Monday 9 March 2015

छत्रपती शिवाजी महाराज- मुत्सद्दी व उदारमतवादी

छत्रपती शिवाजी महाराज राजकारणी होते. पण त्यांचे राजकारण कोणत्या विचारांचे होते? महाराजांच्या जीवनातील घटना, प्रसंग पाहिले, तर त्यांना जात, धर्म, प्रांत, भाषेचे राजकारण अभिप्रेत होते काय? महाराजांचे राजकारण मुस्लिमद्वेष्टे किंवा हिंदूधार्जिणे कधीच नव्हते, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन असे होते. अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी त्याच्या कुटुंबाला कसे अभय दिले, याचे वर्णन शिवरायांच्या दरबारातील सदस्य कृष्णाजी अनंत सभासदाने पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘ऐसी फत्ते करून जय जाहाला. मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यांस धरून आणिले. राजा खासा प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफजलखानाचे लोक व त्यांचे पुत्र भांडते माणूस होते तितकियांस भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लेकांस चालविले.’’ खानाला धडा शिकविल्यानंतर शिवरायांनी त्याच्या मुलांना प्रेमाने वागविले. त्यांना पोटाशी धरून अभय दिले व त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावून दिली.

मोगलांनी विजापूरला वेढा घातला, तेव्हा त्यांच्या दक्षिणेतील राजकारणाला पायबंद घालण्यासाठी शिवरायांनी आदिलशहाच्या मदतीसाठी दहा हजार घोडेस्वार आणि धान्याच्या गोण्यांसह दहा हजार बैल रवाना केले. दिलेरखानाच्या छावणीतून संभाजीराजांची सुटका झाल्यानंतर ते प्रथम विजापूरला गेले आणि तेथून पन्हाळगडावर आले. त्यासाठी आदिलशहाने साह्य केले. दक्षिण दिग्विजयाला गेल्यानंतर मोगल सुभेदार बहादूरखान स्वराज्याला उपद्रव देणार नाही, याची व्यवस्था शिवाजीराजांनी त्याच्याशी अंतर्गत तह करून केली होती. यावरून स्पष्ट होते, की राजांचा मोगल- आदिलशहाशी असणारा संघर्ष राजकीय होता, धार्मिक नव्हता. राजे दक्षिण दिग्विजयासाठी निघाले असता गोवळकोंडा जवळ आल्यानंतर त्यांनी मावळ्यांना सांगितले, की ‘एक काडी रयतेची तसनस न व्हावी.’ म्हणजे रयतेच्या काडीचीही नासाडी करू नका. परमुलूखातील सामान्य रयतेचेही हित शिवरायांनी जोपासले. ही वार्ता ऐकून गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने शिवरायांच्या स्वागतासाठी चार गावे पुढे येण्याचे ठरवले. तेव्हा राजांनी त्याला कोणता निरोप पाठवला, याचे हृदयस्पर्शी वर्णन समकालीन सभासदाने पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘तुम्ही न येणे. आपण वडीलभाऊ, मी धाकटा भाऊ. आपण पुढे न यावे.’’ गोवळकोंड्याच्या बादशहाला मोठा भाऊ म्हणून शिवरायांनी संबोधले होते. शिवाजीराजे- कुतुबशहा यांच्या मैत्री करारातून दक्षिण दिग्विजयाचा मार्ग सुकर झाला. तेव्हा शिवरायांनी मालोजी घोरपडे यांना पत्र पाठवून कळवले, की ‘तुम्ही कुतुबशहाशी रुजवात करावी. कुतुबशहाशी बहुत रीती बोलोन, तुम्हास कुतुबशहाचा कौलाचा फर्मान घेऊन पाठविला आहे. तुम्ही मराठे लोक तुमचे गोमटे (कल्याण) व्हावे म्हणून तुम्हास लिहिले आहे.’ राजांनी मालोजी घोरपडे यांना आदिलशाहीतून कुतुबशाहीत जाण्याचा आग्रह केला, हे या पत्रावरून स्पष्ट होते. तेच मालोजी घोरपडे पुढे स्वराज्यात आले आणि संभाजीराजांचे सरसेनापती झाले. तत्कालीन राजकीय घडामोडीत लोककल्याण हे शिवरायांचे धोरण होते.

शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरूवाडी येथे असताना डच व्यापारी काही सवलती मागण्यासाठी आले. डचांबरोबर जो व्यापारी करार झाला, त्यात शिवरायांनी एक कलम घातले. ते पुढीलप्रमाणे, ‘‘इतर कारकिर्दीत तुम्हाला स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती, पण माझ्या राज्यात स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची आणि विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा प्रयत्न कराल, तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.’’ व्यापारी धोरणातही शिवरायांनी गुलामगिरीला विरोध करून मानवतावाद जपला. राजांचे बळ त्यांच्या साधेपणात, नैतिकतेत, चातुर्यात होते. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. ढाल-तलवारीच्या संघर्षातही त्यांनी प्रजेचे हित जोपासले. ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा. अन्यथा पेटती वात तोंडात धरून उंदीर धावत जाईल, त्यामुळे गवताची गंज जळून खाक होईल. मग जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही शेतकऱ्यांची भाजी, धान्य, लाकूड, चारा आणाल, हे तर मोगलापेक्षा अधिक जुलूमकारक आहे,’ अशा सूचना शिवरायांनी चिपळूणच्या अधिकाऱ्यांना १९ मे १६७३ रोजी दिल्या होत्या. यातून राजांचा प्रजावत्सल दृष्टिकोन दिसतो.

दुष्काळग्रस्तांना कशा प्रकारे मदत करावी याबाबतचे पत्र ५ सप्टेंबर १६७६ रोजी शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘गावोगावी जावा, शेतकऱ्यांना गोळा करा, त्यांना बैलजोडी द्या, खंडी दोन खंडी धान्य द्या, वसुलीसाठी तगादा लावू नका, ऐपत आल्यानंतरच वसूल करा, वाढीदिडीने वसूल न करता मुद्दलच तेवढी घ्यावी.’’  राजांचा पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्याशी संघर्ष झाला. त्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला पायबंद घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वराज्यनिर्मितीसाठी उपयोग करून घेतला. आरमार उभारण्यासाठी त्यांनी पोर्तुगीज कारागीर नेमले. इंग्रज आणि डचांशी त्यांनी व्यापारी करार केला. पण त्यांच्यावर अंकुश ठेवला. पोर्तुगीज आणि इंग्रजांनी राजांच्या योग्यतेची तुलना युरोपीय नायकांशी केली आहे.

राजांच्या राजकारणाचे, कौशल्याचे ध्येयधोरणांचे कौतुक त्यांच्या राजकीय विरोधकांनीही केले आहे. औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार खाफीखानाने ‘मुंतखबुल्लुबाब’ या फारसी ग्रंथात राजांच्या नैतिकतेचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘रायगडाला लागूनच शिवाजीने एक वाडा बांधला होता. उन्हाळ्यात तेथे पाण्याची टंचाई भासे. शिवाजीने आपल्या वाड्याला लागून विहीर बांधली होती. विहिरीजवळ दगडाची बैठक होती. तेथे शिवाजी बसत असे. विहिरीवर सावकारांच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यास येत. त्यांच्या मुलांना ते फळे देत असत. आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी बोलतो तसे ते त्या बायकांशी बोलत.’’ 


शिवाजी महाराजांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी राजकारण केले, पण लोककल्याणाचे धोरण कधीही सोडले नाही. राजे चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, धर्मनिरपेक्ष, न्यायी, समतावादी होते. त्यांचे राजकारण जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी नव्हते, तर लोककल्याणकारी होते. शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन शासन आणि प्रशासन लोककल्याणकारी व्हावे, हीच  सदिच्छा!















