एका पारधी मुलाचे आई-वडील नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडले. त्यानंतर त्या मुलाला सरकारी भरपाईही मंजूर झाली... पण हे पारधी कुटुंब त्या "गावचे रहिवासी' नसल्यानं ती भरपाई त्याला मिळू शकली नाही... "आम्ही पारधी लोकं काही आभाळातून पडलेलो नाही, की पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही याच देशात जन्माला आलो आहोत. आम्हा पारध्यांना गावात घरं नाही, रानात शेत नाही. मग आम्ही एखाद्या "गावचे रहिवासी' आहोत, असा पुरावा आम्ही कुठून आणणार.. ?' त्या मुलानं विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही.
महाराष्ट्रात मराठवाडा म्हटला की दुष्काळी प्रदेश... सतत गरिबीत जगणारी, दुष्काळानं होरपळणारी माणसं... हेच दृश्य डोळ्यांपुढं येतं. मराठवाड्यात भटक्या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या संख्येनं स्थिरावलेले दिसतात. यात वड्डर, कैकाडी, बेलदार, रामोशी, वैदू, टकारी, बंजारा, पारधी या समाजाची संख्या प्रत्येक जिल्ह्यात आढळून येते. गावगाड्याबाहेर कितीतरी दूर अंतरावर राहतात हे लोक. आपापली भाषा, संस्कृती, आपली जातपंचायत सोबत घेऊन जगणाऱ्या या लोकांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सुधारणांपासून वंचित राहावं लागत आहे. यात सर्वाधिक मार खावा लागतो, तो पारधी समाजाच्या लोकांना.
उच्चभ्रू समाजाच्या व पोलिसांच्या जाचामुळं हा पारधी समाज गावापासून दूर आपली पालं टाकतो. जेवढे दिवस मुक्काम करता येणं शक्य असतं, तेवढे दिवस ते तिथं थांबतात. काही धोक्याचा इशारा कळला, की पालं गुंडाळून ती जागा बदलतात. असंच एकदा मराठवाड्यात बीड परिसरात पारधी समाजाचं एक कुटुंब गावाच्या बाहेर मुक्कामाला होतं. एके दिवशी वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आला... गारपीट झाली आणि या आसमानी संकटात या पारध्यांची पालं पालापाचोळ्यासारखी उडून गेली. जो काही फाटका-तुटका संसार होता, तोही अक्षरशः उघड्यावर पडला. जवळच्याच शेतातल्या एका डेरेदार झाडाखाली या कुटुंबानं आसरा घेतला. विजांचा कडकडाट सुरूच होता. एक वीज कडकडत नेमकी त्या झाडावर कोसळली आणि त्या पारधी कुटुंबाचा बळी घेऊन गेली. त्या कुटुंबातला पिन्या काळे, समुद्रीबाई आणि लहान मुलगा बंदुक्या हे सगळेजण मरण पावले. थोरला मुलगा राजापूरच्या पारध्यांच्या वस्तीवर नातलगांना भेटायला गेला असल्यानं बचावला. या थोरल्या मुलाचं नाव बारक्या!
पाऊस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिस पंचनामा झाला. शेतामध्ये शेतकरीच मृत्युमुखी पडले की काय म्हणून तलाठ्यांनीही पंचनामा केला. अशा अवकाळी पावसात वीज पडून मरणाऱ्यांना सरकारनं 20-20 हजार रुपये देण्याचं जाहीर केलं. मरण पावलेले लोक शेतकरी नसून पारधी समाजाचे होते, ही बातमी आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कळली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत बातमी छापून आली. बारक्याला ती राजापूरमध्ये कळली. पारधी समाजाच्या लोकांना सोबत घेऊन तो आपले आई-वडील आणि भाऊ यांचे मृतदेह पुरण्यासाठी गावात जागा शोधत फिरत होता; पण कुणीही पारध्यांचे मृतदेह पुरण्यासाठी जागा देत नव्हतं. अखेर पारध्यांनी एका सरकारी तलावाच्या बाजूच्या जागेवर मृतदेह एकावर एक ठेवून तिथं पुरून टाकले.
बारक्याला राजापूरच्या एका गावकऱ्यानं सांगितलं ः "अशा अवकाळी पावसात वीज पडून किंवा अपघात होऊन मरण पावलेल्यांना सरकार माणशी 20-20 हजार रुपये देतं. तू एक काम कर, तू तहसीलदाराला भेट. तुझ्या आई-वडिलांचा वीज पडून मेल्याचा पेपरात छापून आलेला फोटो त्यांना दाखव. तलाठ्यांचा रिपोर्ट घे. सरकार तुला पैसे देईल. उन्हा-पावसापासून बचाव करण्यासाठी त्यातून तुला एखादं घर बांधता येईल.' बारक्यानं वर्तमानपत्रातलं आई-वडिलांच्या फोटोचं ते कात्रण खिशात घडी घालून नीट ठेवलं. देवाचा एखादा संदेश सांभाळून ठेवावा तसं.
वीज पडून नवरा-बायकोचा व एका मुलाचा मृत्यू झाल्याचा पंचनामा त्या गावच्या तलाठ्यांनी बारक्याच्या हाती दिला. बारक्यानं तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे घातले. कशीबशी एके दिवशी तहसीलदाराची व त्याची भेट झाली. बारक्या तहसीलदाराला म्हणाला ः ""साहेब, माझे आईवडील वीज पडून मरण पावले. त्याची भरपाई म्हणून सरकार पैसे देणार असल्याचं मला कळलं आहे. माझे आई-वडील मरण पावल्याची लेखी माहिती तलाठ्यानंही दिलेली आहे. मी त्यांचा मुलगा आहे. मला ते पैसे मिळावेत, अशी विनंती आहे...'' तसहीलदारासमोर बारक्यानं अशा शब्दांत गयावया केली. तहसीलदारानं त्याला सांगितलं ः ""हे बघ, तुझे आई-वडील मरण पावले हे खरं आहे; पण ते कुठल्या गावचे होते,
काय करत होते, याची माहिती ग्रामपंचायतीचा सरपंच जोपर्यंत माझ्याकडं आणून देणार नाही, तोपर्यंत ही मदत तुला कशी मिळणार...?''
