Thursday, 12 September 2013

मातंग समाजाची चळवळ: पाया आणि इमारत

आत्मभान आलेल्या लोकांनी सामूहिकपणे रक्तविहीन मार्गाने परिवर्तन करण्यासाठी आणि मानवी जीवन बळकट करण्यासाठी विविध माध्यमांतून सुरु ठेवलेला लढा म्हणजे चळवळ. परिवर्तन, संघटित प्रयत्न,तात्विक बैठक, विशिष्ट ध्येय, जागृत समाजमन,ऊर्जा केंद्र आणि कृतिशीलता या आधारे चळवळ आकारास येत असते. परिवर्तन हा कोणत्याही चळवळीचा गाभा असतो. समाज, संस्कृती, राजकारण, शिक्षण, धर्मव्यवस्था अशा किती तरी व्यवस्था असतात की ज्यामध्ये परिवर्तनाची गरज भासत असते. ज्या सामाजाचे आत्मभान जागृत झालेले असते. तो समाज चळवळ उभा करतो.
ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याने चळवळीला पोषक असे विचार मांडले. त्यातून चर्चच्या पुनर्घटनेची चळवळ वाढली. पुढे युरोपात धर्मसुधारणेची चळवळ सुरू झाली. 1979 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती होऊन ‘मानवी अधिकाराचा जाहीरनामा’ घोषित केला. 1848 मध्ये ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टोच्या माध्यमातून ‘मार्क्सवादी चळवळ’ उदयास आली. अमेरिकेतील निग्रो वंशाच्या लोकांनी समानतेच्या हक्कासाठी चळवळ सुरू केली. भारतात इ. स. पूर्व पाचव्या शतकात गौतम बुद्धाने वैदिक व्यवस्थेविरूद्ध विचार मांडून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ चा संदेश दिला; ही एक चळवळच होती. पुढे चक्रधर, शिवाजी महाराज, गुरू घासिदास, बिरसा मुंडा, हरिश्‍चंद्र ठाकूर यांची प्रेरणा मिळालेल्या चळवळी उभ्या राहिल्या. या सर्वांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऊर्जा केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या चळवळीने सर्वगामी परिणाम केल्याचे आढळते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आणि राजकारणातला उदय म्हणजे भारतीय इतिहासासाठी क्रांतिकारक वास्तव आहे. त्यांच्यामुळे वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र ठरविलेल्या प्रत्येक जातीतील माणसांसाठी आत्मभान, स्वाभिमान आणि माणूस म्हणून जगण्यासाठीचे मार्ग खुले झाले. त्यांचे राजकारण आणि समाजकारण हे एका जातीपुरते मर्यादित नव्हते. असे असूनही त्या काळात अस्पृश्य आणि शूद्र मानलेल्या कित्येक जातींनी बाबासाहेबांचे नेतृत्व स्वीकारले नाही. त्यामध्ये चांभार आणि मातंग या जाती आघाडीवर होत्या. विविध चळवळी उदयास आल्या परंतु,मातंग समाजाची चळवळ ज्या पायावर उभा राहिली तो पाया आणि इमारत याचा बारकाईने विचार होणे गरजेचे आहे. त्यापूर्वी मातंग समाज आणि बाबासाहेब यांच्यातील परस्परांसंबंधाचाही शोध घेतला पाहिजे.

