- ज्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, असे अनेक संत, समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले, परंतु याची सुरुवात पावणेचारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजे यांनी केली होती. शिवाजी राजे मध्ययुगीन काळातील पहिले असे सत्ताधीश आहेत, ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली. त्यांनी स्वत:च्या मातोश्रीला सती जाण्यापासून परावृत्त केले, ही त्या काळातील सामाजिक क्रांतीच होती.शिवाजीराजांचा जन्म सरंजामशाहीत झाला; परंतु त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व स्वकर्तृत्वावर ते उभे केले. त्यांनी मराठी मनात अस्मिता निर्माण केली. राष्ट्र उभारणीत त्यांनी अठरापगड जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले. त्यांचे हे पाऊल म्हणजे ‘स्त्री मुक्ती’साठी केलेली क्रांतीच होती. हजारो वर्षांपासून या प्रथा-परंपरांना धक्का लावण्याची हिंमत कोणी करू शकले नव्हते. ते राजांनी करून दाखवले. शिवरायांच्या मनात स्त्रीजातीबद्दल उच्च प्रतीचा मानसन्मान होता, हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी जगापुढे आले. म्हणूनच त्यांच्याविषयी आदर सर्व जाती-धर्मात आजही दिसून येतो व तो पुढेही तसाच राहील. शिवरायांनी सर्व जाती-धर्मांना समान वागणूक दिली. अठरापगड जाती त्यांनी भगव्या झेंड्याखाली गोळा केल्या व सर्वांना स्वराज्य उभारण्यात सहभागी होण्याची संधी दिली. त्यांनी जातिभेद बाजूला सारून पराक्रमाला राष्ट्रहितासाठी वापरले.मध्ययुगीन काळात स्त्रियांना ‘दास्यत्वा’साठी गुलाम म्हणून वापरले जाई. त्यांची खरेदी-विक्री होई. स्त्री विटंबना, मालकी हे सर्रास चाले. या गोष्टींवर राजांनी बंदी आणली.शिवाजीराजांचे स्त्रीविषयक धोरण अत्यंत आदराचे होते. स्त्री जातीचा आदर त्यांच्या रक्तात भिनला होता. त्यांचे जीवन अचंबित करणारे आहे. सरंजामशाहीत त्यांचे वर्तन आजच्या काळाशी सुसंगत वाटते. मातोश्री जिजाबाई त्यांच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या शिकवणीतून व्यक्तिमत्त्व आकार घेत गेले असावे. बालमनावर केलेले संस्कार दूरगामी परिणाम करणारे ठरत असतात. जिजाऊंनी बालशिवबाला स्त्री जातीच्या सन्मानाचे बाळकडू पाजले होते.जिजाऊंनी बालशिवबाला दयाबुद्धी, आदर, उदार अंत:करण, न्यायशीलता यांचे बाळकडू दिले. म्हणून परस्त्रीस मातेसमान लेखणारा व शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करणारा हा युगपुरुष आपल्या देशात आजही प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. ते खऱ्या अर्थाने रयतेचा राजा होते. रक्षणकर्ते होते. सैन्याला राजांचे सक्त आदेश होते. स्त्रियांना मोहिमेवर आणू नये, त्यांना युद्धात पकडू नये. स्त्रीसंबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच व कठोर शिक्षा होती. मग तो कुणीही असो. साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार, कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड, डोळे काढणे आदि शिक्षा दिल्या जात.ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रूच्या स्त्रियांची विटंबना केली जाई. स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई. त्यांचे आर्थिक व राजकीय शोषण कल्पनेपलीकडे गेले होते. युद्धात पकडल्या गेलेल्या स्त्रियांना बळजबरीने जनानखान्यात कोंबले जाई किंवा लग्न लावले जाई. तहामध्ये स्त्रियांची मागणी होई. गावाशेजारी लष्करी छावणी पडली की, लोक जंगलाकडे पळून जात. सुना-लेकींच्या अब्रू रक्षणासाठी त्यांना जंगलामध्ये लपवले जाई. प्रजेचे रक्षक त्यांचे भक्षक बनले होते, त्या काळात शिवाजी राजे स्त्रीरक्षक होते. त्यांनी स्त्री जातीला संरक्षण दिले होते.राजांनी जे स्त्रीविषयक धोरण आखले, ते अमलातदेखील आणले. कल्याणच्या सुभेदाराला, सुनेला त्यांनी मानसन्मान देऊन परत पाठविले. तसेच रांझेगावाच्या पाटलाला त्यांनी हातपाय तोडण्याची शिक्षा केली व अमलात आणून सर्व स्त्रियांना अभय दिले. असे असंख्य पुरावे इतिहास देतो.स्वराज्याला स्वकीयांचा विरोध होता. प्रसंगी रक्तसंबंध जोडून किंवा तलवारीच्या धाकावर स्वराज्य उभे केले. विरोधकांनाही स्वराज्यात सामील करून घेतले. त्यांनी आपल्या सैन्यापुढे व्यक्तिगत नीतिमत्तेचे, चारित्र्याचे उदाहरण ठेवले. साम्राज्य उभे करणे वेगळे व समाज घडविणे वेगळे. त्यांनी समाजात तत्त्वांची पेरणी केली. वाणीने, कृतीने ध्येयवाद शिकवला. शिवछत्रपतींचे स्त्रीविषयक धोरण म्हणजे त्यांच्या उच्च नीतिमत्तेचा पुरावा होता.आजूबाजूला घडणाऱ्या महिला विरोधी गुन्ह्यांच्या घटना पाहिल्या की, शिवरायांच्या विचारांची कधी नव्हे ते एवढी गरज असल्याचे जाणवते. स्त्री हा कुटुंबाचा प्रमुख घटक आहे. प्रत्येक मातेने आपल्या मुलाला वाढवताना आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या स्त्रियांविषयी आदरभावना वाढीस लावणे गरजेचे आहे. परिणामी पुढे तो स्वत:ची पत्नी व इतर स्त्रियांचा मान सन्मान करेल. त्यांच्याविषयी आदराची भावना ठेवील. त्यातून स्त्रियांवरील अन्यायाचे प्रमाण काही प्रमाणात का होईना घटेल.शिवरायांचे चरित्र सर्वांना भुरळ घालणारे आहे. भरतवर्षात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. परंतु महाराजांइतकी लोकप्रियता क्वचितच कोणाला मिळाली असेल. शूरवीर राष्ट्रभक्त, चतुर नीतीमान, विषमतेला गडणारा समाजसुधारक, शेतकऱ्यांचीही काळजी घेणारा कर्तव्यदक्ष राजा, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांची नेहमीच उजळणी होताना दिसते. या त्यांच्या गुणांवर आजपर्यंत खूप लिखाण झाले आहे. तथापि, त्यांनी स्त्रियांविषयी जे क्रांतिकारी धोरण ठरविले आणि अमलात आणले त्याबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही. स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करावयाचे असेल, तर महाराजांच्या या गुणांची चर्चा करण्याची व तो समाजात रुजविण्याची खरी गरज आहे.- डॉ. अर्चना फुके(महिला प्रश्नांच्या अभ्यासक)
सदर लेख हा येथून संकलित केला
No comments:
Post a Comment