सदर  लेख हा येथून संकलित  केला  आहे 

Sunday 8 March 2015

मुलांचे गुन्हेगारी वळण बदलताना

balgunhegar

गुन्हेगारीकडे वळणारी मुले केवळ झोपडपट्टीतच नाही, तर कॉस्मोपोलिटन सोसायटीत देखील सर्रास आढळतात. मात्र तथाकथित 'मोठ्या घरातील' मुलांचे अपराध पराकाष्ठेने लपवले जातात. अशा मुलांची आयुष्ये सुडबुद्धीने बिघडवण्यापेक्षा घडवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संसदीय समितीकडून बाल न्याय अधिनियमात बदल करण्याचा प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर परत एकदा 'नक्की चूक काय आणि बरोबर काय' अशी संदिग्धता निर्माण झालेली आहे. हिंसक स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या बालकांचे वय कमी करावे व त्यांना वेगळ्या प्रकारे हाताळावे असे सर्रास विधान करणारे वस्तुस्थितीशी अपरिचित असतात. या क्षेत्रात काम करणारेही कमी आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर होणारी चर्चा अनेकदा अपुऱ्या माहितीच्या आधारावर उथळपणे होताना दिसते.

सर्वसाधारणपणे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या प्रत्येकच बालकाच्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये, नातेसंबंधामध्ये काही ना काही ओढाताण आढळून येते. जसे खोटे बोलणाऱ्या पालकांची मुलेदेखील कळत-नकळत खोटे बोलायला शिकतात आणि स्वतःची समज आल्यावर खोटे बोलणे सोडूनही देतात तसेच काहीसे इथे देखील आहे. बालपणापासूनच हिंसा, व्यसने यांच्याशी रोजचा परिचय असणारी मुले या बाबींना पटकन बळी पडतात. ही मुले केवळ झोपडपट्टीतच नाही, तर कॉस्मोपॉलिटन सोसायटीत देखील सर्रास आढळतात. फरक इतकाच, की झोपडपट्टीतील मुले तत्काळ कायद्याच्या कचाट्यात सापडतात व तथाकथित 'मोठ्या घरातील' मुलांचे अपराध पराकाष्ठेने लपवले जातात.

गेली काही वर्षे गंभीर केसेसमधील विधिसंघर्षग्रस्त बालकांसोबत काम करताना काही मुद्दे वारंवार लक्षात आले. त्यातील महत्त्वाचा मुद्दा हा की, बालकांमध्ये गंभीर गुन्हे करण्याचे प्रमाण सुदैवाने अतिशय अल्प आहे. बालकाचा सहभाग असलेल्या गुन्ह्यांत प्रौढ व्यक्तीचा देखील समावेश असतो. तसेच जिचा खून केला जातो, ती व्यक्ती सदर बालक वा त्याचे कुटुंबीय यांचे वारंवार शोषण वा अत्याचार करणारी असते. एका बालकाचे वडील विवाहबाह्य संबंध व दारूचे व्यसन यात पुरते बुडालेले असत. बालकाने लहानपणापासून वडिलांना दारूच्या नशेत आईला मारताना, मुलांना मारतानाच पाहिलेले. एक दिवस मात्र बालकाच्या आईने बालकाच्या साक्षीने नवऱ्याच्या जेवणात विष कालवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला परंतु नवरा न मेल्याने ‌'तो शुद्धीवर आल्यास आपणा सर्वांचाच जीव घेईल.' या भीतीने त्याला मारून टाकला. या मुलाला त्याचा पश्चाताप तर होताच, पण असाही प्रश्न होता की 'आम्ही किती काळ मारहाण, अवहेलना सहन करायची? आणि का?'

