‘अघोरी शक्तीची अनामिक भीती, बाबांच्या जाती-धर्माचा बागुलबुवा अन् राजकीय नेत्यांची नस्ती लुडबुड’ या अभद्र युतीमुळे आजपावेतो ‘बुवाबाजी’वरच्या कारवाईपासून शक्यतो ‘खाकी वर्दी’ चार हात दूरच राहिली. हे कमी पडलं की काय म्हणून ‘लक्ष्मी’च्या साक्षीनं हीच ‘बंडल’बाज भोंदूगिरी कायद्याच्या छाताडावर बसून कधी-कधी थयथयाटही करून गेली. थोडक्यात, ‘बुवाबाजी’विषयक कितीही कठोर कायदे केले, तरी परिवर्तन तेव्हाच होईल; जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करणार्या पोलीस खात्याची मानसिकता पुरती बदलली जाईल !
-------------------------------------------------------------------------------------------------
गावाबाहेरच्या मोकळ्या शिवारात महाराजांचा आश्रम उभारलेला. कुठून-कुठून आलेल्या भक्तांच्या गाड्या याच परिसरात आडव्या-तिडव्या लावलेल्या. कुणी झाडाखाली, तर कुणी बांधावर.. घोळक्या-घोळक्यानं कुजबूज चाललेली. आत आश्रमात पाच-पंचवीस भक्तमंडळी. यात महिलांचाच अधिक भरणा. कुणी आजारी नवर्याला घेऊन आलेली, तर कुणी लेकराच्या प्राप्तीसाठी आसुसलेली. सार्यांच्या नजरा एकाच ठिकाणी एकवटलेल्या.. जिथं धुराच्या कोंडाळ्यात महाराज बसलेले. त्यांच्यासमोर वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटो. तंत्र-मंत्रांवरची जुनी जाणती पुस्तकं. बाजूलाच लिंबांचा ढीग, हळदी-कुंकवाच्या पुड्या अन् काळ्या दोर्याच्या बंडलांवर विखरून पडलेल्या ताइताच्या पेट्या.
एकेक भक्त महाराजांसमोर येऊन बसायचा. आपलं गार्हाणं सांगायचा. त्यांच्याकडून ‘उतारा’ घेतला, की बाहेर पडायचा. पण, हे सारं चिडीचूप चाललेलं. कुठंही आवाज नाही, गोंधळ नाही; जणू काही आश्रमातल्या गडद काळोखाला ही गूढ शांतता चांगलीच सरावलेली.
पुढची बाई उठून गेल्यानंतर महाराजांसमोर एक पुरुष भक्त येऊन बसला. ‘‘महाराज.. गेल्या एक वर्षापासून मी बेकार आहे. मला नोकरीवरून काढून टाकलंय. बायकोपण माहेरी निघून गेलीय. माझ्यामुळंच मुलं होत नाहीत, असा सासरच्या लोकांचा आरोप आहे. काय करावं सुचत नाहीये. आयुष्याचाच कंटाळा आलाय बघा महाराज!’’ समोरच्या भक्ताची केविलवाणी कहाणी महाराजांनी शांतपणे ऐकून घेतली. मग डोळे मिटून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. दोन मिनिटांनंतर मान हलवली. डोळे उघडून महाराजांनी बोलण्यास सुरुवात केली. ‘‘तुमच्यावर कुणीतरी करणी केलीय. तुम्हाला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न चाललाय; पण काळजी करू नका.. मी आहे ना. काही उपाय देतो. ते आपल्याला करावे लागतील. तुमची इच्छा असेल, तर सांगा.. माझ्या माणसांना त्यासाठी बरीच तयारी करावी लागेल.’’
समोरच्या भक्तानं मान हलवत हळूच खर्चाचा आकडा विचारला. महाराजांनी शेजारच्या सहकार्याकडे तिरका कटाक्ष टाकला. लगेच तो सहकारी कागदावर काहीतरी आकडेमोड करीत उत्तरला, ‘‘सुमारे पंधरा हजार खर्च येईल. करायचं फिक्स असेल, तर आता पाच हजार देऊन जा.. कारण, आम्हाला सर्व सामान आणावं लागेल.’’ हे बोलणं संपत असतानाच गर्दीतले तीन-चार इतर पुरुष पुढं सरसावले. महाराजांभोवती कोंडाळं करून बसले. एकानं बॅगेतून कॅमेरा बाहेर काढला. अंधार्या आश्रमात फटाफट फ्लॅश चमकले. काहीतरी अघटित घडतंय, हे महाराजांच्या लक्षात आलं. त्यांच्या चेहर्यावरचे हावभाव क्षणाक्षणाला बदलू लागले.
