Wednesday 16 October 2013

डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी की, हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे. बाबासाहेबांचा हिंदू धर्म नि समाजव्यवस्थेला असा सवाल होता की,‘जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा म्हणूनच 13 आॅक्टोबर 1935 रोजी येवला मुक्कामी करताच त्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. बाबासाहेबांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर अस्पृश्यांच्या हितासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा हैदराबादच्या निझामाने केली होती. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीही बाबासाहेबांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचे आवाहन केले होते. पण बाबासाहेबांनी इस्लाम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा विचार कधीच केला नाही. कारण इस्लाम वा ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे भारतीय संस्कृती व राष्ट्रीयत्वास हानी पोहोचेल तसेच ख्रिस्ती व इस्लाम धर्मीयांची संख्या वाढून राष्ट्रहितास धोका निर्माण होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्पष्ट मत होते. शिवाय त्यांना बुद्धिनिष्ठ धर्म हवा होता. बाबासाहेबांचा कल काही काळ शीख धर्म स्वीकारण्याकडे झाला होता. पण विचारांती तो त्यांनी बदलला. बाबासाहेबांना अशी भीती वाटत होती की शीख धर्म स्वीकारला तर धर्माच्याच परवानगीने अस्पृश्यांच्या हाती कृपाण  येईल आणि हजारो वर्षे हिंदू धर्माची अमानवी छळवणूक सोसत आलेला दलित समाज अन्यायाचा सूड म्हणून रक्तपात करायला मागेपुढे पाहणार नाही. बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला. या काळात त्यांचा कल बौद्ध धम्माकडे वळला. धर्मांतरापूर्वी म्हणूनच मुंबईत 1945 मध्ये स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत 1950 मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘राजगृह’ असे नाव दिले. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी 14 आॅक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध समाजात धम्माने स्वाभिमान जागवला. बौद्धांनी देव्हाºयातील देवदेवतांचे विसर्जन करून टाकले. गंडेदोरे तोडले. वस्त्या-वस्त्यात बुद्धविहार आले. मुलांची, घरांची, वस्त्यांची नावे बदलली. लग्नविधी, नामकरण विधी बदलले. घरादारांवर बौद्ध स्थापत्यकला अवतीर्ण झाली. कर्मकांडे बंद झाली. पण आजची स्थिती काय आहे? तर बौद्ध समाज परत देवदेवतांकडे आकर्षित होऊन कर्मकांड, अंगारे-धुपारे, उपास-तापास, नवस-सायास करू लागला आहे. बुवांच्या-दगडांच्या नादी लागून बकरे-कोंबडे मारू लागला आहे. देव्हारा आता त्याला परत-परत छळतो आहे. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळी मी देव मानणार नाही, कर्मकांड करणार नाही अशा एकूण बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्या प्रतिज्ञांचा आणि बुद्धाच्या शिकवणुकीचा बौद्धानुयायाला आज विसर पडला आहे. धर्म आणि धम्मातील मूलभूत फरकही तो विसरला आहे.धर्माचा संबंध देवाशी आहे, तर धम्माचा संबंध मानवाशी आहे. धर्म हा बुद्धिप्रामाण्य नाकारतो. धम्म बुद्धिप्रामाण्य मानतो. धर्म म्हणजे बंधन. धम्म म्हणजे स्वातंत्र्य. धर्म म्हणजे चमत्कार, भाकडकथा, दैववाद, तर धम्म म्हणजे विज्ञानवादी चिकित्सक बुद्धिनिष्ठा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंनी धर्म आणि धम्मात केलेला हा फरक नजरेआड केल्यामुळेच आज बौद्ध समाज पुन्हा एकदा जीर्ण-शीर्ण हिंदू रूढी-परंपरांकडे वळला आहे. बौद्धांची मानसिक स्थिती आज जुने सोडवेना आणि नवे स्वीकारता येईना अशी झाली आहे. बाबासाहेबांना बौद्ध धम्माद्वारे एक नवा समाज, नवा माणूस घडवायचा होता. जातिसंस्थेचे उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचे होते. सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यावयाची होती. लोकशाही धर्मनिरपेक्षता बळकट करणे हाही त्यांच्या धम्मस्वीकाराचा मूळ उद्देश होता. त्या अनुषंगाने आपण किती प्रगती केली याचे चिंतन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने व्हायला पाहिजे.