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात जेव्हा एकापेक्षा जास्त अल्पवयीन मुले सहभागी असतात, त्यावेळी असे गुन्हे हे पूर्वनियोजित नसून अचानक घडून आलेल्या घटनेचा परिणाम असतात. चार मुलांनी एका दुकानमालकाचा खून करण्याची केस. वरवर पाहाता चार अल्पवयीन बालकांनी त्यांच्याच दुकानमालकाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. बालकांशी बोलले असता असे लक्षात आले, की सदर दुकानमालक अल्पवयीन बालकांनाच कामास ठेवत असे. त्यांना दुकानाच्यावरील घरात वा गच्चीतच निवारा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. दारूच्या नशेत मुलांना अमानुष मारहाण, शिवीगाळ तर रोजच होत असे. अशा या पाशवी माणसाच्या अत्याचारांनी बळी पडलेल्या या मुलांनी एक दिवस अचानक, रागाच्या भरात सगळ्यांचाच सोक्षमोक्ष लावायचा ठरवला. मालकाला तो दारूच्या नशेत असताना भरपूर मारहाण करताकरताच बेभान होऊन पुरतेच संपवून टाकले.

काही वेळा अत्यंत आश्चर्यकारकरीत्या असे गंभीर गुन्हे घडतात. दोन अतिशय चांगल्या मित्रांमध्ये थट्टा-मस्करी चालू असताना त्याचे पर्यवसान भांडण-मारामारी आणि एकाच्या मृत्यूमध्ये झाले. ज्या मुलांचा मित्र गेला त्या मुलाला स्वतःवर गुन्हा दाखल झाला, यापेक्षा देखील जवळचा मित्र गमावला याचा धक्का पचवता येणे कठीण झाले. एकूणच खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनेची पार्श्वभूमी अधिक गंभीर असते, परंतु योग्य दिशा मिळाल्यास अशा मुलांना केलेल्या कृत्याचा पश्चातापदेखील होतो. खुनासारखे गुन्हे मुले वारंवार सर्रास करीत नाहीत हे देखील समजणे आवश्यक आहे. काही मुलांमध्ये अनावर राग व रागावर योग्य नियंत्रण न ठेवता येणे या प्रकारची मानसिक समस्या असते. अशा मुलांच्या रागाला कुटुंबियांच्या हिंसक स्वभावाची जोड मिळाली असता गुन्हे घडतात. योग्य मानसोपचार मिळाल्यामुळे शांत झालेली काही मुले आजही आमच्या संपर्कात आहेत. काही वेळा घरातील मंडळी आपआपल्याच विश्वात मग्न असल्याने लक्ष वेधून घेण्यासाठी वारंवार चोरीसारखे गुन्हे करणारी मुले देखील आढळतात.

बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या बाबतीत अनेकदा मुलगा व मुलगी यांचे त्यांच्या वयाला अनुसरून प्रेमसंबंध असतात. घरून लग्नाला संमती मिळणार नाही म्हणून ते हाताला लागेल तो ऐवज घेऊन पळून जातात, फिल्मी पद्धतीने लग्न करून एकत्र राहायला लागतात. काही दिवसांतच अशा मुलांचा शोध लागतो. मधल्या समाजात कुटुंबाची 'अब्रू' गेलेली असते आणि या सगळ्याचे पर्यावसान मुलावर अपहरण आणि बलात्काराची केस दाखल करण्यात होते.

जर या मुलांना ५ ते २० वर्षांपर्यंत तुरुंगात टाकले तर त्याने नक्की काय साध्य होईल? सध्याची तुरुंगांची अवस्था पहाता प्रत्येक तुरुंग त्याच्या क्षमतेच्या कितीतरी पटीने जास्त भरलेला आहे. त्यामुळे तेथे ठेवून माणसाला अद्दल घडेल, शहाणपण येईल, सुधारणा होईल असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरेल. तरी जर मुलांना तुरुंगात डांबलेच तरी वयाच्या जास्तीत जास्त २५-३०व्या वर्षी ती बाहेर येणार आणि तोवर प्रश्न अजून वाढलेले असणार. शिक्षण नाही, नोकरी मिळणार नाही, समाजात स्वीकार होणार नाही आणि मग शेवटचा पर्याय हाच की तुरुंगात झालेल्या ओळखीच्या आधारावर परत वेगळ्या मार्गाला लागतील. यातून नक्की काय साध्य होणार? अशा मुलांची आयुष्ये सुडबुद्धीने बिघडवण्यापेक्षा घडवण्याचा प्रयत्न हवा.