एवढय़ात समोरचा भक्त जोरात बोलू लागला. इतका वेळ मलूल होऊन आपली गार्हाणी सांगणार्या या भक्ताचा खणखणीत आवाज कानावर पडताच आजूबाजूचे भक्तही दचकले. ‘‘महाराज.. मी अंनिसचा कार्यकर्ता आहे. मला चांगली गलेलठ्ठ पगाराची नोकरी असून, माझी बायको माझ्यासोबतच आहे. विशेष म्हणजे मला दोन मुलंही आहेत. जर तुमच्याकडे दैवी शक्ती असती, तर महाराज.. मी खोटं बोलतोय, हे तुमच्या पटकन लक्षात आलं असतं. आता तुमचा खेळ खल्लाऽऽस. चला पोलीस ठाण्यात!’’
क्षणार्धात दैवी महाराजांचा मुखवटा गळून पडला. भोंदू बुवाचं वास्तव समोर आलं. मग काय.. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांसोबत या बाबाची ‘मिरवणूक’ पोलीस ठाण्यात पोहोचली.
‘‘साहेब.., आम्ही अंनिसवाले. आज बुवाबाजीचा पर्दाफाश केलाय. या बाबाच्या विरोधात आम्हाला कंप्लेट नोंदवायचीय.’’ एक कार्यकर्ता बोलत असताना ठाण्यातले बाकीचे ‘गणवेश’धारी डोळे रोखून विचित्र नजरेनं बघू लागले. ‘ही नसती उचापत करायला यांना कोणी सांगितलं?’ हा बाळबोध प्रश्न या लोकांच्या नजरेसमोर तरळला; परंतु अशा प्रतिक्रियांची कार्यकर्त्यांना चांगलीच सवय झालेली. लिंबू, ताईत अन् गंडेदोरे अधिकार्याच्या टेबलावर ठेवून कार्यकर्ते पुढच्या ‘अँक्शन’ची वाट पाहू लागले.
अधिकार्यानं फोन करून वरच्या साहेबांशी चर्चा केली. आरोपी आपसूकच मुद्देमालासह ताब्यात आला असला, तरी त्याच्यावर नेमकं कोणतं कलम लावायचं, यावर बरीच खलबतं झाली. अखेर ‘लोकांची फसवणूक करणं’ या आरोपाखाली ४२0 कलम लावू या, असा निर्णय झाला. तेव्हा ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी ‘मॅजिक ड्रग्ज अँण्ड रेमिडीज अँक्ट’ची आठवण करून दिली. कोणतीही परवानगी नसताना लोकांच्या रोगावर उपचार करणं, हासुद्धा ‘मेडिकल अँक्ट’नुसार गुन्हा ठरू शकतो, याचीही जाणीव करून दिली.
मात्र, साहेबांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला. ‘‘कृपया आम्हाला कायदा शिकवू नका. आम्हाला तो खूप चांगला समजतो.’’ थोडक्यात, या कहाणीचा शेवट काय? वर्षानुवर्षे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून बसलेला हा भोंदू बुवा केवळ एका साध्या कलमाखाली ‘आत’ गेला.. अन् तत्काळ जामीन मिळवून पुन्हा ‘बाहेर’ आला! जणू काही एका दिवसात हा महाराज कायदा कोळून प्याला.. अन् पुन्हा एकदा गावाबाहेर बिनधास्तपणे ‘दुकानदारी’ थाटून बसला; कारण त्यानं ओळखलं होतं, की कायदा जरी कठोर असला, तरी राबविणारे हात मात्र ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ म्हटलं, की लगेच ढिले पडतात. असा हा विचित्र अनुभव केवळ एकाच घटनेत नव्हे, तर कैक मोहिमेत ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना आलेला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ सर्वाधिक गाजली, ती ‘बुवाबाजी पर्दाफाश’ मोहिमेमुळं. गेल्या पंचवीस वर्षांत डॉक्टरांच्या हयातीत जवळपास चारशे बाबांच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यातल्या शंभरपेक्षाही जास्त ठिकाणी एक पत्रकार म्हणून मी घटनास्थळी हजर होतो. ‘बोगस भक्त’ बनण्यापासून ते ‘बुवाची भंबेरी’ उडविण्यापर्यंतच्या प्रत्येक घडामोडींमध्ये मी साक्षीदार होतो. या सार्याच प्रकरणांमध्ये ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी दाखविलेलं धाडस वाखाणण्याजोगं होतं. मात्र, बहुतांश केसेसमध्ये जाणवलेला पोलिसांचा निरुत्साह अन् तटस्थपणा अत्यंत धक्कादायक होता.
