स्त्रियांना आणि समस्त मानवजातीला काही हक्क-अधिकार जन्मत:च प्राप्त झालेले आहेत. परंतु कालांतराने या मानवी समाज जीवनात काही बदल होत गेले. हे बदल काही चांगले तर काही वाईट असे होते. काही नव्हे तर बर्याच भागात हे बदल स्त्रियांवर अन्याय करणारे होते. या सामाजिक बदलातूनच त्यांच्या समस्या निर्माण झाल्या. सोबतच या समस्यांचा अभ्यास,चिंतन करणारा वर्ग सुद्धा तयार झाल्याचे आपणास दिसून येते.
भारतीय स्त्रियांच्या बाबतीत त्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम काही समाजसुधारकांनी केले. राष्ट्रमाता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राष्ट्रनायक छत्रपती शाहू महाराज,राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष केला. अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे महिला मागासलेल्या आहेत. या मागासलेपणाचे एकमेव कारण म्हणजे धार्मिक गुलामगिरी. बाबासाहेबांनी त्यांच्या समस्या नुसत्या समजूनच नाही घेतल्या तर त्यांनी आपल्या लिखाणातून, भाषणातून याबाबत जनजागृतीचे काम केले. आणि या देशातील स्त्रियांची परिस्थिती बदलल्याशिवाय त्यांची प्रगती झाल्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
ही आपली भूमिका अंमलात आणण्यासाठी बाबासाहेबांनी उचललेले पाऊल म्हणजे हिंदु कोड बिल. या बिलाच्या माध्यमातून स्त्रियांच्या प्रगतीसाठी त्यांना कायद्याने समानता देण्याची तरतूद आणि त्यासाठीचा प्रत्यक्ष कृतीकार्यक्रम देण्याचा बाबासाहेबांचा मानस होता. भारतीय राज्यघटनेपेक्षाही हिंदु कोड बिल बाबासाहेबांना महत्त्वाचे होते. या बिलाला झालेल्या विरोधामुळे जेव्हा २६ सप्टेंबर १९५१ रोजी हे बिल स्थगित करण्यात आले, त्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे २७ सप्टेंबर १९५१ रोजी डॉ. आंबेडकरांनी या गोष्टीचा प्रखर विरोध करीत आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावरून या देशातील महिलांच्या प्रश्नाबद्दल आणि त्यांच्या विकासाबद्दल त्यांची किती तळमळ होती, हे दिसून येते.
मात्र स्वत:चे प्रश्न आणि समस्या या देशातील स्त्रियांना समजल्या नसाव्या. त्यामुळेच या बिलाला विरोध करणार्यांतमध्ये महिलांची संख्या मोठय़ा प्रमाणात होती. या विरोधक महिलांचा एक गट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटला आणि आपण हे बिल मागे घ्या, असे म्हणाला. त्यावर हिंदु कोड बिल म्हणजे भारतीय महिलांच्या उन्नतीचे, विकासाचे प्रवेशद्वार असल्याचे बाबासाहेब म्हणाले. आणि त्या महिलांना विचारले की, त्यांनी हे बिल वाचले आहे काय? या प्रश्नाला उत्तर देताना त्या महिला म्हणाल्या की, ते त्यांनी वाचले नाही. परंतु त्यांच्या नवर्यांनी त्यांना या बिलाला विरोध करायला सांगितले म्हणून त्या विरोध करीत आहेत. आणि जर त्यांनी (महिलांनी) विरोध केला नाही तर त्यांचे नवरे दुसरे लग्न करतील, म्हणून सवत घरात येण्यापेक्षा या बिलाला विरोध केलेला बरा, म्हणून महिलांनी या बिलाला विरोध केला.
अशी अनेक कारणे होती. त्यामुळे या बिलाला सर्वच थरातून विरोध झाला. प्रत्यक्षात हिंदु कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिले व का लिहिले? याचा अभ्यास होणे त्यावेळी सुद्धा गरजेचे होते आणि ती आजची सुद्धा गरज आहे.