(टाटा सामाजिक विज्ञान संस्थानच्या रिसोर्स सेल फॉर ज्युवेनाइल जस्टिस या प्रकल्पाचे अधिकारी)

सदर लेख  हा येथून संकलीत केला 

आरक्षण आणि त्यापलीकडे...


agralekh
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने राज्यातील मुस्लिम समाजाला नोकरी तसेच शिक्षणात दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे,असेच म्हणावे लागेल. गेल्या सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय भाजप सरकार आल्यावर रद्द होणार हे जवळपास निश्चितच समजले जात होते. भारतीय राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी शिक्षण, नोकरी व राजकीय आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला. जातीच्या नावाखाली ज्या घटकांना हजारो वर्षे ज्ञानबंदी तसेच धनसंचय बंदी करण्यात आली होती. समाजातील ते घटक आरक्षणामुळे स्पर्धेत येऊन इतरांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रे काबीज करताना आज दिसतात. भारतीय मुस्लिम समाज स्वातंत्र्यानंतर एका मोठ्या मानसिंक गंडाखाली जगत आहे. फाळणीमुळे कायम या समाजाला संशयाच्या भोवऱ्यात वावरावे लागते आहे. फाळणीनंतर बहुतांश मुस्लिम जमीनदार पाकिस्तानात निघून गेल्याने भारतीय मुस्लिमांमध्ये दखल घेण्याजोगा मध्यमवर्ग तयारच होऊ शकलेला नाही. मध्यमवर्ग हा सामाजिक सुधारणांच्या प्रक्रियेत उत्प्रेरकाचे काम करीत असतो. या कमतरतेमुळे भारतीय मुस्लिम सामाजिक, शैक्षणिक व त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या मागास राहिला. या मागासलेपणाची भयावह सांख्यिकी सच्चर समितीच्या अहवालामुळे समोर आली आहे. ८० टक्के निरक्षरतेचे प्रमाण असलेल्या या समाजात सहा ते चौदा वयोगटातील केवळ २५ टक्के मुले शाळेचे तोंड पाहतात. आयएएस, आयएफएस, आयपीएस या भारतीय प्रशासकीय सेवेत अत्युच्च पदांवर एक ते चार टक्के इतकेच मुस्लिमांचे प्रमाण आहे. ३१ टक्के मुस्लिम गरिबीरेषेच्या खाली राहतात. अशा पद्धतीची विषमतामूलक परिस्थिती कुठल्याही समाजात अस्थिरता पसरवण्याचे काम करते. दुर्दैवाने, हिंदू-मुस्लिम प्रश्नाचे राजकारण करून ईप्सित साध्य करून घेण्याचे काम काँग्रेससह सर्वच पक्ष सतत करतात. राज्यातील मुस्लिमांना शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये दिलेल्या पाच टक्के आरक्षणामुळे सच्चर आयोगाने उपस्थित केलेले प्रश्न सुटण्याची शक्यता नव्हतीच. या समाजाला विश्वास देऊन त्याच्या उन्नतीसाठी सकारात्मक पावले सरकारी पातळीवरून उचलणे ही खरी गरज आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यात सेक्युलर शब्द घालून देशात सेक्युलर वातावरण तयार होत नाही, हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवायला हवे. मुस्लिमांमधील केवळ तीन टक्के मुले मदरशात जातात. असे असताना सरकार मदरशांना मदत देते किंवा हज यात्रेच्या सबसिडीसाठी शेकडो कोटी रूपयांची तरतूद करते, त्यापेक्षा आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात हा समाज यावा यासाठी हे पैसे खर्च केल्यास त्याचा खरा उपयोग होऊ शकतो. मात्र, असे केल्यास गरीब मुस्लिमांच्या आपमतलबी नेतृत्वाचे धर्माच्या नावाखाली सुरू असलेले दुकान बंद होण्याची भीती असल्याने सध्यातरी या प्रश्नाचा तिढा सुटणे कठीण आहे.



