Saturday, 26 April 2014

स्त्रिया, निवडणुकीचे राजकारण आणि लोकशाहीकरण

''गाव पातळीवरचे स्थानिक राजकारण हे अधिक 'समुदायी' स्वरूपाचे असते.स्थानिक प्रश्न सर्वानाच माहीत असतात. तेव्हा परस्पर सहकार्याने, संवाद साधून सहमती निर्माण करून सोडवता येतात. याकामी स्त्रियांचे 'पारंपरिक' गुण उपयोगाचे ठरतात. म्हणून त्यांना 'ते' क्षेत्र योग्य आहे. या उलट राज्य, देशपातळीवरील राजकारणातील समस्या गुंतागुंतीच्या, व्यवहार सौदेबाजीच्या, शक्तींच्या टकरावांच्या किंवा मेळ घालण्याच्या, तिथे 'स्त्री' कशी टिकणार? कशी यशस्वी होणार? असे मानून तिला त्या पातळीवरील भूमिका नाकारणे हे पारंपरिक पुरुषी मानसिकतेचेच दर्शन आहे. त्याविरुद्ध सतत आवाज उठविल्याशिवाय राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणातील स्त्रियांचा प्रभाव वाढणार नाही.''
नव्वदीच्या दशकापासून 'लोकशाही' आणि 'लोकशाहीकरण' आणि 'स्त्री सक्षमीकरण' हे जागतिक पातळीवरील राजकीय चर्चाविश्वातील कळीचे शब्द बनले आहेत. देशांतर्गत राजकारण असो की जागतिक राजकारण असो- राजकारणाचे एकूण आकलन आणि चिकित्सा ही आता
लोकशाहीकरणाच्या संदर्भातच प्राय: केली जाते. स्पेन, पोर्तुगाल इत्यादी दक्षिण युरोपीय देशांपासून लोकशाहीकरणाच्या तिसऱ्या लाटेस आरंभ झाला. दक्षिण युरोपीय देशांत १९७४ साली सुरू झालेली ही लाट लॅटिन अमेरिकन देश, पूर्व युरोप, सोविएत युनियन, दक्षिण आशियायी देश आणि आफ्रिकी देशांपर्यंत येऊन धडकली आणि तिने त्या त्या भागातील अनेक अधिकारशाहीवादी अशा बिगर लोकशाही राजवटी संपुष्टात आणल्या.
लोकशाहीकरणासाठीचे हे सर्व उठाव लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि आंदोलनातून तसेच नागरी समाजाच्या सक्रियतेतून निर्माण झाले होते. देशोदेशीच्या या लोकशाहीकरणाच्या लाटेत स्त्रियांचाही सहभाग लक्षणीय होता. बिगर शासकीय संघटना, स्वयंसाहाय्यी गट, कृतिगट, सामाजिक चळवळी, सोशल मीडिया, निवडणुका आदी माध्यमातून लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत स्त्रिया सक्रिय झाल्या होत्या. स्त्रियांचा हा सहभाग लोकशाहीकरणाला बळकटी आणणारा होता.
देशोदेशीच्या या लोकशाहीकरणाच्या लाटेत स्त्रियांनी उचललेला वाटा लक्षात घेता लोकशाही राजकारणाला एक नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली. स्त्रियांच्या राजकारणातील वाढत्या सहभागामुळे लोकशाही राजकारण हे गुणात्मकदृष्टय़ा बदलेल इतकेच नव्हे तर लोकशाहीची कल्पनाही अधिकाधिक आशयघन होत जाईल, असा आशावादही व्यक्त केला गेला. स्त्रियांच्या वाढत्या सहभागामुळे राजकारणाचा नैतिक स्तर उंचावेल, ते उत्तरोत्तर अधिक सभ्य बनत जाईल. अशीही उमेद निर्माण झाली. विशेषत: मानवाधिकाराच्या चळवळी, पर्यावरणवादाच्या चळवळी, शेतकरी चळवळी, चिरस्थायी विकासाच्या चळवळी, शांततावादी चळवळी, स्त्रियांच्या चळवळी या अनेक प्रकारच्या सामाजिक चळवळीमधून स्त्रियांनी जे मूलभूत प्रश्न उपस्थित केले आणि मुख्य प्रवाही सार्वजनिक धोरणांना अधिक आशयसंपन्न करण्याचा प्रयत्न केला तो पहाता स्त्रियांच्या राजकीय सक्रियतेमुळे सार्वजनिक प्रश्नांकडे पहाण्याचा एक वेगळा परिप्रेक्ष्य निर्माण झाला. भारतात महिला आरक्षणामुळे पंचायत राज्य संस्था आणि स्थानिक शासन संस्थांमधील स्त्रियांचे प्रतिनिधित्व वाढले. अनेक महिला सदस्यांनी स्थानिक प्रश्नांचे रूढ अग्रक्रम बदलून मूलभूत गरजांना व सुविधांना प्राधान्य देत उपलब्ध संसाधनांचा योग्य तो उपयोग करण्यात एक वेगळी दृष्टी दाखवली. त्यामुळे स्त्रिया लोकशाही राजकारणाचा अवकाश अतिशय कल्पकतेने आणि समर्थपणे व्यापू शकतात, इतकेच नव्हे तर राजकारणात गुणात्मक बदल घडवू शकतात याचे एक प्रकारे आश्वासनच मिळाले. संस्थात्मक, रचनात्मक आणि संघर्षांत्मक राजकारणात स्त्रियांनी आपल्या क्षमता व कर्तबगारी अनेकदा सिद्ध केलेली आहे. असे असूनही जनआंदोलने किंवा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून स्त्रिया ज्या प्रमाणात राजकारणावर प्रभाव पाडू शकतात तितक्या प्रमाणात राज्य पातळी आणि देशपातळीवरील निर्वाचनात्मक राजकारणावर त्या फारसा प्रभाव टाकू शकत नाहीत असाच अनुभव आहे. 