भारतीय समाजव्यवस्थेचे अत्यंत महत्वाचे वैशिष्टये म्हणजे कोणत्याही जाती परस्परांत मिसळू नयेत. प्रत्येक जात कोणत्या तरी जातीपेक्षा श्रेष्ठ आणि कनिष्ठ असते. त्यामुळे कनिष्ठतेकडून वरिष्ठतेकडे जायची इच्छा असूनही वरिष्ठवाले कनिष्ठांना स्वीकारत नाहीत. हे वास्तव्य मातंग जातीसाठी लागू पडते. महार जात स्वत:ला मातंगापेक्षा श्रेष्ठ समजते.त्यामुळे मातंगांच्या मनात महार जातीविषयी आकस असणे साहजिक आहे. शूद्र आणि अस्पृश्य मानलेल्या जातीचे एक समान दुखणे होते; उच्च मानलेल्या जाती त्यांना तुच्छ, मागास, पशू म्हणून वागवत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व जातींची दास्यत्वापासून मुक्ती करण्यासाठी चळवळ उभी केली. त्यांना माहीत होते की अस्पृश्य मानलेल्या जातींमध्ये परस्पर जातिभेद पाळला जातो. ते म्हणत, ‘‘जातिभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गाच्या हिंदुनी घालून दिलेला आहे.’’1) पुढे ते असेही म्हणत,’’ आपण जातिभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो म्हणून.’’
2) बाबासाहेबांचे हे विचार भारतीय समाजावर प्रकाश टाकतात.
एका विशिष्ट जातीतील लोक एकत्र येऊ शकतात परंतु, त्यामुळे व्यापक संघशक्ती निर्माण होत नाही. त्यासाठी वर्णव्यवस्थेला बळी पडलेल्या सर्व जातींना एकत्र आणून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न डॉ. आंबेडकरांनी केला.आरंभी बाबासाहेबांना त्यामध्ये प्रचंड सहकार्यही मिळाले. ‘महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह’, ‘काळाराम मंदिर प्रवेश’, ‘मनुस्मृती दहन’ अशा सत्याग्रहाबरोबर त्यांनी धर्मांतराची घोषणाही केली होती. त्यांच्या प्रत्येक सत्याग्रहामध्ये महार जात सहभागी असणे साहजिक. कारण ते महार जातीत जन्माला आले होते. परंतु चांभार आणि मातंग अशा कितीतरी जातीतील लोक त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. दादर नायगांव मुंबई चे 2 जून 1936 रोजी आखिल मुंबई इलाखा मातंग परिषदेचे अधिवेशन पार पडले. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेला पाठिंबा देण्यासाठी मातंग बांधवांची परिषद झाली. त्यात सात ते आठ हजार मातंग स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी दौलतराव चिलोबा वायदंडे होते. या परिषदेतला दुसरा ठराव असा होता. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेवर मातंग समाजाचा पूर्ण विश्‍वास असून त्यांचेबरोबर मातंग समाज सामुदायिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे.’
3) या वेळी बाबासाहेबांनी भाषण केले. ते म्हणाले,’’ मी आज या सभेत बोलण्याकरिता जो उभा आहे. तो फक्त महार-मांग समाजात एकोपा कसा व्हावा हे सांगण्याकरिता उभा आहे.’’
4) वेगवेगळ्या जातींमध्ये एकोपा असल्याशिवाय चळवळीचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही यावर त्यांचा ठाम विश्‍वास होता. सर्व अस्पृश्यांनी धर्मांतर केल्याशिवाय जातिभेद मोडू शकणार नाही असे त्यांना वाटत होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या समकाळात मातंग समाजामध्येही सुधारणेबाबतची प्रक्रिया सुरू होती. परंतु, नेमकी कशाबाबत सुधारणा होणे गरजेचे आहे. याविषयी निश्‍चित भूमिका नव्हती. जोतीराव फुले यांच्या शाळेतील विद्यार्थीनी मुक्ता साळवे हिच्या निबंधात काही एक दृष्टिकोन आढळतो. ‘मांग-महारांच्या दु:खाविषयी निबंध’ हा 1855 मध्ये ‘ज्ञानोदया’तून प्रकाशित झाला. त्यात मुक्ता साळवे हिने मांग आणि महार या जातींचा एकत्र विचार केला आहे. स्वत: मातंग जातीत जन्मलेल्या मुक्ताचा हा व्यापक दृष्टीकोन दोन जातींमधील एकोपा व्यक्त करणारा आहे. परंतु बाबासाहेबांच्या समकालीन मातंग समाजाची चळवळ मात्र ही दृष्टि बाळगताना दिसत नाही. याविषयी बाबासाहेब म्हणतात, ‘‘मांग समाजात जी सुधारणेची चळवळ चाललेली आहे त्या चळवळीचे बारकाईने निरीक्षण केले असता असे दिसून येईल की, त्या चळवळीचा सारा कटाक्ष महार लोकांच्याविरूद्ध आहे.’’
