आपणच हळूहळू जाण्याचा मार्ग घोषित केला म्हणजे समाज हलतच नाही. समाज परिवर्तनात हे श्रेय महर्षी कर्वे, राजर्षी शाहू, भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. या चौघाही पुरुषांतील सर्व गुण एकत्र करणारे व्यापक समन्वयाचे स्थान कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आहे. म. फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा काढली. या द्रष्टेपणाचे व ध्येयवादी निर्भयपणाचे श्रेय आपण म. फुले यांनाच देऊ. पण हा प्रश्न केवळ एका शाळेने सुटणारा नव्हता. एकूण शाळा किती काढल्या? त्यातून एकूण नवशिक्षित स्त्रियांची निर्मिती किती झाली आणि स्त्रीशिक्षण समाजात रुळले किती? हे प्रश्न फुले यांना विचारण्यात अर्थ नाही. ते कार्य जन्मभर महर्षी कर्वे यांनी केले. आज स्त्रियांनी शिकावे की शिकू नये, हा प्रश्नच उरला नाही. शाळेत जाणारी स्त्री ही आता जीवनात नित्याची बाब ठरली आहे. पण कर्वे यांचे कार्यक्षेत्र शहरे व वरिष्ठ वर्ग याबाहेर फारसे पोहोचू शकले नाही. ग्रामीण भागातील सर्व जाती-धर्माच्या हजारो स्त्रियांना शिक्षण देऊन वेगवेगळ्या बाजूंनी चित्र पुरे करण्याचे कार्य कुणी केले? ते भाऊराव पाटील यांनी पार पाडले आहे. हे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे.
म्हणून स्त्री-दास्य विमोचनाच्या कार्यात कर्वे आणि भाऊराव असे जोडकार्य सांगितले पाहिजे. अस्पृश्यांची पहिली शाळा काढण्याचे श्रेय म. फुले यांचे. अस्पृश्यांच्या शिक्षणात शाहू महाराजांचाही वाटा मोठा आहे. या समाजाची राजकीय जागृती करणारा तर प्रत्यक्ष भिम भगवानच. पण हजारो अस्पृश्यांना सुशिक्षित करून सुशिक्षित दलितांची नवी पिढी निर्माण करण्याचे श्रेय आपण कुणाला देणार? या कार्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे श्रेय भाऊराव पाटलांचे. उच्च शिक्षणात ते बाबासाहेबांच्या श्रेयाचे वाटेकरी आणि बहुजन समाज साक्षर करणा-या चळवळीचे तर ते सर्वात मोठे कार्यकत्रे. एवढे यश राजे असून प्रत्यक्ष शाहू महाराजांनाही लाभले नाही. स्त्रिया, दलित व बहुजन समाज सुशिक्षित करून सोडताना भाऊरावांनी मिळतील ते ब्राणही ज्ञानगंगेत धुऊन पवित्र करून सोडले. म्हणून त्यांना समन्वयाचे सर्वात मोठे प्रतिनिधी म्हणायचे.
भाऊराव पाटलांचा काळ म. फुले आणि शाहू महाराज यांच्या मानाने कितीतरी अलीकडचा. त्यांच्या शिक्षणकार्याचा आरंभच मुळी इ. स. १९०९ साली झाला. हे वर्ष मोल्रे-मिंटो सुधारणांचे आणि रयत शिक्षण संस्था तर १९१९ ची, म्हणजे माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांच्या वेळची! पण मला उपलब्ध आकडेवारीनुसार इ. स. १९४५ रोजी त्यांच्या शाळांची संख्या चारशे होती. म्हणजे किमान पन्नास हजार मुले तिथे शिकत होती, याला मी व्यापक सामाजिक चळवळ म्हणतो. आजवरचा हिशोब केला तर कर्मवीरांच्या संस्थेत शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांनी मोजावी लागेल. जनतेला ज्ञानी करण्याचे एवढे प्रचंड कार्य महाराष्ट्रात आजवर कुणी केलेलेच नाही. सरकारचा क्रमांक पहिला, भाऊरावांचा क्रमांक दुसरा आणि राजेरजवाडय़ांचे क्रमांक यानंतर येतात.