परिणामत: निर्वाचनात्मक राजकारण हे महिला सबलीकरणाची भाषा आपण कितीही मोठय़ा आणि उत्सवी स्वरूपात बोलत असलो तरी, ते रूढ पद्धतीने व ठरावीक चौकटीतच घडताना दिसते. संस्थात्मक राजकारण, निर्वाचनात्मक राजकारण आणि जनआंदोलनांचे राजकारण हे लोकशाही-राजकारणाचे तीन प्रमुख आयाम आहेत. लोकशाही अधिक आशयघन आणि समृद्ध करावयाची असेल तर संस्थात्मक आणि आंदोलनात्मक राजकारणाबरोबरच निर्वाचनात्मक राजकारण हेदेखील उत्तरोत्तर भ्रष्टाचारमुक्त, बाहुबल मुक्त आणि वित्तबल मुक्त होणे गरजेचे आहे. निवडणूक सुधारणांच्या माध्यमातून आपल्याला या दिशेने जितके पुढे जाता येईल तितके पुढे जाण्याचा आपला प्रयत्न असेलच, पण विद्यमान निर्वाचनात्मक राजकारणाचे स्वरूप लक्षात घेता स्त्रियांच्या मतदानाचा टक्का वाढूनही राज्यपातळी व देशपातळीवरील त्यांच्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण फारसे समाधानकारक नाही असेच दिसून येते. २००९ च्या लोकसभेत स्त्री खासदारांची संख्या अवघी ५७ होती. त्यातही गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या स्त्री खासदारांची संख्या १८ होती. या १८ खासदारांमध्ये ९ काँग्रेस पक्षाच्या तर ८ भाजपच्या आणि अन्य एक असे चित्र दिसून येते. राज्यपातळीवरील आणि केंद्रीय पातळीवरील मंत्रिमंडळातही महिला मंत्र्यांचे प्रमाण नेहमीच अत्यल्प राहिले आहे. एका टप्प्यावर तर केंद्रीय पातळीवरील ७० जणांच्या जंबो मंत्रिमंडळात अवघी एक महिला कॅबिनेट दर्जाची मंत्री आणि केवळ ८ महिला राज्यमंत्री होत्या. २००९ च्या महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ सभासदांपैकी अवघ्या ११ स्त्रिया आमदार म्हणून निवडून आल्या. अगदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी मिळून अवघ्या सात महिलांना संधी दिली. या सर्वाचा अर्थ काय होतो? महिला सबलीकरण, स्त्रियांच्या प्रतिष्ठेची ऊठसूट भाषा करणारे राजकीय पक्ष राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकांमध्ये स्त्रियांना प्रतिनिधित्व देताना उघड उघड हात आखडता घेतात. एका बाजूला दलित, आदिवासी, बुहुजन, मुस्लीम, ग्रामीण आणि शहरी स्त्री मतदारांचे प्रमाण सातत्याने वाढत असताना राज्य आणि केंद्र पातळीवर स्त्रियांना त्या प्रमाणात प्रतिनिधित्व का मिळत नाही?  ३३ टक्के महिला आरक्षणाची भाषा बोलतानाच आपण त्यांच्या अपुऱ्या प्रतिनिधित्वाची जाहीर कबुली देत आहोत, याचे भान तरी आपल्याला राहते का?
कौटुंबिक जबाबदाऱ्या, पुरेसे आर्थिक बळ नसणे, राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरण, चारित्र्य हननाची भीती आणि दहशत या कारणास्तव मोठय़ा पातळय़ांवरील निर्वाचनात्मक राजकारणात स्त्रियांचा अवकाश आक्रसत जातो, असा निष्कर्ष उपलब्ध अभ्यासांतून वारंवार प्रकट झाला आहे. निर्वाचनात्मक राजकारणात यशस्वी होऊन ज्या स्त्रियांना राज्य अथवा केंद्र पातळीवर प्रतिनिधित्वाची संधी मिळाली अशा स्त्रीप्रतिनिधींनी देखील आपली विषय कक्षा प्राय: स्त्री-प्रश्नांपुरतीच मर्यादित ठेवल्याचे दिसते. उदा. स्त्रियांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा-बळी या प्रश्नांच्या संदर्भात त्या जितक्या परिणामकारक भूमिका घेताना दिसतात तितक्या प्रमाणात त्या संरक्षण, विदेश नीती, औद्योगिक धोरणे, व्यापारविषयक धोरणे, शेती, तंत्रज्ञान व विज्ञान या महत्त्वाच्या प्रश्नांवर फारशा बोलताना दिसत नाहीत. आणि बोलल्याच तर त्यांचा भर हा अशा धोरणांतील लिंगभावात्मक पक्षपातीपणा उघडा पाडण्यापुरताच मर्यादित राहतो. असा पक्षपातीपणा तर जरूर उघडा केला पाहिजे आणि त्या स्त्रिया अधिक चांगल्यापद्धतीने उघडा पाडू शकतात यातही वाद नाही. पण हे करताना आपली प्रतिनिधित्वाची भूमिका केवळ एखाद्या प्रश्नाची लिंगभावात्मक बाजू पुढे आणण्यापुरतीच मर्यादित केली जात नाही ना याचीही खबरदारी घेतली पाहिजे, नाहीतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातून स्त्रियांना हद्दपार करण्याचा एक सुलभ मार्ग यानिमित्ताने प्रस्थापित हितसंबंधियांना अनायासच मिळतो. किंबहुना आजवरचा अनुभव असा आहे की महिला वर्ग आणि स्त्री प्रश्नांबाबतची संवदेनशीलता दाखवत अनेक राजकीय पक्ष आणि राज्य व केंद्र पातळीवरील प्रतिष्ठित राजकीय नेते मोठय़ा खुबीने स्त्रियांचे प्रतिनिधित्व स्त्री प्रश्नांपुरतेच मर्यादित ठेवताना आढळतात. उदाहरणार्थ पक्ष संघटनेच्या पातळीवर महिला आघाडय़ा निर्माण करून तेवढी जबाबदारी स्त्रियांवर टाकणे किंवा सरकारच्या पातळीवर महिला आयोग, समाज कल्याण, शिक्षण यांसारख्या क्षेत्रात त्यांची वर्णी लागून त्यांना तेथेच एका परीने अडकवून ठेवणे या बाबी आपण अनुभवलेल्याच आहेत. 