5) बाबासाहेबांचे नेतृत्व स्वीकारणारा मातंग समाज महार समाजाविषयी मात्र सख्य राहावे अशा भूमिकेतून विचार करीत नव्हता. किंबहुना महार समाज तरी मांग व इतर जातींबरोबर सख्याने वागत होता का? याचे उत्तरही नाही असेच द्यावे लागते. पुणे येथे 7 नोव्हेंबर 1937 रोजी भंग्यांच्या वस्तीत बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘आम्ही जसे ब्राम्हणासंगती मिळून मिसळून वागण्यास पाहतो तसेच महारांनी, भंगी, मांग यांच्यात मिसळून वागले पाहिजे, नाही तर मी महारांकरिता काही करणार नाही.’’
6) यावरून मांग व महार या जाती त्यावेळी परस्पर सख्याने वागत नव्हत्या असे म्हणता येते. बाबासाहेबांच्या विचार कृतीला मात्र मांग समाज पाठिंबा देताना आढळतो.
सर्व अस्पृश्यांनी धर्मांतर केले पाहिजे किंवा मांगांनी नुसतेच मांग म्हणून राहणे यात काहीही हशील नाही असे बाबासाहेब सांगत होते. ते ज्या गावात जात तेथील मातंग समाज त्यांचे आनंदाने स्वागत करीत असत. 23 जानेवारी 1937 रोजी सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मातंग समाजाचे केरू रामचंद्र जाधव म्हणाले, ‘‘बाबासाहेब हेच आमचे पुढारी, हेच आमचे धर्माधिकारी व हेच आमचे पूज्य दैवत आहेत आणि मातंग समाज त्यांचा एकनिष्ठ अनुयायी आहे. ही गोष्ट मुंबईत झालेल्या इलाखा मातंग परिषदेने सिद्ध केलेली आहे.’’
7) टेंभुर्णी येथील मातंग समाजाने चावडीसमोर शोभिवंत मंडप उभारून बाबासाहेबांचे स्वागत केले होते. हे वास्तव एका बाजूला आहे तर दुसर्‍या बाजुला काही संघटना बाबासाहेबांचे नेतृत्व मानण्यास तयार नव्हत्या.
1940 मध्ये नागपूर येथील ‘नवमतवादी मातंग समाज’ यांच्या वतीने मध्य प्रांत वर्‍हाड महारेतर ‘हरिजन’ परिषद ही कौंडण्यपूर येथे भरविण्यात आली. त्या परिषदेतील पास करून घेतलेला एक ठराव असा होता-‘महार समाज महारेतर हरिजनांची पिळवणूक करितो; डॉ. आंबेडकर हे महारेतर हरिजनांचे पुढारी नव्हेत.’
8) याच काळात 30 मे 1941 रोजी परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील शिक्षित तरूण देवीदास नामदेव कांबळे यांनी बाबासाहेबांना पत्र पाठवून ‘मातंग समाजाच्या सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे,’ असे म्हणतो. या पत्रात काही अटी घातल्या आहेत. उदा. मातंग समाजास महार समाजाने बरोबरीच्या व समानतेच्या नात्याने व बंधुभावाने वागवावे, मातंग समाजातील होतकरू मनुष्याला पुढे येण्यास वाव द्यावा, मातंग लोकांचा नवरा वेशीमध्ये अडवू नये व समारंभ व मिरवणुकी यामध्ये अडथळे आणू नये, आपण महार समाजाच्या सुधारणेची जशी काळजी घेतात तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कळवळ मातंग समाजाबद्दल घेणे… याशिवाय महार समाजाप्रमाणे आपल्या फोटोचे पूजन मी मातंग समाजास करू देणार नाही, अशा अटी घालून देवीदास कांबळे म्हणतात, ‘‘या सर्व अटी मान्य असतील व आपणास आखिल भारतीय अस्पृश्य समाजाचे पुढारीपण करावयाचे असेल तर मी आपला शिष्य होण्यास तयार आहे.’’