सदर  लेख हा  येथून  संकलित  केला 

शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन

  • ज्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, असे अनेक संत, समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले, परंतु याची सुरुवात पावणेचारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजे यांनी केली होती. शिवाजी राजे मध्ययुगीन काळातील पहिले असे सत्ताधीश आहेत, ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली. त्यांनी स्वत:च्या मातोश्रीला सती जाण्यापासून परावृत्त केले, ही त्या काळातील सामाजिक क्रांतीच होती.
    शिवाजीराजांचा जन्म सरंजामशाहीत झाला; परंतु त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व स्वकर्तृत्वावर ते उभे केले. त्यांनी मराठी मनात अस्मिता निर्माण केली. राष्ट्र उभारणीत त्यांनी अठरापगड जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले. त्यांचे हे पाऊल म्हणजे ‘स्त्री मुक्ती’साठी केलेली क्रांतीच होती. हजारो वर्षांपासून या प्रथा-परंपरांना धक्का लावण्याची हिंमत कोणी करू शकले नव्हते. ते राजांनी करून दाखवले. शिवरायांच्या मनात स्त्रीजातीबद्दल उच्च प्रतीचा मानसन्मान होता, हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी जगापुढे आले. म्हणूनच त्यांच्याविषयी आदर सर्व जाती-धर्मात आजही दिसून येतो व तो पुढेही तसाच राहील. शिवरायांनी सर्व जाती-धर्मांना समान वागणूक दिली. अठरापगड जाती त्यांनी भगव्या झेंड्याखाली गोळा केल्या व सर्वांना स्वराज्य उभारण्यात सहभागी होण्याची संधी दिली. त्यांनी जातिभेद बाजूला सारून पराक्रमाला राष्ट्रहितासाठी वापरले.
    मध्ययुगीन काळात स्त्रियांना ‘दास्यत्वा’साठी गुलाम म्हणून वापरले जाई. त्यांची खरेदी-विक्री होई. स्त्री विटंबना, मालकी हे सर्रास चाले. या गोष्टींवर राजांनी बंदी आणली.
    शिवाजीराजांचे स्त्रीविषयक धोरण अत्यंत आदराचे होते. स्त्री जातीचा आदर त्यांच्या रक्तात भिनला होता. त्यांचे जीवन अचंबित करणारे आहे. सरंजामशाहीत त्यांचे वर्तन आजच्या काळाशी सुसंगत वाटते. मातोश्री जिजाबाई त्यांच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या शिकवणीतून व्यक्तिमत्त्व आकार घेत गेले असावे. बालमनावर केलेले संस्कार दूरगामी परिणाम करणारे ठरत असतात. जिजाऊंनी बालशिवबाला स्त्री जातीच्या सन्मानाचे बाळकडू पाजले होते.
    जिजाऊंनी बालशिवबाला दयाबुद्धी, आदर, उदार अंत:करण, न्यायशीलता यांचे बाळकडू दिले. म्हणून परस्त्रीस मातेसमान लेखणारा व शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करणारा हा युगपुरुष आपल्या देशात आजही प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. ते खऱ्या अर्थाने रयतेचा राजा होते. रक्षणकर्ते होते. सैन्याला राजांचे सक्त आदेश होते. स्त्रियांना मोहिमेवर आणू नये, त्यांना युद्धात पकडू नये. स्त्रीसंबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच व कठोर शिक्षा होती. मग तो कुणीही असो. साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार, कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड, डोळे काढणे आदि शिक्षा दिल्या जात.
    ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रूच्या स्त्रियांची विटंबना केली जाई. स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई. त्यांचे आर्थिक व राजकीय शोषण कल्पनेपलीकडे गेले होते. युद्धात पकडल्या गेलेल्या स्त्रियांना बळजबरीने जनानखान्यात कोंबले जाई किंवा लग्न लावले जाई. तहामध्ये स्त्रियांची मागणी होई. गावाशेजारी लष्करी छावणी पडली की, लोक जंगलाकडे पळून जात. सुना-लेकींच्या अब्रू रक्षणासाठी त्यांना जंगलामध्ये लपवले जाई. प्रजेचे रक्षक त्यांचे भक्षक बनले होते, त्या काळात शिवाजी राजे स्त्रीरक्षक होते. त्यांनी स्त्री जातीला संरक्षण दिले होते.
    राजांनी जे स्त्रीविषयक धोरण आखले, ते अमलातदेखील आणले. कल्याणच्या सुभेदाराला, सुनेला त्यांनी मानसन्मान देऊन परत पाठविले. तसेच रांझेगावाच्या पाटलाला त्यांनी हातपाय तोडण्याची शिक्षा केली व अमलात आणून सर्व स्त्रियांना अभय दिले. असे असंख्य पुरावे इतिहास देतो.
    स्वराज्याला स्वकीयांचा विरोध होता. प्रसंगी रक्तसंबंध जोडून किंवा तलवारीच्या धाकावर स्वराज्य उभे केले. विरोधकांनाही स्वराज्यात सामील करून घेतले. त्यांनी आपल्या सैन्यापुढे व्यक्तिगत नीतिमत्तेचे, चारित्र्याचे उदाहरण ठेवले. साम्राज्य उभे करणे वेगळे व समाज घडविणे वेगळे. त्यांनी समाजात तत्त्वांची पेरणी केली. वाणीने, कृतीने ध्येयवाद शिकवला. शिवछत्रपतींचे स्त्रीविषयक धोरण म्हणजे त्यांच्या उच्च नीतिमत्तेचा पुरावा होता.
    आजूबाजूला घडणाऱ्या महिला विरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहिल्या की, शिवरायांच्या विचारांची कधी नव्हे ते एवढी गरज असल्याचे जाणवते. स्त्री हा कुटुंबाचा प्रमुख घटक आहे. प्रत्येक मातेने आपल्या मुलाला वाढवताना आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रियांविषयी आदरभावना वाढीस लावणे गरजेचे आहे. परिणामी पुढे तो स्वत:ची पत्नी व इतर स्त्रियांचा मान सन्मान करेल. त्यांच्याविषयी आदराची भावना ठेवील. त्यातून स्त्रियांवरील अन्यायाचे प्रमाण काही प्रमाणात का होईना घटेल.
    शिवरायांचे चरित्र सर्वांना भुरळ घालणारे आहे. भरतवर्षात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. परंतु महाराजांइतकी लोकप्रियता क्वचितच कोणाला मिळाली असेल. शूरवीर राष्ट्रभक्त, चतुर नीतीमान, विषमतेला गडणारा समाजसुधारक, शेतकऱ्यांचीही काळजी घेणारा कर्तव्यदक्ष राजा, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांची नेहमीच उजळणी होताना दिसते. या त्यांच्या गुणांवर आजपर्यंत खूप लिखाण झाले आहे. तथापि, त्यांनी स्त्रियांविषयी जे क्रांतिकारी धोरण ठरविले आणि अमलात आणले त्याबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही. स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करावयाचे असेल, तर महाराजांच्या या गुणांची चर्चा करण्याची व तो समाजात रुजविण्याची खरी गरज आहे.
    - डॉ. अर्चना फुके
    (महिला प्रश्नांच्या अभ्यासक)



सदर लेख  हा  येथून  संकलित केला