    वास्तविक पाहता प्रतिनिधित्वाची संकल्पना खूपच व्यापक आहे. लोकप्रतिनिधीला प्रतिनिधित्व करताना एकाच वेळी चार आघाडय़ांवर काम करावे लागते. त्याला एका बाजूला आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे लागते, दुसऱ्या बाजूला आपापल्या पक्षाच्या विचारसरणीचे व पक्षीय धोरणे व कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करावे लागते, तिसऱ्या बाजूला ज्या समाज घटकातून तो किंवा ती आलेली आहे- (उदा. वर्ग- जात- भाषा- ग्रामीण- दलित- बहुजन - आदिवासी -शहरी-महानगरीय इत्यादी) त्याही सामाजिक स्तराचे प्रतिनिधित्व करावे लागते आणि चौथ्या बाजूला महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भातील धोरणविषयक भूमिका आणि दृष्टीचे प्रतिनिधित्व करावे लागते. या निकषांवर किती स्त्री प्रतिनिधींना या चारही आघाडय़ांचे भान ठेवून आपल्या प्रतिनिधित्वाच्या कारकिर्दीचे नियोजन व त्यानुसार वाटचाल केलेली आहे. याचाही विचार करणे हितावह ठरेल. जोवर असा विचार स्त्रिया करणार नाहीत तोवर त्यांचे प्रतिनिधित्व स्त्री प्रश्नांपुरतेच मर्यादित ठेवण्याची पुरुषसत्तेची खेळी नेहमीच यशस्वी होत राहणार.
आज सार्वजनिक जीवनात स्त्री-अत्याचार, लिंगभावात्मक न्याय, स्त्रियांची सुरक्षितता, स्त्री सक्षमीकरण, स्त्रियांचा सार्वजनिक जीवनातील वाढता सहभाग, महिला विकास, स्त्रियांचे हक्क, स्त्री-पुरुष समता या विषयावर (पोलिटिकली करेक्ट) राजकीयदृष्टय़ा नेमके आणि अचूक काय बोलायचे याचे कसब सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले आहे. पण राजकीयदृष्टय़ा अचूक बोलण्यामागे कोण खऱ्या स्त्री स्वातंत्र्याची व सक्षमीकरणाची भाषा बोलतो आणि कोण हे सारे शब्द वापरत केवळ पुरुषी चौकटीतून स्त्री-संरक्षणाची व सुरक्षिततेची भाषा-बोलतो यातला फरक लक्षात आला पाहिजे. स्त्री-प्रतिष्ठा, स्त्रीची इज्जत, 'डिग्निटी ऑफ वुमन' या शब्दांवर जोर देऊन बोलणारी नेते मंडळी बऱ्याचदा 'स्त्री इज्जत' जपण्याची जबाबदारी 'मर्दानी पुरुषाची' आहे हे अधोरेखित करत असतात. आणि पुरुषाला स्त्रीचा संरक्षक म्हणून सादर करतात. अशी मंडळीच मग स्त्रीवर अत्याचार करणाऱ्याला भर रस्त्यावर फाशी देण्याची भाषा बोलू लागतात. आणि दुसऱ्या बाजूला मुलायम सिंग किंवा अबू आझमीसारखी मंडळी 'बलात्कार करणारे गुन्हेगार हे शेवटी 'मुलेच' होती. किंवा पुरुषाच्या संमतीने वा संमतीशिवाय पुरुषांबरोबर बाहेर जाणाऱ्या स्त्रीलाही शिक्षा झाली पाहिजे' अशी बेताल आणि निर्लज्ज विधाने करीत गंभीर प्रश्नाला क्षुल्लक मुद्दय़ाचे स्वरूप देतात. वास्तवीक स्त्री इज्जतीची पुरुषी चौकटीतून भाषा करणारे नेते आणि मुलायम सिंग, अबू आझमीसारखी मंडळी ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे लक्षात घ्यायला हवे.
निवडणुकीच्या राजकारणाचे 'सार्वजनिक क्षेत्र' हे बाहुबल, गुन्हेगारी आणि अवैध मार्गाने व्यापलेले आहे. ते स्त्रियांसाठी सुरक्षित नाही. म्हणून त्यातून स्त्रियांना दूर ठेवावे लागते अशी मखलाशी करणारे किंवा स्थानिक पातळीवर स्त्रियांना अधिकाधिक प्रतिनिधित्व देत आम्ही 'ग्रास रूट लेव्हल'वर स्त्री सबलीकरणास प्राधान्य देत आहोत. अशी सफाई देणारी मंडळी हीदेखील उपरोक्त 'स्त्री  इज्जतीची' किंवा 'स्त्री शिक्षेची' भाषा करणाऱ्या मंडळींचीच सौम्य रूपे आहेत. हेही चाणाक्षपणे ओळखायला हवे. स्थानिक पातळीवर स्त्री प्रतिनिधित्वाचा उदो उदो करीत, राज्य आणि देशपातळीवर मात्र कधी 'निवडणुकीतील हुकमी विजयाची' कसोटी लावत तर कधी त्या पातळीवरील 'असुरक्षितेची' भीती सूचित करून स्त्रियांना प्रतिनिधित्व नाकारणे हे स्त्री हिताचेही नाही आणि लोकशाही राजकारणाच्याही हिताचे नाही. हे तर स्त्री-प्रतिनिधित्वाचे 'स्थानिकीकरण' झाले.
गाव पातळीवरचे स्थानिक राजकारण हे अधिक 'समुदायी' स्वरूपाचे (कम्युनिटॅरियन) असते. स्थानिक प्रश्न सर्वानाच माहीत असतात. ते छोटे असतात आणि त्यावर उपायही माहीत असतो. तेव्हा परस्पर सहकार्याने, संवाद साधून सहमती निर्माण करून सोडवता येतात. या कामी स्त्रियांचे 'पारंपरिक' गुण केअरिंग, शेअरिंग, नर्चरिंग अधिक उपयोगाचे ठरतात. म्हणून त्यांना 'ते' क्षेत्र योग्य आहे. या उलट राज्य, देशपातळीवरील राजकारणातील समस्या गुंतागुंतीचा, व्यवहार सौदेबाजीचा, शक्तींच्या टकरावांचा किंवा मेळ घालण्याचा, तिथे 'स्त्री' कशी टिकणार? कशी यशस्वी होणार? असे मानून तिला त्या पातळीवरील भूमिका नाकारणे हे पारंपरिक पुरुषी मानसिकतेचेच दर्शन आहे. त्याविरुद्ध सतत आवाज उठविल्याशिवाय राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणातील स्त्रियांचा प्रभाव वाढणार नाही. संख्यात्मक आणि आंदोलनात्मक राजकारणात स्त्रियांनी आपली कर्तबगारी दाखवलीच आहे. लोकशाहीच्या समृद्धीकरणासाठी निर्वाचनात्मक राजकारणातही स्त्रियांनी मुसंडी मारायला हवी अन्यथा त्यांचा विचार निव्वळ 'मतपेढी' म्हणून होत राहील.   