10) या पत्रास बाबासाहेबांनी 13 जून 1941 रोजी उत्तर देऊन आपली भूमिका मांडली हा भाग वेगळा. मात्र या पत्रातून काही बाबी सूचित होतात, त्या महत्त्वाच्या आहेत. मातंग समाजाने स्वतंत्रपणे सुधारणेसाठी चळवळ आरंभली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार आणि भूमिका मान्य असली तरी महार जातीबरोबरीने एकत्रित चळवळ पुढे न्यायची नाही. देवीदास कांबळे यांनी मांडलेल्या समस्या ह्या प्रातिनिधीक स्वरूपाच्या नव्हत्या. त्या त्या प्रदेशातील मांग-महारांचा संघर्ष हा सार्वत्रिक स्वरूपात होता असेही म्हणता येत नाही. शिवाय महार आणि मातंग समाज एकत्र येऊ नये यासाठी तत्कालीन प्रस्थापित राजकीय पक्ष कार्यरत होता. स्वतंत्रपणे चळवळ करणे हे एका व्यक्तीसाठी फलदायी होते, त्यात संपूर्ण समाजाचे हित साधले जाणार नाही याची बाबासाहेबांना कल्पना होती. त्यामुळे देवीदास कांबळे यांच्या पत्राला उत्तर देताना ते म्हणतात,
‘‘पण महारांशी काडीमोड करून केवळ सनातनी हिंदु किंवा कॉंग्रेस यांची गुलामगिरी करणे हाच जर या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर त्यांत काही मांग व्यक्तींचा लाभ होईल, पण त्यात मांग जातीचा अनर्थ आहे, यात मला तरी काही शंका नाही.’’
11) ही शंका त्याकाळी आणि पुढेही खरी ठरलेली आढळते. बाबासाहेबांनी आरंभलेल्या मानवमुक्तीच्या चळवळीमधून विविध जाती बाहेर कशा पडतील याचा प्रयत्न कॉंग्रेसने केल्याचे लक्षात येते. चांभार, मांग समाजातील शिक्षित तरूणांना पक्षातले पद देऊन आंबेडकरी चळवळीमधून तोडण्याचे प्रयत्न झाले.
अण्णा भाऊ साठे यांच्या प्रत्येक कलाकृतींमध्ये महार-मांग यांचा एकत्रित विचार केलेला आहे. त्यांच्या कथा-कादंबरीमधून मांडलेली एकजूट आंबेडकरी चळवळीला बळकटी देणारी होती; याचा विसर पडावा असे वातावरण प्रस्थापितांकडून केले जात होते. बाबासाहेबांनी त्याकाळी कॉंग्रेसला विरोध केला त्यामुळे कॉंग्रेसच्या दृष्टिकोनातून ते फक्त महारांचेच पुढारी आहेत. असा व्यूह आखण्यात आला. त्यात कॉंग्रेस यशस्वीही ठरली.फोडा आणि झोडा ही ब्रिटीशांची नीती कॉंग्रेसनेही अवलंबली होती. जाती-जातींना परस्परांपासून हेतूपूर्वक दूर करणे आणि चातुर्वर्ण्याविरोधातील चळवळ कमकुवत करणे, याला सर्व जाती बळी पडलेल्या आढळतात. त्यामुळे मातंग समाजाची स्वतंत्र चळवळ उभी राहताना त्यात मातंग समाजाचे हित आढळत नव्हते. त्यात केवळ राजकारणातला प्रवेश होता. परिवर्तन ही भूमिका अशा चळवळीत अपेक्षित करता येत नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली चळवळ ही काही तरी तत्वाला धरून होती. त्यांनी कॉंग्रेसशी तडजोड केली असती तरी लोकसभेत ते टिकून राहिले असते. परंतु त्यामुळे समाजाच्या हितासाठी काहीही करता आले नसते. चळवळ ही एकट्या-दुकट्याने करावयाची बाब नाही याची त्यांना खात्री होती. राजकारणात तर सांघिकतेला आणि ऐक्याला फार मोठी किंमत असते म्हणून ते म्हणत,‘‘ आपण आपसात एकी राखली पाहिजे. बेकी माजू देता उपयोगाचे नाही.’’
