Saturday, 18 January 2014

गावकुसाबाहेर..

     
शरद पवारांनी रामदास आठवल्यांना एकवार पंढरपुरातून निवडून आणले. त्यासाठी पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांवर आठवल्यांच्या निवडणुकीची धुरा सोपविली होती. पवारांचे वजन आणि मोहित्यांची वट एवढी जबर, की आठवले उमेदवारी अर्ज भरायला एकदा पंढरपुरात गेले आणि नंतर विजयाचे प्रमाणपत्र घ्यायलाच तिकडे फिरकले. निवडणुकीच्या काळात आणि नंतरही ते कधी त्या मतदारसंघाकडे फारसे फिरकले नाहीत. मात्र त्यांची आकांक्षा मोठी होती. नुसत्या खासदारकीवर त्यांना समाधान नव्हते. त्यांना केंद्रातले मंत्रिपद हवे होते. पण लोकसभेत जेमतेम आठ खासदार असलेल्या पवारांना स्वत:साठी एक आणि प्रफुल्ल पटेलांसाठी दुसरे अशी दोन मंत्रिपदे मिळविल्यानंतर तिसरे पद मिळविता येणार नव्हते. पुढल्या काळातही त्यांच्या वाट्याला जे एक नगण्य राज्यमंत्रिपद आले ते त्यांना संगमा यांच्या मुलीला द्यावे लागले. आठवल्यांचे असमाधान बोलके असल्याने ‘मला मंत्री करा’ असे ते जाहीर सभांतून बोलायचे आणि लोकांना हसवून स्वत:चेही हसे करून घ्यायचे. त्यांची ताकद आणि आवाका ठाऊक असणार्‍या पवारांनी नंतर त्यांच्याकडे पार दुर्लक्ष केले. पुढे ते शिर्डीत उभे राहिले आणि अपेक्षेबरहुकूम पडले. त्यांना तसे पाडण्यात सार्‍यांनी ठरवून पुढाकार घेतला. आठवल्यांनी त्या स्थितीत मातोश्रीचा उंबरठा जवळ केला आणि शिवसेनेसोबत जायची तयारी केली. त्यांचा तोवरचा राजकीय प्रवास, त्यांच्या पक्षाचे धोरण आणि त्यांच्या आंबेडकरी निष्ठा असे सारेच लोकसभेच्या जागेसाठी बाजूला सारण्याचे धारिष्ट्य त्यासाठी त्यांनी एकवटले. मदत मागायला आलेल्यांना कसे वागवायचे हे सगळ्या वजनदारांना कळते, तसेच मग ठाकर्‍यांनीही त्यांना वागविले. एकदा सेनेजवळ गेले की मग पुरोगाम्यांच्या दिशेला वळता येत नसल्याने त्या काळात आठवल्यांनी त्यांचे अनेक जुने सहकारी गमावले. त्यांच्यामुळे आपणही तरू अशी आशा बाळगणारी माणसेच तेवढी मग त्यांच्यासोबत उरली. सेनेची भाजपशी युती आहे आणि ते दोन्ही पक्ष मोठे असल्याने राज्यातील बहुतांश जागा ते आपसात वाटून घेतील हे आठवल्यांना तेव्हाही कळत होते. म्हणून त्यांची मागणी एक राज्यसभा व तीन लोकसभा एवढीच माफक राहिली. पण आता त्या युतीत राजू शेट्टींची स्वाभिमान शेतकरी संघटना आणि महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष (हा कोठे आहे?) आला. परिणामी संकोचाचा भार आठवल्यांवर आला. प्रत्यक्ष जागावाटपाची वेळ आली तेव्हा शेट्टींनी चार तर जानकरांनी लोकसभेचे एक क्षेत्र मिळावे, असा दावा पुढे केला. आठवल्यांची कोंडी त्यामुळे आणखी वाढली. लोकसभेत भाजपचे ९ तसे सेनेचे ११ सभासद आहेत. गेल्या निवडणुकीत त्या पक्षांनी लढविलेली कोणतीही जागा सोडायला ते तयार नाहीत. या स्थितीत आठवल्यांना कोठे बसवायचे हा प्रश्न आहे. ते त्यांना त्यांची जागा धड सांगत नाहीत आणि ती नाही हे त्यांच्याने सांगवत नाही. मागे पक्ष नसला, संघटना नसली आणि विश्‍वासाचा मतदारसंघ नसला की अशा दयनीय अवस्थेवाचून दुसरे काही वाट्यालाही येत नाही. त्यातून पुढे आलेला मतप्रवाह आठवल्यांना महाराष्ट्रात जागा देऊच नये हा आहे. त्याऐवजी त्यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आणावे हा दूरचा पर्याय पुढे केला जाऊ लागला आहे. मध्य प्रदेशात आठवल्यांचे कुणी नाही. सेनेलाही तेथे वजन नाही आणि त्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजकारणात आठवले कितपत बसतात याची खात्री महाराष्ट्रातल्या भाजपवाल्यांनाही देता येत नाही. आठवल्यांची आघाडी सुटली आणि युतीही सुटायच्या बेतात अशी ही स्थिती आहे. त्यांना मध्य प्रदेशात पाठविण्याचा युतीचा प्रकार हा पुन्हा त्यांना गावकुसाबाहेर काढण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे, हे सार्‍यांना समजणारे आहे. तेथे त्यांचा समाज नाही, मतदार नाही आणि खात्रीचा कोणता वर्गही सोबत नाही. मात्र हे राजकारण आहे. त्यात मागणार्‍यापुढे पर्याय नसतो. मागणारी माणसे किती लाचार आहेत यावरही त्यांच्याविषयीचे धोरण देणारी माणसे ठरवीत असतात. सारांश, आठवल्यांचे तूर्तास असे आहे. ज्यांना विचारांवर व कार्यक्रमांवर पक्ष बांधता येत नाही आणि जे जातीपलीकडच्या माणसांजवळ जात नाहीत, त्यांचे याहून वेगळे काही व्हायचेही नसते.




(सदर लेख इथून संकलित केला आहे.)

No comments:

Post a Comment