कायदा म्हणजे एखाद्या गोष्टीचा अधिकार किंवा प्रतिबंध असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते. भारतीय समाजजीवनाचा विचार करता हिंदु लोकांना कायदा म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृतीच्या रुपाने हजारो वर्षे धर्माची गुलामगिरी या देशात अविरतपणे राज्य करीत होती. स्त्रिया व शुद्रातिशूद्र हे या गुलामीत अंधकारमय, नरकयातना भोगीत जीवन जगत होते. पाप-पुण्याच्या कल्पनेत अडकून पुढच्या जन्मी सुख मिळावे यासाठी अपमानजनक जीवन त्यांनी स्वीकारले होते. तुलसीदास लिखित रामायणात ढोल, गवार, शुद्र, पशु, नारी ये सब है ताडन के अधिकारी असा नियमच लिहून ठेवला होता. या नियमांचे पालन न करणे म्हणजे पाप. त्यामुळे महिलांना देवदासी, बालविवाह, सतीप्रथा, केशवपन या व अशा अनेक अमानवीय रुढींना तोंड द्यावे लागत होते. आजही धर्माच्या नावाखाली महिलांवर होणार्या अन्याय-अत्याचाराचे प्रमाण कमी नाही. आज बालविवाह,हुंडाप्रथा या गोष्टींना कायद्याने जरी बंदी असली तरी प्रत्यक्षात समाजात हे घडतच आहे. मुलींचे लग्न लवकर झाले पाहिजे म्हणून आजही अनेक मुलींना शिक्षण अर्ध्यातूनच सोडून द्यावे लागते. या मुलींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कितीतरी विजोड विवाह होताना दिसतात. जबरदस्तीने वैध्यव्यात जीवन जगावे लागते. आज थोडेफार हे स्वरुप बदललेले दिसत असले तरी या समस्या व त्यांची कारणे घट्ट मुळ धरून आहेत. राष्ट्रमाता क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राष्ट्रनायक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूतिंनी केलेल्या अविरत संघर्षानंतरही जर या विषमतावादी धर्माची मूळे आजही घट्ट मूळ धरून आहे, तर या महामानवांच्या पूर्वीची परिस्थिती किती भयानक होती याची कल्पनाच केलेली बरी.
आज भारतीय संविधानानुसार देशाचा राज्य कारभार चालतो. भारतात कायदा आणि सुव्यवस्था आहे, तरी महिलांच्या येवढय़ा समस्या आहेत मग मनुच्या राज्यात किती भयानक होत्या हे आजही आपण मनुस्मृतीचे कायदे वाचून अनुभवू शकतो. जनावरांपेक्षा अत्यंत वाईट वागणूक स्त्रियांना दिली जात होती. फक्त चूल आणि मूल हेच तिचे आयुष्य होते. हे आयुष्य सुद्धा तिच्या मर्जीने नाही तर धर्माच्या मर्जीने चालायचे. तिचे जीवन तिने कसे जगायचे हे ती ठरवू शकत नव्हती. शिक्षणाचा अधिकार नाही की काही बोलायची साधी संधी नाही. मग आपले मत व्यक्त करणे किंवा एखादा निर्णय घेणे तर कोसो दूर. स्त्री म्हणजे नरकाचे द्वार, जगात जे काही वाईट आहे, जे दु:ख आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे स्त्री. अशी धर्माने दिलेली शिकवण, म्हणून जन्मताच मुलींचा बळी देण्यात येत असे.
स्त्रियांना समाजात समानता मिळवून देण्याच्या दिशेने सर्वप्रथम काम केले ते तथागत बुद्धांनी. त्यांनी आपल्या विचारातून आणि आपल्या कृतीतून समानता प्रस्थापित केली. नंतरच्या काळात फुले, शाहू, आंबेडकरांनी तथागत बुद्धांच्या या विचारधारेला अंमलात आणले.