(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

तिसरी ठळक रेष !

विशिष्ट प्रकारच्या टाळ्यांचा आवाज आला की आपण आपला रस्ता बदलतो... डोळे मिटून घेतो... दुसरीकडे बघतो... आणि यांपैकी काहीच शक्‍य झालं नाही, तर "त्या' व्यक्‍तीच्या आरपार बघतो... जणू कुणी तिथं नाहीच! आता ही परिस्थिती बदलण्याची दाट शक्‍यता दिसत आहे. कशी? हिजड्यांना "तृतीयपंथी' असा घटनात्मक दर्जा देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे. 

हिजड्यांच्या घटनात्मक अस्तित्वासाठी लढणारी लक्ष्मीनारायण त्रिपाठी जेव्हाजेव्हा भेटायची, तेव्हातेव्हा We are the most visible community, though treated as invisible. हे आवर्जून सांगायची. कधी रागानं फुललेली, कधी त्वेषानं मुठी आवळलेली, तर कधी सतत होणाऱ्या अपमानानं डोळ्यांत पाणी आलेली. "आमचं ऐकणं, आमच्याशी बोलणं खूप दूर राहिलं, कोणीतरी माणूस आपल्यासमोर उभा आहे, हेही मानायला तयार नसतात माणसं, आम्ही उभे असलो की!' ती म्हणायची. सुरवातीला अंदाज नाही आला नीटसा; पण जसजसं तिचं लहानपणापासूनचं आयुष्य भेटींतून उलगडत गेलं, तसतसा तिच्या या म्हणण्याचा अर्थ उलगडत गेला. 

हिजड्यांना समाजात सहजी स्वीकारलं जात नाही, त्यांना अनेक अपमान सहन करावे लागतात, अशा चर्चा होत असतात. पण मुळात एखाद्या गोष्टीचा स्वीकार आपण करतो केव्हा...? ती गोष्ट अस्तित्वात असली तर! इथं समाजाला हिजड्यांचं अस्तित्व मानायचं नाहीये; मग त्यांचा स्वीकार करणं ही खूपच दूरची गोष्ट. सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयामुळे समाजानं मानलं नाही, तरी आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेनं हिजड्यांचं अस्तित्व अधोरेखित केलं. आता त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांतून शासन-प्रशासन हिजड्यांचा स्वीकार करेल. आणि एकदा लोकशाहीच्या बळकट दोन स्तंभांनी त्यांचा स्वीकार केला, तर समाजाला तो करावाच लागेल. 