कोकणातल्या ‘नाणीज’पासून ते दक्षिण भारतातल्या ‘पुट्टपर्थी’पर्यंत अनेक ठिकाणी धडका देणार्या ‘अंनिस’ला सर्वाधिक संघर्ष करावा लागला कर्नाटक-आंध्र सीमेवरच्या महाराष्ट्रीय ग्रामीण भागातच. मूल व्हावं म्हणून पुरुषाच्या पाठीवर थयाथया नाचणारा मंद्रुपचा ‘शेखूबाबा’ असो, की भूत घालविण्यासाठी घराच्या फरशा फोडायला लावणारा सांगवीचा ‘बनेनवार बुवा’ असो.. या भोंदूगिरीविरुद्ध प्रचंड गवगवा होऊनदेखील अखेर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनाच आवाज उठवावा लागला. अक्कलकोट तालुक्यातील शावळ प्रकरण प्रसारमाध्यमांनी उचलून धरलं, तेव्हा इथला ‘मटका’फेम स्वयंघोषित बालयोगी महाराज कर्नाटकात फरार झाला. मात्र, शेवटपर्यंत त्याच्या विरोधात पोलीस फाइलीत चार ओळींची साधी नोंद करण्याचं धाडस तिथल्या पोलिसांना दाखविता आलं नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी प्रकरणातही जवळपास तसंच घडलं. कोण कुठली बाई.. हुपरी गावात येऊन सोन्याच्या खजिन्याचा दृष्टांत देते काय अन् तब्बल चार दिवस जेसीबीनं कैक फूट जमीन खोदायला लावते काय.. सारंच अघटित होतं, विचित्र होतं; तरीही इथली ‘खाकी’ आळीमिळी गुपचिळी करून चिडीचूप बसली होती. त्या वेळीही शेवटी प्रसारमाध्यमांनाच पुढाकार घ्यावा लागला होता.
‘अंनिस’चे कार्याध्यक्ष प्रशांत पोतदार सांगत होते, ‘‘ज्या पोलीस ठाण्यात आम्हाला तरुण अधिकारी भेटले, तिथं अशा प्रकरणांत चांगला मॉरल सपोर्ट मिळाला. मात्र, इतर ठिकाणी ‘आश्चर्य अन् भीती’चाच अंश अधिक प्रमाणात पाहायला मिळाला. नवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेल्या वयस्कर कर्मचार्यांच्या दृष्टीनं तर आमची ही मोहीम म्हणजे नस्ती उठाठेव होती. अज्ञात दैवी शक्तीला विनाकारण अंगावर ओढवून घेण्याची मस्ती होती.’’
समोरच्या बाबाला आपण विनाकारण का डिवचायचं, असा विचार करणारे जेवढे पोलीस अधिकारी आजपर्यंंत कार्यकर्त्यांना भेटले, त्याहीपेक्षा जास्त त्या महाराजाची जात अन् धर्म पाहणारेही अधिक निघाले. ‘‘तुम्ही काय फिर्याद दाखल करून निघून जाल.. पण, पुढचं आम्हाला निस्तरावं लागतं,’’ असं स्पष्टपणे सांगणार्या अधिकार्यांनी अनेकदा कटू वास्तवाचीही जाणीव करून दिलेली. सर्वांंत कहर म्हणजे या बुवांच्या मागे कोणत्या राजकीय नेत्याचं बॅकिंग तर नाही ना, याचा अगोदर शोध घेऊनच पुढची कायदेशीर पावलं टाकणारी ‘खाकी’ही ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांंनी अनेक पोलीस ठाण्यांत अवाक होऊन पाहिलेली.
असो. सहा-सात महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंड इथं पोलिसांचं ‘अंधश्रद्धा’विषयक शिबिर घेतलं गेलं होतं. या शिबिरात ‘चमत्कारामागचं सत्य, वैज्ञानिक दृष्टिकोन अन् अंधश्रद्धा’ या विषयावर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांंनी दिवसभर विचारमंथन केलं होतं. जवळपास पाचशेपेक्षाही जास्त पोलिसांना याचा
इतका फायदा झाला, की प्रत्येक पोलीस प्रशिक्षण केंद्रात अशाच प्रकारचं शिबिर भरवावं, असा आग्रहही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी धरला होता. दुर्दैवानं त्यानंतर डॉक्टरांची हत्या झाली अन् तो प्रस्ताव तसाच कोनाड्यात पडला. पाहू या.. आता पोलिसांची मानसिकता बदलण्याचा प्रयोग पुन्हा कधी सुरू
होतोय ते!
(लेखक लोकमत सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)
(सदर लेख इथून संकलित केला आहे.)
Get Marathi, Hindi and English Books/Songs/Movies on Buddha and Dr. Ambedkar from here http://drambedkarbooks.com/
ReplyDelete