फुलेंनी समाजाच्या विरोधाला व प्रस्थापितांना न जुमानता ब्राह्मणी धर्मग्रंथांना नाकारले, महिलांच्या समस्यांचे मुळ कारण हे जातिव्यवस्थेत आणि धार्मिक गुलामगिरीत असल्याचे मत त्यांनी मांडले. समस्यांचे मूळ समजल्यामुळे सावित्रीमाई व जोतीबा फुलेंनी नियोजित कृति कार्यक्रम राबविला. शिक्षणाचा हक्क धार्मिक व्यवस्थेने नाकारल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. हे जाणून फुलेंनी सर्वप्रथम महिलांना शिक्षण देण्यास सुरूवात केली. समाजात वाढलेल्या अनैतिकतेमुळे विधवांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. त्यांचे केशवपन करून त्यांना विद्रुप केले जात होते. त्यांना पुनर्विवाहाची बंदी होती. अशा विधवांचा हे धर्ममार्तंड शारीरिक उपभोग घेत असत आणि त्यांना जर गर्भधारणा झाली तर मात्र समाज त्यांना जगू देत नसे.
अशावेळी त्या विधवांना स्वत:चे जीवन संपविण्याशिवाय काही पर्याय राहत नव्हता. या अत्याचारातून होणार्या नवजात बालकांना त्या कुठेतरी टाकून देत होत्या. फुले दांपत्यांनी या महिलांना सुरक्षा दिली. विधवांना धर्ममार्तंडाच्या जाचातून वाचविण्यासाठी त्यांनी विधवाश्रम, बाळंतगृहे यांची निर्मिती केली. सोबतच या प्रश्नांवर समाजात जाणिव, जागृती केली. याच काळात भारतीय स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी इंग्रजांच्यामुळे सतीबंदी, बालविवाहबंदी हे कायदे बनले. तरी सुद्धा आजही भारतीय महिलांच्या समस्या कायम राहिलेल्या दिसून येतात.
बाबासाहेबांनी भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास केला, त्यांच्या मते या देशाची प्रगती, विकास जर व्हावयाचा असेल तर सर्वप्रथम या देशातील महिलांचा विकास होणे गरजेचे आहे. जोवर महिलांचा विकास होणार नाही तोपर्यंत देश विकसित होणार नाही. म्हणूनच त्यांनी महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट करून हिंदु कोड बिल लिहिले. या बिलाच्या माध्यमातून त्यांना या देशातील महिलांना जीवनाच्या प्रत्यक्षात समानता मिळवून द्यायची होती. संपत्तीमध्ये समान वारसाहक्क, एक पतिव्रता, पोटगी, शिक्षण या अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबी या बिलामध्ये होत्या. मात्र तेव्हाचे शंकराचार्य जेरेशास्त्रींनी या बिलाला विरोध करण्यासाठी बाबासाहेबांवर हल्ला केला. ते म्हणतात, आंबेडकर विद्वान आहेत, त्यांचा धर्मशास्त्रांचा अभ्यास आहे, असे म्हणतात. पण जे अंत्यज आहेत. आंबेडकरांच्या नालीतून आलेली धर्मशास्त्रांची गंगा पवित्र कशी असणार? मोरीतून आलेल्या दूधासारखी ती त्याज्य आहे. आंबेडकरांचा स्वजाती अभिमान वैगरे साफ खोटा आहे. समानतेच्या नावाचे ढोंग करून त्यांनी ब्राह्मणाची मुलगी उपटली. आमचा ब्राह्मणी धर्म नष्ट करण्याचे हे कारस्थान आहे, ह्याची खर्या हिंदूने कल्पना बाळगावी. बाबासाहेबांना विरोध करणार्या या विरोधकांना चांगले माहित होते की, या बिलामुळे भारतीय स्त्रियांना समानता मिळेल आणि धर्माचे / मनुस्मृतीचे राज्य संपुष्टात येईल.
भारतीय राज्यघटनेतील तरतूदींमुळे महिलांना समानता मिळाली, शिक्षण मिळाले आणि आज जी स्त्रियांची सामाजिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात प्रगती दिसते ती या राज्य घटनेमुळेच. परंतु आजही बहुसंख्य स्त्रिया धर्माच्या गुलामगिरीत अडकून पडल्या आहेत. जर त्यांची खर्या अर्थाने प्रगती साधावयाची असेल तर हिंदू कोड बिलातील तरतूदी अंमलात आणल्याशिवाय तरणोपाय नाही.
No comments:
Post a Comment