अल्पसंख्याकांसाठी केलेल्या सवलतींच्या तरतुदीमुळेही मसुदा समितीवर टिका करण्यात येत आहे. यासाठी मसूदा समिती जबाबदार नाही. संविधान सभेने घेतलेल्या निर्णयांची ती अंमलबजावणी करते. माझ्या दृष्टीने अल्पसंख्याकांना सवलत देण्याचा संविधान सभेने घेतलेला निर्णय जो येथे कृतीत आणला आहे तो शहाणपणाचा आहे. याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. या देशात अल्पसंख्य आणि बहुसंख्य या दोघांनीही चुकीचा मार्ग अनुसरला आहे. अल्पसंख्याकांचे अस्तित्व नाकारणे ही बहुसंख्याकांची चूक आहे.
अल्पसंख्याकांनी स्वत:चे अल्पसंख्यत्व गोंजारणे व त्याला चिरस्थायी स्वरुप देण्याचा प्रयत्न करणे हे सुध्दा तेवढेच चुकीचे आहे. दुहेरी हेतू साध्य होईल असा उपाय शोधणे आवश्यक आहे. सुरुवात म्हणून त्यात अल्पसंख्याकांचे अस्तित्व मान्य करायलाच हवे. असाही प्रयत्न व्हावा की ज्यामुळे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक एक ना एक दिवस एकजीव होणे शक्य होईल. संविधान सभेने सुचविलेल्या उपायांचे स्वागत झाले पाहिजे. कारण या उपायामुळे हा दुहेरी हेतू साध्य होतो. धर्मांधतेची भावना वाढीस लागून अल्पसंख्याकांच्या सवलतींना विरोध करणा-यांना मी दोन गोष्टी सांगू ईच्छीतो. एक अशी की, अल्पसंख्यांक स्फोटक शक्ती असते. जर तिचा स्फोट झाला तर त्यात संपुर्ण राज्य व्यवस्था उध्वस्त होऊ शकते. यूरोपचा इतिहास अशा प्रकारच्या आणि भयानक वास्तववादी घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे.
दुसरी गोष्ट अशी की, भारतातील अल्पसंख्याकांनी स्वत:चे अस्तित्व बहुसंख्याकांच्या हाती सोपविण्याचे मान्य केले आहे. आयर्लंडची फाळणी टाळण्यासाठी झालेल्या वाटाघाटीच्या इतिहासात रेडमंड हा कार्सनला म्हणाला होता की, प्रोटेस्टटं अल्पसंख्याकांसाठी तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही सवलतींची मागणी करा परंतू आयर्लंड एकसंघ राहू द्या. तेव्हा कार्सननी दिलेले उत्तर असे होते की, चुलीत टाका तुमच्या सवलती तुम्ही आमच्यावर राज्य करावे हेच आम्हाला मान्य नाही. भारतातील कोणत्याही अल्पसंख्याक समाजाने अशी भूमीका घेतलेली नाही. ही बहुसंख्यांकांची मूलता: राजकीय नसून जातीयवादी आहे. अशा जातीयवादी बहुसंख्यांकांचे राज्य अल्पसंख्याकांनी निष्ठेने स्वीकारले आहे. म्हणून अल्पसंख्याकांच्या प्रति भेदभाव न करणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव बहुसंख्याकांनी ठेवावी. अल्पसंख्याकत्व टिकून राहणे किंवा एकजीव होणे हे बहुसंख्याकांच्या वागणूकीवर अवलंबून राहणार आहे. अल्पसंख्याकांच्या विरोधात भेदभाव करण्याची सवय बहुसंख्यांक ज्या क्षणी सोडतील त्या क्षणी अल्पसंख्यांक अस्तित्वात राहण्याचे कारण उरणार नाही व ते एकजीव होतील.
साभार, मासिक सम्मासम्बुध्द
ऑगस्ट २०१३
ऑगस्ट २०१३
No comments:
Post a Comment