह होता.
No comments:
Post a Comment