12) ऐक्य असेल तर बहुमत तयार होईल, बहुमताशिवाय राजकारण काबीज करता येत नाही. त्यामुळे एकजुटीची शक्ती आणि अभेद्य ऐक्य हे बाबासाहेबांच्या चळवळीचे प्राणभूत तत्व होते. हे तत्व कोणत्याही चळवळीला लागू पडते. मातंग समाजाने या तत्वाचा अवलंब केला होता काय? हा चिंतनाचा विषय आहे.
अस्पृश्योन्नतीच्या कार्याची आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याची चळवळ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली असे त्या काळातील लोकांचे मत होते. मात्र याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारले आहे. आपल्या पूर्वी गोपाळबाबा वलंगकर यांनी ‘अनार्थ दोष परिहार मंडळी’ (1890) ही संस्था स्थापन करून अस्पृश्योन्नतीची चळवळ सुरू केल्याचे स्वत: बाबासाहेब ‘बहिष्कृत भारत’ च्या अंकातून लिहीतात. माझ्यापासूनच चळवळीचा आरंभ झाला ही दर्पोक्ती बाबासाहेब करत नाहीत. हा मोठेपणा त्यांच्या एकूणच विचार-वर्तनाच्या केंद्रस्थानी होता. या वाटेने मातंग अथवा तत्सम जातीच्या चळवळीने जाणे आवश्यक होते. 1927 पासून 1941 पर्यंतच्या म्हणजे देवीदास कांबळे यांच्या पर्यंतच्या काळाचा विचार केला तर बाबासाहेबांनी आरंभलेली चळवळ ही अखिल भारतीय शूद्र, अस्पृश्य, दलित, मागास, भटका, आदिवासी अशा सर्वांना एकत्र धरूनच आरंभलेली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक न्याय ही त्यांच्या चळवळीची आधारमूल्ये होती, माणसाचा स्वाभिमान हे सर्व श्रेष्ठ तत्त्व होते. राजकारणाला समाजकारणाची जोड होती. राजकारणात विद्येला आणि विद्येला शील-चारित्र्याची जोड होती. एका व्यक्तीपेक्षा संपूर्ण समाजाचे हित होते. सर्वश्रेष्ठ चळवळीला आवश्यक असणार्‍या सर्वच प्राणभूत तत्त्वांचे दर्शन बाबासाहेबांच्या विचार-वर्तनात होते. या मार्गाने त्यांच्या पश्‍चातच्या चळवळीने मार्गक्रमण करणे आवश्यक होत. या पार्श्‍वभूमीवर मातंग समाजाच्या चळवळीचा पाया आणि इमारत याचा शोध घेता येतो.