कायदे आणि सामाजिक अभिसरण या गोष्टी हातात हात घालून चालतात... चालायला हव्यात. ""एखादा बदल घडवायचा असेल, समाजात सुधारणा करायची असेल, तर कधीकधी कायदे आधी केले जातात, नंतर त्यानुसार सामाजिक सुधारणा होतात. तर कधी समाजात आधी सुधारणा होते आणि समाजच मग कायद्यात बदल करायला भाग पाडतो. आम्हा ट्रान्सजेंडर्सच्या बाबतीत आता कायदा झाला आहे. आणि न्याय व्यवस्थेनं यांना स्वीकारलं आहे, हे पाहून आता समाजही स्वीकारायला लागेल अशी मला खात्री आहे,'' लक्ष्मीनारायण त्रिपाठी म्हणते. ""अर्थात हे सारं एका रात्रीत होणार नाही, याचीही मला कल्पना आहे. पण बदलाला सुरवात झाली आहे, त्याला गती देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. हिजडे आणि त्यांना नाकारणारा समाज, अशा दोघांचंही.'' 

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर लक्ष्मीशी सहमत आहेत. "स्त्री-पुरुष समानताही अद्याप आपल्या समाजात झिरपलेली नाही. मग स्त्री नाही आणि पुरुषही नाही, अशा या तृतीयपंथीयांचा स्वीकार समाज इतक्‍या सहज कसा करेल? पण या निर्णयानं आपण त्यांच्या स्वीकाराच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे, एवढं मात्र निश्‍चित. हिजड्यांना समाजमान्यता लगेचच नाही मिळणार कदाचित; पण व्यवहारातली मान्यता आता त्यांना मिळेल आणि त्यामुळे व्यक्‍ती म्हणून असणारे त्यांचे काही मानवी हक्‍क तरी जपले जातील.'' 

प्रत्येक व्यक्‍तीचे मूलभूत मानवी हक्‍क जपणं महत्त्वाचं आहे. तो तिचा घटनादत्त अधिकार आहे. पण हिजड्यांच्या बाबतीत सतत याची पायमल्ली होत गेली आहे. आणि याला कारण आहे त्यांचं स्त्री आणि पुरुष यांच्यापेक्षा असलेलं वेगळेपण. कोणतीही "वेगळी' गोष्ट स्वीकारायला आपण चटकन तयार होत नाही; मग आपण त्याला थेट "ऍबनॉर्मल- अनैसर्गिक' असंच लेबल लावून टाकतो आणि आपल्या अस्वीकाराचं स्पष्टीकरण देऊन टाकतो. खरं तर हिजडे ऍबनॉर्मलही नाहीत आणि अनैसर्गिकही नाहीत. ते शारीरिक दृष्ट्या पुरुष असतात; पण मानसिक दृष्ट्या स्त्री असतात. हा हार्मोन्सचा तोल बदलल्याचा परिणाम असतो. आणि याची सुरवात होते थेट गर्भधारणेपासून. 

थोडंसं तपशीलवार पाहू... 
गर्भधारणा होतानाच गर्भ मुलाचा आहे की मुलीचा, हे नक्‍की झालेलं असतं. xx क्रोमोसोम असले तर मुलगी आणि xy क्रोमोसोम असले तर मुलगा. गर्भधारणेनंतर सहा आठवड्यांनी y क्रोमोसोमवरचा sry हा जीन कार्यान्वित होतो आणि त्यातून जननेंद्रिय विकसित व्हायला आणि हार्मोन तयार व्हायला सुरवात होते. पुरुष हार्मोन अँड्रोजेन तयार होतात. त्यात टेस्टास्टरॉन हे हार्मोन मोठ्या प्रमाणावर असतं. ते स्त्रीगर्भातही थोड्या प्रमाणात असतं. स्त्रीगर्भात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन ही हार्मोन्स तयार होतात. व्यक्‍तीच्या मानसिक आणि भावनिक जडणघडणीत ही हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यानंतर बाह्य जननेंद्रिय विकसित होतात, ज्यावरून जन्माला आलेल्या बाळाचं लिंग ठरवलं जातं. 

या नैसर्गिक प्रक्रिया बहुतेक वेळा सुरळीत पार पडतात. मात्र काही वेळा लिंगाची निश्‍चिती होण्यात थोडा गोंधळ होतो. त्याचेही काही प्रकार आहेत, पण ट्रान्सजेंडर्सच्या बाबतीत होणारा प्रकार म्हणजे, पुरुष हार्मोन, टेस्टास्टरॉन खूप कमी प्रमाणात निर्माण होतात. गर्भ स्त्रीचा असल्यास प्रश्‍न येत नाही; पण पुरुषाचा असेल तर मात्र जननेंद्रियं पुरुषाची असून विचार, भावना यात स्त्रीत्व दिसतं. स्त्रीसारखं वागायला, राहायला आवडतं. 

