डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता : 1920 ते 1928 ' असा खंड महाराष्ट्र सरकारने 2005 साली प्रकाशित केलेला आहे . त्यावरून आणि थोडीशी स्वतंत्रपणे आपल्याला काही माहिती मिळते . बाबासाहेबांनी 1920 मध्ये ' मूकनायक ' असं एक पाक्षिक सुरू केलं होतं . ' मूकनायका ' ची सुरुवात करताना आंबेडकरांनी लिहिलेलं : बहिष्कृतांच्या ' अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील . ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे ' . ' मूकनायक ' लगेचंच बंद पडलं , मग आंबेडकरांनी ' बहिष्कृत भारत ' हे पाक्षिक 3 एप्रिल 1926 रोजी सुरू केलं . ही दोन्ही फारच कमी काळ सुरू राहू शकलेली पत्रं होती . यातल्या मुख्यत्त्वे ' बहिष्कृत भारत ' मधलं लिखाण आपण उल्लेख केलेल्या खंडात आहे .
आता आपण आपल्या वरती नोंदवलेल्या ' सत्यशोधकी कर्म ' या शब्दांकडे आणि त्यासंबंधीच्या अर्थाकडे आणि त्याच्या परंपरेकडे येऊ . आंबेडकरांनी ' बहिष्कृत भारत ' पाक्षिकाच्या 7 डिसेंबर 1928 च्या अंकापासून लोकहितवादींच्या शतपत्रांचं पुनर्मुद्रण केलं होतं . या पुनर्मुद्रणामागची भूमिका त्यांनी त्याच अंकात स्पष्ट केलेली . ही भूमिका आपल्याला महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या सोबतच्या खंडात मिळते . ही भूमिका आपण खाली नोंदवू , कारण नोंदीच्या सुरुवातीला आपण जे खूप वर्षांच्या घडामोडींनी तयार होणारे अर्थ असं म्हटलं त्याचा काही अंदाज आंबेडकरांनी लिहिलेल्या या मजकुरावरून येऊ शकेल . एकूण रेषा फारच मोठी निघेल , आपण फक्त त्यातला एक बिंदूच नोंदवतोय . मजकूर प्रसिद्ध झाला त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं व काळ सुमारे नव्वद वर्षं मागचा आहे हे लक्षात घेऊन हा मजकूर वाचू . तर , डॉ . बाबासाहेब आंबेडकर लिहितात :
डॉ . बाबासाहेब आंबेडकर चरित्र - साधने प्रकाशन समिती
या अंकापासून आम्ही सुप्रसिद्ध लेखक गोपाळराव हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या पत्रांचे पुनर्मुद्रण सुरू केलें आहे . सरळ व असंदिग्ध भाषा , सडेतोड विचारसरणी व भरीव व्यवहारज्ञान हे लोकहितवादींच्या लिखाणाचे विशिष्ट गुण आहेत . तत्त्वज्ञानाच्या निष्फळ गप्पांनी व तर्कशास्त्रांच्या शब्दावडंबरी लपंडावांनी लोकांना भुलविण्या - झुलविण्याच्या भरीस लोकहितवादी कधीच पडले नाहीत . आपल्या सामाजिक व्यवहारांतील रोजच्या प्रसंगावर व त्यांच्या मागे असलेल्या भावभावनांवर त्यांनी लिहिले आहे , आणि त्यांचे लिखाण अत्यंत स्पष्टोक्तीपूर्ण , निर्भीड व हृदयस्पर्शी आहे . भूतकालीन ' रामराज्या ' पेक्षा आजच्या सामाजिक आचारविचारांतील दोष हेच त्यांच्या लिखाणाचे मुख्य विषय असल्याचे दिसून येईल . लोकमान्यता मिळवायची असेल तर आपल्या दोषांचाही गुण म्हणून उदोउदो करणे व परकियांच्या गुणांनाही दोष म्हणून त्याज्य ठरविणे , हा मार्ग आहे . पण लोकहितवादींनी हा मार्ग कधीच अनुसरला नाही . आपल्या दोषांचे त्यांनी कठोरपणे आविष्करण केले व तसे करताना अमके नाराज होतील अगर तमक्यांची मने दुखावतील याविषयी त्यांनी पर्वा केली नाही .
जुन्या घातक रूढी , जरीपुराण्या टाकाऊ कल्पना व समजुती , धार्मिक दुराग्रह , व ढोंगीपणा इत्यादी विषयांवरही लोकहितवादींनी सडेतोड लेख लिहिले आहेत ; व ते सर्वांना मार्गदर्शक होतील असेच आहेत . सर्व ठिकाणी सत्यान्वेषी बुद्धी व सारासार विचारशक्ती जागृत पाहिजे , ही लोकहितवादींची मुख्य शिकवण आहे . लोकहितवादींची परंपरा जर महाराष्ट्रात चालली असती तर आपले सामाजिक प्रश्न आजच्या इतके सोडविण्याला कठीण होऊन बसले नसते . पण दुर्दैवाने टिळक - चिपळूणकर परंपरा टाळ्यांच्या कडकडाटांत पुढे आली , व लोकहितवादींची धिम्मी व कार्यक्षम परंपरा मागे पडली . याचे परिणाम आजवर महाराष्ट्राने भोगले आहेत , व अजूनही त्यांतून त्याची सुटका झाली नाही . असो , लोकहितवादींनी 75 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या परिस्थितीतही उपयुक्त असेच आहेत . आमच्या वाचकांना ते मार्गदर्शक होतील असे वाटल्यावरूनच आम्ही तत्प्रकाशनाचे कार्य सुरू केले आहे
No comments:
Post a Comment