छत्रपती शिवाजी महाराज राजकारणी होते. पण त्यांचे राजकारण कोणत्या विचारांचे होते? महाराजांच्या जीवनातील घटना, प्रसंग पाहिले, तर त्यांना जात, धर्म, प्रांत, भाषेचे राजकारण अभिप्रेत होते काय? महाराजांचे राजकारण मुस्लिमद्वेष्टे किंवा हिंदूधार्जिणे कधीच नव्हते, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दालन असे होते. अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी त्याच्या कुटुंबाला कसे अभय दिले, याचे वर्णन शिवरायांच्या दरबारातील सदस्य कृष्णाजी अनंत सभासदाने पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘ऐसी फत्ते करून जय जाहाला. मग राजे यांनी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यांस धरून आणिले. राजा खासा प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफजलखानाचे लोक व त्यांचे पुत्र भांडते माणूस होते तितकियांस भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लेकांस चालविले.’’ खानाला धडा शिकविल्यानंतर शिवरायांनी त्याच्या मुलांना प्रेमाने वागविले. त्यांना पोटाशी धरून अभय दिले व त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावून दिली.
शिवाजी महाराज तमिळनाडूतील तिरूवाडी येथे असताना डच व्यापारी काही सवलती मागण्यासाठी आले. डचांबरोबर जो व्यापारी करार झाला, त्यात शिवरायांनी एक कलम घातले. ते पुढीलप्रमाणे, ‘‘इतर कारकिर्दीत तुम्हाला स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती, पण माझ्या राज्यात स्त्री, पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची आणि विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा प्रयत्न कराल, तर माझी माणसे तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.’’ व्यापारी धोरणातही शिवरायांनी गुलामगिरीला विरोध करून मानवतावाद जपला. राजांचे बळ त्यांच्या साधेपणात, नैतिकतेत, चातुर्यात होते. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. ढाल-तलवारीच्या संघर्षातही त्यांनी प्रजेचे हित जोपासले. ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा. अन्यथा पेटती वात तोंडात धरून उंदीर धावत जाईल, त्यामुळे गवताची गंज जळून खाक होईल. मग जनावरांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही शेतकऱ्यांची भाजी, धान्य, लाकूड, चारा आणाल, हे तर मोगलापेक्षा अधिक जुलूमकारक आहे,’ अशा सूचना शिवरायांनी चिपळूणच्या अधिकाऱ्यांना १९ मे १६७३ रोजी दिल्या होत्या. यातून राजांचा प्रजावत्सल दृष्टिकोन दिसतो.
दुष्काळग्रस्तांना कशा प्रकारे मदत करावी याबाबतचे पत्र ५ सप्टेंबर १६७६ रोजी शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘गावोगावी जावा, शेतकऱ्यांना गोळा करा, त्यांना बैलजोडी द्या, खंडी दोन खंडी धान्य द्या, वसुलीसाठी तगादा लावू नका, ऐपत आल्यानंतरच वसूल करा, वाढीदिडीने वसूल न करता मुद्दलच तेवढी घ्यावी.’’ राजांचा पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्याशी संघर्ष झाला. त्यांच्या राजकीय हस्तक्षेपाला पायबंद घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वराज्यनिर्मितीसाठी उपयोग करून घेतला. आरमार उभारण्यासाठी त्यांनी पोर्तुगीज कारागीर नेमले. इंग्रज आणि डचांशी त्यांनी व्यापारी करार केला. पण त्यांच्यावर अंकुश ठेवला. पोर्तुगीज आणि इंग्रजांनी राजांच्या योग्यतेची तुलना युरोपीय नायकांशी केली आहे.
राजांच्या राजकारणाचे, कौशल्याचे ध्येयधोरणांचे कौतुक त्यांच्या राजकीय विरोधकांनीही केले आहे. औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार खाफीखानाने ‘मुंतखबुल्लुबाब’ या फारसी ग्रंथात राजांच्या नैतिकतेचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, ‘‘रायगडाला लागूनच शिवाजीने एक वाडा बांधला होता. उन्हाळ्यात तेथे पाण्याची टंचाई भासे. शिवाजीने आपल्या वाड्याला लागून विहीर बांधली होती. विहिरीजवळ दगडाची बैठक होती. तेथे शिवाजी बसत असे. विहिरीवर सावकारांच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यास येत. त्यांच्या मुलांना ते फळे देत असत. आपण आपल्या आईशी किंवा बहिणीशी बोलतो तसे ते त्या बायकांशी बोलत.’’
शिवाजी महाराजांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी राजकारण केले, पण लोककल्याणाचे धोरण कधीही सोडले नाही. राजे चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, धर्मनिरपेक्ष, न्यायी, समतावादी होते. त्यांचे राजकारण जातीयवादी, धर्मवादी, भाषावादी नव्हते, तर लोककल्याणकारी होते. शिवाजीराजांची प्रेरणा घेऊन शासन आणि प्रशासन लोककल्याणकारी व्हावे, हीच सदिच्छा!
सदर लेख हा येथून संकलित केला आहे
No comments:
Post a Comment