हे सगळं संपूर्णपणे नैसर्गिक आहे. निसर्गानं दिलेला हा थोडासा वेगळेपणा आहे; पण ऍबनॉर्मल नाही. आणि म्हणूनच हिजड्यांच्या बाबतीत भेदभाव करण्याचं आपल्याला काही कारणच नाही. तो आजवर होत आला आहे आणि त्याचे परिणाम हिजड्यांच्या कित्येक पिढ्यांनी भोगले आहेत. पुरुष म्हणून जन्माला यायचं, स्त्रीच्या भावना बाळगायच्या... "मी कोण?' या प्रश्‍नाचं उत्तर ही मंडळी आयुष्यभर शोधत फिरत असतात... सगळेच काही हिजडे होऊ शकत नाहीत. जे हिजडे होतात, त्यांना कदाचित "मी कोण' या प्रश्‍नाचं उत्तर मिळत असेल; पण समाज कुठं त्यांना तुमच्याआमच्यासारखं आयुष्य जगू देतो! तो त्यांची दखलच घेत नाही. त्यांना काही करू देत नाही. ना शिकू देत, ना काम करू देत. आरोग्यासारखी अत्यावश्‍यक सुविधाही त्यांना नाकारली जाते. त्यांनी मग जगायचं कसं? मग एकतर ते भीक मागतात किंवा सेक्‍स वर्क करतात. या दोन्ही गोष्टी समाजाला निषिद्धच असतात. मग समाज त्यांचा अधिकच द्वेष करायला लागतो. 
एक प्रसंग आठवतोय. लक्ष्मीच्या एका मुलाखतीत तिला एका प्रेक्षकानं प्रश्‍न विचारला, ""हिजडे भीक का मागतात किंवा सेक्‍स वर्क का करतात? इतर चांगल्या मार्गानं का पैसे कमवत नाहीत?'' 
लक्ष्मीने त्या प्रेक्षकाला विचारलं, ""तुमच्याकडं धुण्याभांड्याला कामवाली आहे ना?'' 
""हो...'' तो म्हणाला. 
""तिला उद्यापासून कामाला नको येऊस असं सांगा... मी एक हिजडा पाठवते तुमच्या घरी कामाला... चालेल तुम्हाला? तुमच्या घरच्यांना?'' 
त्या प्रेक्षकाकडे उत्तरच नव्हतं. तो न बोलता जागेवर जाऊन बसला. 
न्यायालयाच्या ताज्या निर्णयाचा काय परिणाम होईल, याबद्दल बोलताना डॉ. प्रदीप पाटकरही तेच म्हणतात... ""न्यायालयानं सांगितलं असलं, तरी हिजड्यांना नाकारलं जाण्याची भीती सध्या तरी राहणारच आहे, ती परिस्थिती लगेचच बदलणार नाही. स्त्री-पुरुषांचा समाज आणि हिजडे एकमेकांत जेवढं मिसळतील, तेवढी त्यांना स्वीकारण्याची प्रक्रिया जलद होईल. दोन्ही बाजू एकमेकांना समजून घेतील, तेवढं प्रगतीचं पाऊल पुढे पडेल.'' 
हिजड्यांना घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयानं हे सारं विचारात घेतलं आहे. आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजाला साऱ्या सुविधा देताना त्यांना इतरांसारखं जगण्याचा हक्‍क कसा मिळेल, हे पाहिलं आहे. त्यांना शिक्षण मिळणार आहे, रोजगार मिळणार आहे, आरोग्य सुविधा मिळणार आहेत. आणि हे नाकारलं गेलं, तर न्यायालयाकडे दाद मागता येणार आहे. त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जाणार आहेत, समाजानं त्यांना नाकारू नये यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. 

हे सारं जसजसं प्रत्यक्षात येईल, तसतसं चित्र बदलायला सुरवात होईल. मुख्य म्हणजे आता हिजडे स्वत:चा स्वीकार करायला लागतील. "मी कोण?' हा प्रश्‍न त्यांना पडणारच नाही असं नाही, पण आता त्याचं उत्तर शोधणं त्यांना तितकं कठीण जाणार नाही. जन्मानं ठरलेलं लिंग आणि हार्मोन्सनी ठरलेला लिंगभाव यांच्यातल्या विरोधाभासाला तोंड देतादेता त्यांची दमछाक होईलही; पण त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी समाजाचा आणि कायद्याचा आधार असेल. 

आता त्या विशिष्ट प्रकारच्या टाळ्यांचा आवाज आला, तरी आपण रस्ता बदलणार नाही... डोळे मिटणार नाही... आणि त्यांच्या आरपारही बघणार नाही. आपण त्यांना समजून घेऊ. हिजडे ज्या टाळ्या वाजवतात, त्याचा अर्थच मुळी असतो, की आम्ही पुरुष आणि प्रकृती यांच्या मधले आहोत. एक तळवा पुरुषाचा, एक तळवा प्रकृतीचा. आम्ही मधले, म्हणून ही टाळी! 

वुई आर बिटवीन द लाइन्स... एक रेष स्त्रीची, एक रेष पुरुषाची. दोन्ही रेषा समांतर असतात, एकमेकांना छेदत नाहीत, एकमेकांना डिस्टर्ब करत नाहीत. आम्ही स्त्रीही नाही, पुरुषही नाही. पण आम्ही त्यांच्या मधोमध असणारी तिसरी रेष आहोत. त्यांना समांतर जाणारी, न छेदणारी. 
न्यायालयानं हिजड्यांना घटनात्मक दर्जा देऊन दोन रेषांच्या मधोमध असणारी ही तिसरी रेष ठळक केली आहे. 

लेखक :- वैशाली रोडे 
(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

Wednesday, 23 April 2014

पारधी कधी होणार गावचा रहिवासी?