भाऊराव पाटलांचे हे कार्य स्थूलमानाने पाहिले तर गांधी युगातले कार्य आहे. या युगाचे काही संस्कार भाऊरावांवर झालेच. गांधीजींनी सामाजिक सुधारणा आणि राजकीय क्रांती एकत्र आणली. गांधीयुगात क्रमाक्रमाने महाराष्ट्रातला बहुजन समाज केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखाली संघटित झाला. याच्या परिणामी भाऊराव पाटील कडवे स्वातंत्र्यवादी झाले. महाराष्ट्रात ज्या राजकीय चळवळी झाल्या त्यात भाग घेणारे हजारो कार्यकत्रे भाऊरावांनी निर्माण केले. या वातावरणातून यशवंतराव चव्हाणांचा उदय होतो. भाऊराव पाटलांसारखी माणसे चव्हाण घडवितात. राजकीय नेत्यांना जमणारे व जुळणारे हे काम नव्हे. म्हणून एकीकडे सामाजिक स्वातंत्र्य व दुसरीकडे राष्ट्रीय स्वातंत्र्य या दोन्ही जाणिवांचा प्रबळ समन्वय पाटलांच्या रूपाने होतो. शिवाय हे समन्वयाचे केंद्र सत्तास्पध्रेपासून दूर असल्यामुळे पूर्णपणे विधायक व रचनात्मक होते. विघातक प्रेरणांचा त्यांना स्पर्श नव्हता. अजून दोन बाबींचा उल्लेख केल्याशिवाय भाऊरावांचे वर्णन पूर्ण होणार नाही.
ते स्वत: ब्राह्मणेतर राजकारणाच्या परंपरेतून येत असल्यामुळे ग्रामीण भाग व शेतकरी यांचा विचार पाटलांच्या मनात सदैव असणे भागच होते. या शेतीच्या प्रश्नाचा सावकाराच्या संदर्भात विचार करणे अपुरे आणि निरुपयोगी आहे, याची जाणीव गांधीयुगात त्यांना झाली. सर्व भारतीय शेतक-यांचे व म्हणून महाराष्ट्रीय शेतक-यांचे मुख्य प्रश्न तीन आहेत. त्यांच्या जमिनींची उत्पादनक्षमता कशी वाढविता येईल; पाण्याची सोय, खते, नवी बीजे, ट्रॅक्टर असा हा विचार चालतो. याला शेतीचे आधुनिकीकरण म्हणतात. दुसरा प्रश्न शेतीमालाला योग्य व रास्त भाव कसा मिळवून देता येईल हा आहे. तिसरा प्रश्न शेतीशिवाय ग्रामीण जनतेला वेगवेगळे जोडधंदे कसे मिळवून द्यावेत हा आहे. या मूलभूत प्रश्नांच्या मानाने सावकारीचा प्रश्न अगदी सामान्य आहे. हा प्रश्नच इंग्रजी राजवटीच्या मागे अॅडॅम स्मिथ व बेथॅमचा जो विचार होता त्यातून निर्माण होतो. कर्जफेडीसाठी शेतक-याचे घर, जमीन व शेतीची अवजारे जप्त करता येणार नाहीत, असा एक कायदा सावकारशाहीची कंबर मोडून टाकतो आणि सहकारी बँकांकडून मोठया प्रमाणात कर्जपुरवठयाची सोय केली की, सावकारशाही मृतप्राय होते.
खरी अडचण ही आहे की, सावकार लंगडा, लुळा केला तरीही जर शेतकरी दरिद्रीच असला तर गुंडगिरीवर कारभार चालविणारी बेकायदेशीर नवी सावकारशाही अस्तित्वात येत असते, आज आपण हे घडताना पाहत आहोत. म्हणून भाऊराव पाटलांनी एकीकडे सहकारी चळवळ वाढविणे व दुसरीकडे शेतीच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष देणे असा दुहेरी उद्योग केला. यामुळे मनाच्या आधुनिकीकरणाच्या चळवळीचा समाजातील उत्पादनव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाशी सांधा जोडला जातो व विज्ञान युगाशी माणूस जोडला जातो. सावकारशाहीवर व्याख्याने देणे व सावकारांविषयी समाजात राग जागा करणे, इतक्याने हा प्रश्न सुटणार नाही. सावकार व जमीनदार जनतेचे रक्त शोषण करीत असतात, ते जनतेचे शत्रूच होत. पण यांच्यापेक्षा मोठा शत्रू भांडवलशाहीची अर्थरचना असतो. उत्पादन न करता फक्त देवघेवीच्या उद्योगावर कोटयवधींची संपत्ती सांडवणारा अनुत्पादक व्यापारी हा सावकारापेक्षा भयानक असतो. पुष्कळ वेळा तर असे चित्र दिसते की, हा व्यापारीच जोडधंदा म्हणून सावकारीही करीत असतो.
🙏🙏🙏🙏
ReplyDelete