अस्पृश्य मानलेल्या जातींमध्ये मातंग समाजात जन्मलेल्या आणि जोतीराव फुले यांच्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवलेल्या मुक्ता साळवे हिचा एक निबंध 1855 मध्ये ‘ज्ञानोदय’ मधून प्रकाशित झाला. ‘मांग-महारांच्या दु:खाविषयी निबंध’ हा निबंध लिहीणारी मुक्ता ही पहिली भारतीय स्त्री निबंधकार म्हणता येेते. कुणा एकाच्या सुखाकरिता असलेला धर्म हा धर्म नसतो म्हणून असा धर्म नको असे मुक्ता विचार मांडते. उच्चवर्णीयांनी अन्याय केला तर त्याविषयी दाद मागण्याची हिंमत लोकात नाही, हे वास्तव मुक्ता लिहिते. अस्पृश्यांच्या प्रश्‍नांवरील उपाय सूचविताना ती म्हणते,‘‘ अहो दरिद्रयांनी व दु:खांनी पिडलेले मांग महार लोक हो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध घ्या म्हणजे तुम्ही नीतीमान व्हाल. तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हजर्‍या घेतात त्या बंद होतील तर आता झटून अभ्यास करा….’’
13) मातंग समाजाच्या या शिक्षित मुलीने मांडलेला विचार प्रत्यक्षात चळवळीने अंगिकारणे आवश्यक होते. शिक्षण घेऊन जागृत होणे ही फार मोठी चळवळ त्या काळी होती, त्या काळी मुक्ताचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.
देवीदास नामदेव कांबळे हे मातंग समाजातील शिक्षित तरूण. पुढे ते खासदार झाले. त्यांनी 1941 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर पत्रव्यवहार केला. मुक्ताच्या विचारातील मांग-महारांची एकजूट आणि ज्ञान घेऊन नीतीमान होण्याची भूमिका देवीदास कांबळे यांच्या पत्रात आढळत नाही. बाबासाहेबांच्या चळवळीविषयी त्यांनी शंका घेतली. ‘मातंग समाजाच्या सुधारणेची सर्वस्वी जबाबदारी माझ्या शिरावर आहे’ असे म्हणून स्वत:ला मातंग समाजाचे नेतृत्व म्हणवून घेतले. पुढे त्यांनी ‘भारतीय लोकपक्ष’ स्थापन केला. बाबासाहेबांनी कॉंग्रेसला विरोध केला तर देवीदास कांबळे यांनी कॉंग्रेसला जवळ केले. महार-मांगांचा एकत्रित विचार त्यांनी स्वीकारला नाही. त्यामुळे ते एकटे खासदार पदापर्यंत गेले. परंतु, मातंग समाजाच्या हितार्थ त्यांना फारसे भरीव काम करता आले नाही. येथे कॉंग्रेसची नीती यशस्वी ठरली आणि चळवळ रोखली गेली. त्यापूर्वी तात्यासाहेब भिंगारदेवे यांनी ‘भारतीय मजदूर पक्ष’ (1965) स्थापून राजकारणात प्रवेश केला. मातंग समाजातील ते पहिले आमदार ठरले. कॉंग्रेसने त्यांनाही स्वत:कडे ओढून घेतले. या काळात के. एल. मोरे, बाबुराव भास्कर यांच्यासह मातंग समाजाच्या दहा नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला होता.
14) याविषयी गणपत भिसे यांनी एका पुस्तिकेत अत्यंत सडेतोडपणे मातंग समाजातील नेत्यांनी आरंभलेल्या चळवळीच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. पुढील काळात ‘दलित पँथर’ या संघटनेने समाजामध्ये आत्मविश्‍वासाने वाटचाल सुरू केली. गावा-गावात पँथरच्या शाखा निर्माण झाल्या. अन्यायाविरूद्ध आवाज उठविला गेला. या काळात मातंग समाजाची चळवळ ही राजकीय खुर्ची मिळविण्यापर्यंत सिमित राहिली होती. डॉ. बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. 1982 मध्ये ‘अखिल भारतीय मातंग संघ’ स्थापला. ‘मांग’ हा शब्द दूर सारून ‘मातंग’ हा शब्द स्वीकारला. मातंग समाजाच्या चळवळीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी डॉ. गोपले यांनी पुढाकार घेतला. त्यातून सरकारने ‘अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ’ निर्माण केले. मातंग समाजामध्ये परिवर्तन व्हावे यासाठी डॉ. गोपले यांनी विविध उपक्रम राबविले. मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली. प्रस्थापित सत्तेला म्हणजे कॉंग्रेसला डॉ. गोपले यांचा अडसर वाटणे साहजिक होते. ‘क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग अभ्यास आयोग’ स्थापून त्यांना उपाध्यक्ष केले. मंडळे स्थापन करून नेत्यांना शांत करणे आणि चळवळीची धग कमी करणे हे जुने शस्त्र या वेळीही उपयोगी पडले. काही एक तत्त्वाला धरून चळवळ जर वाढली नाही तर ती लगेच संपुष्टात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली व्यापक चळवळ आणि तिचा पाया मातंग चळवळीने स्वीकारला असता तर डॉ. बाबासाहेब गोपले यांना प्रचंड मोठे यश आले असते.