आपले आई-वडील ज्या गावाबाहेर पालं टाकून राहत होते, त्या गावच्या सरपंचाला अखेर बारक्या भेटला. सरपंचाला त्यानं विनंती केली ः ""माझे आई-वडील तुमच्या शिवारात पाल टाकून राहत होते. बाजूच्या झाडाखाली त्यांनी पावसात आसरा घेतला होता. वीज त्या झाडावर कोसळली व त्यातच ते मरण पावले, असं तुमच्या ग्रामपंचायतीकडून लिहून नेल्याशिवाय सरकारकडून भरपाईचे पैसे मला मिळणार नाहीत. तेव्हा तुम्ही तसं लिहून द्या...''
गावचा सरपंच व पाटील बारक्याला म्हणाला ः ""आरं, आमच्या शिवारात तुझे आई-वडील गावापासून कितीतरी दूरच्या अंतरावर पाल टाकून राहत होते. या गावातून निघून जावा, असं आम्ही त्यांना कधी म्हटलं नाही, हेच तुम्ही उपकार माना. आता तर तू थेट गावचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्रंच मागतोस की रं... पारध्यांना कुठं गावाचा रहिवासी होता येतंय व्हय...? उद्या कुठं चोऱ्यामाऱ्या झाल्या तर गावावरच आपत्ती यायची. तुमच्या गावात पारधी राहतात, असं म्हणून आजूबाजूच्या गावचे लोकं आम्हालाच दोष देतील. त्यामुळं "तुझे आई-वडील आमच्या गावचे होते,' असं आम्ही लिहून देणार नाही... ''
सरपंचानं असे हात वर केल्यावर बारक्या पुन्हा तहसीलदाराकडं गेला आणि गयावया करून म्हणाला ः ""माझे आई-वडील मरण पावलेले तर सरकारला माहीतच आहे ना? मी त्यांचाच पोरगा आहे... मग मला ती सरकारी मदत का मिळत नाही?''
यावर तहसीलदार म्हणाला ः ""तुझे आई-वडील मरण पावले आहेत, ही गोष्ट खरी आहे, त्यांचे सरकारी पैसेही मंजूर झालेले आहेत; पण सरकारनं माझे हात-पाय बांधलेले आहेत. मी कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करू शकत नाही. "माझे आई-वडील एखाद्या गावचे रहिवासी आहेत,' असं
प्रमाणपत्र तुझ्याकडून मला मिळाल्याशिवाय मी तुझे पैसे देऊ शकणार नाही. तुला पैसे देण्याची माझी इच्छा असली, तरी मी तसं करू शकत नाही.''
एकतर आपले आई-वडील, भाऊ गमावल्याच्या दुःखातून बारक्या अद्याप बाहेरही पडला नव्हता. त्यातच त्याला सरकारी भरपाईसाठी याच्या-त्याच्या विनंत्या-मिनतवाऱ्या कराव्या लागत होत्या. आपले आई-वडील जिथं जिथं पालं टाकून राहिले होते, त्या त्या गावात जाऊन सरपंच, पाटील व ग्रामसेवक यांच्या हातापाया पडावं लागत होतं. "आम्हा पारध्यांची कुठल्या तरी एखाद्या गावाचे रहिवासी म्हणून सरकारदरबारी नोंद करा,' असं त्याला सांगावं लागत होतं.
"आम्ही पारधी लोकं काही आभाळातून पडलेलो नाही, की पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही याच देशात जन्माला आलो. आम्हा पारध्यांना गावात घर नाही, रानात शेत नाही. आम्ही गावाला कुठला पुरावा द्यायचा...?' असं सांगून बारक्या हताश झाला. दोन्ही गुडघ्यांत डोकं खुपसून बसला...नंतर मुसूमुसून रडत म्हणाला ः ""ज्या देशात स्वातंत्र्यासाठी पारधी समाजानं इंग्रजांच्या विरोधात बंड केलं, त्यांना "जन्मतःच चोर, गुन्हेगार' ठरवलं गेलं आणि आता आम्हाला स्वातंत्र्यानंतरही पुरोगामी महाराष्ट्रात गावचं रहिवासी होता येऊ नये व माझ्या कुटुंबाला मंजूर झालेली भरपाई मिळू नये, याला काय म्हणावं? या देशात कुत्र्या-मांजरांची व पशू-पक्ष्यांचीही जनगणना होते. त्यांना दाणा-पाणी देण्यासाठी लोक धावून येतात. कुत्र्या- मांजरांनाही गावात राहण्याचं ठिकाण मिळतं. लोक त्या पशू-पक्ष्यांवर, जनावरांवर प्रेम करतात; पण आम्ही पारधी लोक माणसं असूनही आम्हाला साधं गावचा रहिवासी मानलं जात नाही. आम्हाला कुत्र्या-मांजरांपेक्षाही कमी समजलं जातं. दुर्दैव घेऊन आम्ही आजही राना-वनात भटकत जगत आहोत...आम्हाला न्याय कधी मिळणारं..?
लेखक : लक्ष्मण गायकवाड
(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

No comments:
Post a Comment