एका पारधी मुलाचे आई-वडील नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडले. त्यानंतर त्या मुलाला सरकारी भरपाईही मंजूर झाली... पण हे पारधी कुटुंब त्या "गावचे रहिवासी' नसल्यानं ती भरपाई त्याला मिळू शकली नाही... "आम्ही पारधी लोकं काही आभाळातून पडलेलो नाही, की पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही याच देशात जन्माला आलो आहोत. आम्हा पारध्यांना गावात घरं नाही, रानात शेत नाही. मग आम्ही एखाद्या "गावचे रहिवासी' आहोत, असा पुरावा आम्ही कुठून आणणार.. ?' त्या मुलानं विचारलेल्या या प्रश्‍नाचं उत्तर कुणाकडेच नाही. 
महाराष्ट्रात मराठवाडा म्हटला की दुष्काळी प्रदेश... सतत गरिबीत जगणारी, दुष्काळानं होरपळणारी माणसं... हेच दृश्‍य डोळ्यांपुढं येतं. मराठवाड्यात भटक्‍या-विमुक्त समाजाचे लोक मोठ्या संख्येनं स्थिरावलेले दिसतात. यात वड्डर, कैकाडी, बेलदार, रामोशी, वैदू, टकारी, बंजारा, पारधी या समाजाची संख्या प्रत्येक जिल्ह्यात आढळून येते. गावगाड्याबाहेर कितीतरी दूर अंतरावर राहतात हे लोक. आपापली भाषा, संस्कृती, आपली जातपंचायत सोबत घेऊन जगणाऱ्या या लोकांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सुधारणांपासून वंचित राहावं लागत आहे. यात सर्वाधिक मार खावा लागतो, तो पारधी समाजाच्या लोकांना. 

उच्चभ्रू समाजाच्या व पोलिसांच्या जाचामुळं हा पारधी समाज गावापासून दूर आपली पालं टाकतो. जेवढे दिवस मुक्काम करता येणं शक्‍य असतं, तेवढे दिवस ते तिथं थांबतात. काही धोक्‍याचा इशारा कळला, की पालं गुंडाळून ती जागा बदलतात. असंच एकदा मराठवाड्यात बीड परिसरात पारधी समाजाचं एक कुटुंब गावाच्या बाहेर मुक्कामाला होतं. एके दिवशी वादळवाऱ्यासह अवकाळी पाऊस आला... गारपीट झाली आणि या आसमानी संकटात या पारध्यांची पालं पालापाचोळ्यासारखी उडून गेली. जो काही फाटका-तुटका संसार होता, तोही अक्षरशः उघड्यावर पडला. जवळच्याच शेतातल्या एका डेरेदार झाडाखाली या कुटुंबानं आसरा घेतला. विजांचा कडकडाट सुरूच होता. एक वीज कडकडत नेमकी त्या झाडावर कोसळली आणि त्या पारधी कुटुंबाचा बळी घेऊन गेली. त्या कुटुंबातला पिन्या काळे, समुद्रीबाई आणि लहान मुलगा बंदुक्‍या हे सगळेजण मरण पावले. थोरला मुलगा राजापूरच्या पारध्यांच्या वस्तीवर नातलगांना भेटायला गेला असल्यानं बचावला. या थोरल्या मुलाचं नाव बारक्‍या! 

पाऊस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिस पंचनामा झाला. शेतामध्ये शेतकरीच मृत्युमुखी पडले की काय म्हणून तलाठ्यांनीही पंचनामा केला. अशा अवकाळी पावसात वीज पडून मरणाऱ्यांना सरकारनं 20-20 हजार रुपये देण्याचं जाहीर केलं. मरण पावलेले लोक शेतकरी नसून पारधी समाजाचे होते, ही बातमी आजूबाजूच्या गावातल्या लोकांना कळली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत बातमी छापून आली. बारक्‍याला ती राजापूरमध्ये कळली. पारधी समाजाच्या लोकांना सोबत घेऊन तो आपले आई-वडील आणि भाऊ यांचे मृतदेह पुरण्यासाठी गावात जागा शोधत फिरत होता; पण कुणीही पारध्यांचे मृतदेह पुरण्यासाठी जागा देत नव्हतं. अखेर पारध्यांनी एका सरकारी तलावाच्या बाजूच्या जागेवर मृतदेह एकावर एक ठेवून तिथं पुरून टाकले. 

बारक्‍याला राजापूरच्या एका गावकऱ्यानं सांगितलं ः "अशा अवकाळी पावसात वीज पडून किंवा अपघात होऊन मरण पावलेल्यांना सरकार माणशी 20-20 हजार रुपये देतं. तू एक काम कर, तू तहसीलदाराला भेट. तुझ्या आई-वडिलांचा वीज पडून मेल्याचा पेपरात छापून आलेला फोटो त्यांना दाखव. तलाठ्यांचा रिपोर्ट घे. सरकार तुला पैसे देईल. उन्हा-पावसापासून बचाव करण्यासाठी त्यातून तुला एखादं घर बांधता येईल.' बारक्‍यानं वर्तमानपत्रातलं आई-वडिलांच्या फोटोचं ते कात्रण खिशात घडी घालून नीट ठेवलं. देवाचा एखादा संदेश सांभाळून ठेवावा तसं. 

वीज पडून नवरा-बायकोचा व एका मुलाचा मृत्यू झाल्याचा पंचनामा त्या गावच्या तलाठ्यांनी बारक्‍याच्या हाती दिला. बारक्‍यानं तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे घातले. कशीबशी एके दिवशी तहसीलदाराची व त्याची भेट झाली. बारक्‍या तहसीलदाराला म्हणाला ः ""साहेब, माझे आईवडील वीज पडून मरण पावले. त्याची भरपाई म्हणून सरकार पैसे देणार असल्याचं मला कळलं आहे. माझे आई-वडील मरण पावल्याची लेखी माहिती तलाठ्यानंही दिलेली आहे. मी त्यांचा मुलगा आहे. मला ते पैसे मिळावेत, अशी विनंती आहे...'' तसहीलदारासमोर बारक्‍यानं अशा शब्दांत गयावया केली. तहसीलदारानं त्याला सांगितलं ः ""हे बघ, तुझे आई-वडील मरण पावले हे खरं आहे; पण ते कुठल्या गावचे होते, 