आज ‘दलित स्वयंसेवक संघ’ ‘बहुजन रयत परिषदेच्या’ माध्यमातून आणि कॉंग्रेसच्या मेहरबानीतून लक्ष्मण ढोबळे, ‘मानवी हक्क अभियानाच्या’ माध्यमातून ऍड. एनकाथ आव्हाड, ‘दलित महासंघा’च्या माध्यमातून प्रा. मच्छिंद्र सकटे तर विदर्भात ‘दलित समता परिषदेच्या’ माध्यमातून मधुकर कांबळे हे मातंग समाजासाठी आपापल्या परीने चळवळ राबविताना दिसतात. कांही कार्यकर्त्यांनी 1995 मध्ये ‘लहुजी सेना’ स्थापून कार्यक्रम केले. दादासाहेब क्षीरसागर यांनी ‘बहुजन मजूर पक्ष’ (2000) स्थापून लाल रंगाचे निशाण, रूमाल, टोप्या असे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून चळवळ सुरू केली. पुढे ‘चलो बुद्ध की ओर’ असा नारा देत नागपूर येथे धर्मांतराचा कार्यक्रम घेतला. मातंग समाजाने हा निर्णय मान्य केला नाही. याशिवाय ‘लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ’ स्थापून मातंग समाजाच्या कर्मचारी वर्गाची संघटना अस्तित्वात आली. प्राध्यापक व इतर क्षेत्रातील कर्मचारी या संघटनेत कार्यरत होते. हळूहळू यातील प्रत्येकजण विविध पक्षाशी बांधील होत गेला. आपली पक्षीय बांधिलकी महासंघात आणल्यामुळे मतभेद वाढत गेले. मातंग समाजाच्या हितापेक्षा वैयक्तिक हितासाठी चाललेली धडपड संघटनेचे अस्तित्व संपवून टाकते हा अनुभव येथेही आला. आज जयवंतराव आवळे यांच्यासारखा नेता केवळ खुर्ची टिकावी याच्या प्रयत्नात असलेला आढळतो. मातंग समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे ही समाधानाची बाब सोडली तर बाकी चळवळीच्या अंगाने चिंता व्यक्त करावी अशी स्थिती आहे.