काय करत होते, याची माहिती ग्रामपंचायतीचा सरपंच जोपर्यंत माझ्याकडं आणून देणार नाही, तोपर्यंत ही मदत तुला कशी मिळणार...?'' 
आपले आई-वडील ज्या गावाबाहेर पालं टाकून राहत होते, त्या गावच्या सरपंचाला अखेर बारक्‍या भेटला. सरपंचाला त्यानं विनंती केली ः ""माझे आई-वडील तुमच्या शिवारात पाल टाकून राहत होते. बाजूच्या झाडाखाली त्यांनी पावसात आसरा घेतला होता. वीज त्या झाडावर कोसळली व त्यातच ते मरण पावले, असं तुमच्या ग्रामपंचायतीकडून लिहून नेल्याशिवाय सरकारकडून भरपाईचे पैसे मला मिळणार नाहीत. तेव्हा तुम्ही तसं लिहून द्या...'' 
गावचा सरपंच व पाटील बारक्‍याला म्हणाला ः ""आरं, आमच्या शिवारात तुझे आई-वडील गावापासून कितीतरी दूरच्या अंतरावर पाल टाकून राहत होते. या गावातून निघून जावा, असं आम्ही त्यांना कधी म्हटलं नाही, हेच तुम्ही उपकार माना. आता तर तू थेट गावचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्रंच मागतोस की रं... पारध्यांना कुठं गावाचा रहिवासी होता येतंय व्हय...? उद्या कुठं चोऱ्यामाऱ्या झाल्या तर गावावरच आपत्ती यायची. तुमच्या गावात पारधी राहतात, असं म्हणून आजूबाजूच्या गावचे लोकं आम्हालाच दोष देतील. त्यामुळं "तुझे आई-वडील आमच्या गावचे होते,' असं आम्ही लिहून देणार नाही... '' 
सरपंचानं असे हात वर केल्यावर बारक्‍या पुन्हा तहसीलदाराकडं गेला आणि गयावया करून म्हणाला ः ""माझे आई-वडील मरण पावलेले तर सरकारला माहीतच आहे ना? मी त्यांचाच पोरगा आहे... मग मला ती सरकारी मदत का मिळत नाही?'' 
यावर तहसीलदार म्हणाला ः ""तुझे आई-वडील मरण पावले आहेत, ही गोष्ट खरी आहे, त्यांचे सरकारी पैसेही मंजूर झालेले आहेत; पण सरकारनं माझे हात-पाय बांधलेले आहेत. मी कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करू शकत नाही. "माझे आई-वडील एखाद्या गावचे रहिवासी आहेत,' असं 
प्रमाणपत्र तुझ्याकडून मला मिळाल्याशिवाय मी तुझे पैसे देऊ शकणार नाही. तुला पैसे देण्याची माझी इच्छा असली, तरी मी तसं करू शकत नाही.'' 
एकतर आपले आई-वडील, भाऊ गमावल्याच्या दुःखातून बारक्‍या अद्याप बाहेरही पडला नव्हता. त्यातच त्याला सरकारी भरपाईसाठी याच्या-त्याच्या विनंत्या-मिनतवाऱ्या कराव्या लागत होत्या. आपले आई-वडील जिथं जिथं पालं टाकून राहिले होते, त्या त्या गावात जाऊन सरपंच, पाटील व ग्रामसेवक यांच्या हातापाया पडावं लागत होतं. "आम्हा पारध्यांची कुठल्या तरी एखाद्या गावाचे रहिवासी म्हणून सरकारदरबारी नोंद करा,' असं त्याला सांगावं लागत होतं. 

"आम्ही पारधी लोकं काही आभाळातून पडलेलो नाही, की पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही याच देशात जन्माला आलो. आम्हा पारध्यांना गावात घर नाही, रानात शेत नाही. आम्ही गावाला कुठला पुरावा द्यायचा...?' असं सांगून बारक्‍या हताश झाला. दोन्ही गुडघ्यांत डोकं खुपसून बसला...नंतर मुसूमुसून रडत म्हणाला ः ""ज्या देशात स्वातंत्र्यासाठी पारधी समाजानं इंग्रजांच्या विरोधात बंड केलं, त्यांना "जन्मतःच चोर, गुन्हेगार' ठरवलं गेलं आणि आता आम्हाला स्वातंत्र्यानंतरही पुरोगामी महाराष्ट्रात गावचं रहिवासी होता येऊ नये व माझ्या कुटुंबाला मंजूर झालेली भरपाई मिळू नये, याला काय म्हणावं? या देशात कुत्र्या-मांजरांची व पशू-पक्ष्यांचीही जनगणना होते. त्यांना दाणा-पाणी देण्यासाठी लोक धावून येतात. कुत्र्या- मांजरांनाही गावात राहण्याचं ठिकाण मिळतं. लोक त्या पशू-पक्ष्यांवर, जनावरांवर प्रेम करतात; पण आम्ही पारधी लोक माणसं असूनही आम्हाला साधं गावचा रहिवासी मानलं जात नाही. आम्हाला कुत्र्या-मांजरांपेक्षाही कमी समजलं जातं. दुर्दैव घेऊन आम्ही आजही राना-वनात भटकत जगत आहोत...आम्हाला न्याय कधी मिळणारं..?

लेखक : लक्ष्मण गायकवाड



(सदर लेख इथून संकलित केला आहे.)