एकूणच मातंग चळवळीच्या पायाचा आणि इमारतीचा विचार केला तर असे लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकर यांच्या समकालीन असलेल्या देवीदास कांबळे यांच्यापासून चळवळीचा आरंभ मानला तर त्याठिकाणी पाया नावाची कोणतीही गोष्ट आढळत नाही. डॉ. आंबेडकरांना एकट्या महार व मांग समाजाची चळवळ मान्य नव्हती. काही ठिकाणी मातंगावर अन्याय करणार्‍या महार समाजाच्या विरोधात चळवळ उभी करणे यास चळवळीचा पाया म्हणता येत नाही. अस्पृश्य जातीतही जातीभेद आढळतो यामागे हिंदु समाजव्यवस्था कारणीभूत आहे हे आंबेडकरी चळवळीचे तत्त्व मातंग चळवळीने स्वीकारले नाही. चळवळीचा पाया हा प्रासंगिक नसतो. परंतु मातंग समाजाच्या चळवळीचा पाया हा स्थळ-काळ प्रदेश आणि व्यक्तीपरत्वे बदलत जाणारा आढळतो. मातंग समाजाचा उत्कर्ष हा आर्थिक की सामाजिक अंगाने व्हायला पाहिजे, पोटाची भूक की अस्मिता; अशा कोणत्याच ठाम अंगाचा विचार मातंग नेतृत्वामध्ये आढळत नाही. किंबहुना तत्कालीन प्रस्थापित पक्ष आणि सत्ताधारी नेते मातंग चळवळीचा पाया भक्कम होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे स्वतंत्र प्रतिभेने नि:स्वार्थ बुद्धीने मातंग समाजाला मानव मुक्तीच्या दिशेने घेऊन जाणारा नेता मातंग चळवळीच्या आरंभकाळात आढळत नाही. पायाच ठिसूळ असेल तर वरची इमारत बेभरवशाची असणे साहजिक आहे.
पाया भक्कम असेल तर इमारत भरवशाची हे सूत्र अर्धवट खरे मानावे लागते. बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभ केलेल्या चळवळीचा पाया हा भक्कम होता हे कोणीही नाकारू शकत नाही. परंतु या पायावर पुढील काळात किंवा आजच्या स्थितीतली इमारत ही भरवशाची आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आखलेल्या पायानुसार पुढील काळातील आंबेडकरी चळवळ वाटचाल करताना आढळत नाही. मातंग समाजाच्या चळवळीबाबत दुहेरी असमाधानाला सामोरे जावे लागते. इथे पायाच अस्तित्वात नाही अशा वेळी इमारतीची अपेक्षा करणे चुकीचे ठरते. फायद्याकरिता कॉंग्रेसमध्ये जाणे, प्रस्थापित पक्षांच्या धोरणांचा अंगिकार करणे, त्यांनी दुर्लक्षित केले की दुसर्‍यांशी हातमिळवणी करणे ही कोणत्याही चळवळीची वाटचाल चळवळीच्या वाटचालीसाठी अडथळा ठरते. मातंग समाजाच्या चळवळीबाबत नेमके हेच वास्तव समोर येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा पाया स्वीकारला असता आणि प्रस्थापित पक्षाशी निष्ठा बाळगली नसती तर मातंग चळवळीची इमारत भरवशाची होण्यापासून कोणीही रोखू शकले नसते. महार-मांग अशा सर्वच जातीच्या एकजुटीतून एक वेगळी शक्ती निर्माण होईल; जी फक्त मानवमुक्तीचा ध्यास धरेल.
संदर्भ :
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खंड 18, भाग 1, महाराष्ट्र शासन मुंबई 2002 पृष्ठ 508
2. तत्रैव, पृ. 509
3. तत्रैव, पृ. 537
4. तत्रैव, पृ. 540
5. तत्रैव, पृ. 540
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खंड 18, भाग 2, महाराष्ट्र शासन, मुंबई,2002 पृ. 55.
7. तत्रैव, पृ. 11
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारिता
खंड 20, महाराष्ट्र शासन, मुंबई,2005 पृ. 316.
9. तत्रैव, पृ. 348 व349, 10. तत्रैव, पृ. 349
11. तत्रैव, पृ. 346, 12. तत्रैव,खंड-18, भाग2, पृ.311
13. मुक्ता साळवे : महात्मा फुले गौरव ग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई,1991 पृ. 747.
14. गणपत भिसे : मातंग पुढार्‍यांची अवसानघातकी चळवळ, साद प्रकाशन
औरंगाबाद, 2010.

2 comments:

  1. Great Information, thanks for sharing.
    Get Marathi, Hindi and English Books/Songs/Movies on Buddha and Dr. Ambedkar from here http://drambedkarbooks.com/

    ReplyDelete